तुम्ही मूर्ख आहात की शहाणे? समर्थांनी सांगितलेली कोणती लक्षणं तुम्हाला लागू?

  • सिद्धनाथ गानू
  • बीबीसी मराठी
मूर्ख की शहाणे?

फोटो स्रोत, Pingebat

रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध हा केवळ भक्तीचा नाही तर दैनंदिन जीवनातल्या गोष्टींबद्दल बोलणारा व्यवहार्य ग्रंथ आहे, असं अनेक जण मानतात.

ज्या काळात दासबोध लिहिला गेला त्या काळातल्या धारणा वेगळ्या होत्या, समाज वेगळा होता, जीवनशैली वेगळी होती. पण त्यात मांडलेली अनेक मूलभूत तत्त्वं आजही लागू पडतात. मग ती हस्ताक्षराबद्दल असोत किंवा दैनंदिन व्यवहाराबद्दल.

समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख माणसाची आणि शहाण्या माणसाची लक्षणं सांगितली आहेत. आजच्या काळात त्यांच्याकडे कसं पाहावं? डिजिटल युगातल्या आपल्या जीवनशैलीला ती तत्त्वं लागू पडतात का? त्यातल्या काही निवडक लक्षणांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला होता. तो पुन्हा शेयर करत आहोत.

1. दोघांत लुडबुड करणारा

दोघे बोलत असती जेथें | तिसरा जाऊन बैसे तेथें |

डोई खाजवी दोहीं हातें | तो येक मूर्ख ||६३||

दोन जण बोलत असताना मधेच शिरणं आणि मग आपल्याला काही कळत नाही म्हणून डोकं खाजवत बसणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे.

पण विनाकारण हुज्जत न घालणारी, 'देखल्या देवा दंडवत' या न्यायानं न वागणारी व्यक्ती शहाणी ठरते.

फोटो स्रोत, AMIT SAMANT

फोटो कॅप्शन,

सज्जनगड.

लटिकी जाजू घेऊं नये | सभेस लटिकें करूंनये |

आदर नस्तां बोलों नये | स्वभाविक ||२१||

पार्ट्यांमध्ये 'स्मॉल टॉक' हा गंमतीशीर प्रकार आहे. आपण कुणाशीतरी महत्त्वाचं बोलत असताना तिसरी व्यक्ती मध्येच टपकते आणि हवा-पाण्याच्या गप्पा मारते. आपल्याला जिथं कुणी विचारत नाही, अशा गप्पांमध्ये घुसून हसं करून का घ्या?

2. भांडकुदळ

कळह पाहात उभा राहे | तोडविना कौतुक पाहे |

खरें अस्ता खोटें साहे | तो येक मूर्ख ||६७||

भांडण होत असताना ते सोडवण्याऐवजी जो गंमत पाहत उभा राहतो आणि जो खरं सोडून खोटं सहन करतो तो मनुष्य मूर्ख आहे असं दासबोध म्हणतं.

पण वाचाळ माणसाशी न भांडता जो सुज्ञांच्या सहवासात राहतो, तो शहाणा, असं समर्थ सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र.

तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |

संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||९||

रस्त्यात कुणाचं भांडण सुरू असेल तर अनेक बघे आपापले कॅमेरा फोन काढून ते रेकॉर्ड करायला धावतात. दुसरा कुणी अशा परिस्थितीत सापडलेला पाहून त्यातून आपलं मनोरंजन करून घेणं कितपत योग्य आहे?

त्याउलट समजूतदार माणूस दुसऱ्याच्या भांडणाकडे स्वतःच्या करमणुकीसाठी पाहत बसत नाही. तसंच भांडकुदळ लोकांशी हुज्जत घालण्यात वेळ घालवत नाही, तो शहाणा आहे, असं रामदास स्वामी सांगतात.

3. फुशारक्या मारणारा

आपली आपण करी स्तुती | स्वदेशीं भोगी विपत्ति |

सांगे वडिलांची कीर्ती | तो येक मूर्ख ||१२||

स्वतःची टिमकी वाजवणारा आणि अडचणींत सापडलेला असताना ती दूर करण्याचं सोडून वाडवडिलांच्या कर्तृत्वाची फुशारकी मारणाऱ्या माणसाला समर्थांनी मूर्ख गणलं आहे.

उलट, एखादी व्यक्ती जवळची आहे म्हणून जो तिला पाठीशी घालत नाही आणि आपलाच मोठेपणा सांगत बसत नाही, त्याला शहाणा मानलं आहे.

आपल्याची गोही देऊं नये | आपली कीर्ती वर्णूं

नये | आपलें आपण हांसों नये | गोष्टी सांगोनी ||२४||

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

बेशिस्त वागून वर वाद घालणारा मूर्ख ठरतो.

सिग्नल तोडल्यामुळे पोलिसाने पकडल्यानंतर जेव्हा एखादा मुलगा पोलिसाला, 'मी कोण आहे माहिती आहे का? माझे वडील कोण आहेत माहिती आहे का?' असं विचारतो तेव्हा या मूर्खलक्षणाचा प्रत्यय येतो.

4. आळशी

धरून परावी आस | प्रेत्न सांडी सावकास |

निसुगाईचा संतोष | मानी,तो येक मूर्ख ||१७||

दुसऱ्यावर विसंबून राहून जो प्रयत्न करणं सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो, त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात.

याउलट आळस झटकून, दुसऱ्याबद्दल चाहाड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो, तो शहाणा मानावा असं म्हटलं आहे.

आळसें सुख मानूं नये | चाहाडी मनास आणूं

नये | शोधिल्याविण करूं नये | कार्य कांहीं ||१३||

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जो दुसऱ्यावरी विसंबला.

सध्या बहुतेक लोक आपली टॅक्सची कामं करण्यात गुंतली असतील. आपली गुंतवणूक आणि इतर गोष्टी वेळेत जाहीर करून काही लोक टॅक्सचं काम सुटसुटीत करतात.

पण काही लोक आधी काहीच करत नाहीत आणि मग मार्च महिन्यात आयत्या वेळी टॅक्स कन्सल्टंटकडे जाऊन परताव्यासाठीची काहीतरी जुजबी सोय करतात. पुढल्या वर्षी काम वेळेत करण्याचं ठरवतात, पण पुन्हा पुढल्या वर्षी पहिले पाढे पंचावन्न.

5. चारचौघांत लाजणारा

घरीं विवेक उमजे | आणि सभेमध्यें लाजे |

शब्द बोलतां निर्बुजे | तो येक मूर्ख ||१८||

घरी जो विवेकाच्या गप्पा मारतो, पण चारचौघांत त्याबद्दल बोलायला लाजतो आणि आपलं मत मांडताना गांगरून जातो त्याची गणना समर्थ रामदास मुर्खांत करतात.

याउलट धीराने चारचौघांत बोलणाऱ्या आणि लोकांनी निंदा, अपमान केला तरी आपला धीर न सोडणाऱ्याला शहाणं समजलं आहे.

सभा देखोन गळों नये | समईं उत्तर टळों नये |

धिःकारितां चळों नये | धारिष्ट आपुलें ||३८||

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

योग्य मत मांडायला घाबरू नये.

सोशल मीडियावर निनावी अकाउंट काढून शिवीगाळ करणारे अनेक असतात, पण सखोल चर्चेची वेळ आली की धूम ठोकतात.

त्याउलट ट्रोल्सच्या टोळ्यांना न भिता, सारासार विचार करून बनवलेलं मत जर एखादी व्यक्ती मांडत असेल, तर रामदास स्वामींच्या लेखी ती शहाणी ठरेल.

6. व्यर्थ अभिमान बाळगणारा

विद्या वैभव ना धन | पुरुषार्थ सामर्थ्य ना मान |

कोरडाच वाहे अभिमान | तो येक मूर्ख ||३२||

विद्या, वैभव, धन, सामर्थ्य यातलं काहीही नसताना जो फुकाचा गर्व बाळगतो तो मूर्ख.

याउलट आपलं कर्तृत्व नसताना केवळ मिंधेपणाने मिळणारं अन्न, मग ते स्वतःच्या वडिलांनी दिलेलं का असे ना, जी व्यक्ती खात नाही ती शहाणी.

कामेंविण राहों नये | नीच उत्तर साहों नये |

आसुदें अन्न सेऊं नये | वडिलांचेंहि ||२६||

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

स्वतःच्या बळावर यश मिळवावं.

7. गबाळा

दंत चक्षु आणि घ्राण | पाणी वसन आणी चरण |

सर्वकाळ जयाचे मळिण | तो येक मूर्ख ||३५ ||

जो अस्वच्छ आणि अव्यवस्थित राहतो तो मूर्ख आणि जो टापटीप राहतो तो शहाणा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शाळेत स्वच्छता आणि नीटनेटकेपणाच्या गुणांना महत्त्व का दिलं जातं?

संडासला वेळीच जाणारा, स्वच्छ कपडे घालणारा आणि बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला 'कुठे चाललास' असं न विचारणारा शहाणा असतो, असंही दासबोधात म्हटलं आहे.

शोच्येंविण असों नये | मळिण वस्त्र नेसों नये |

जाणारास पुसों नये | कोठें जातोस म्हणौनी ||१८||

8. मत्सर करणारा

समर्थासीं मत्सर धरी | अलभ्य वस्तूचा हेवा करी |

घरीचा घरीं करी चोरी | तो येक मूर्ख ||५३||

आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असणाऱ्यांचा जो मत्सर करतो आणि मिळू शकणार नाहीत अशा गोष्टींचा हेवा करत राहतो, त्याला समर्थ मूर्ख मानतात.

याउलट स्वतःच्या सामर्थ्यावर काम करणारा, आपल्यावर असलेल्या उपकारांची जाणीवपूर्वक परतफेड करणारा आणि इतरांचा विश्वासघात न करणारा शहाणा ठरतो.

कोणाचा उपकार घेऊं नये | घेतला तरी राखोंनये |

परपीडा करूं नये | विस्वासघात ||१७||

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मत्सर आणि हेवा मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत.

9. कामापुरता मामा

आपलें काज होये तंवरी | बहुसाल नम्रता धरी |

पुढीलांचें कार्य न करी | तो येक मूर्ख ||६९||

'कामापुरता मामा' या न्यायानं वागणारा माणूस मूर्ख असतो असं रामदास सांगतात.

फोटो स्रोत, Postagestamps.gov.in

फोटो कॅप्शन,

समर्थ रामदासांवर निघालेलं पोस्टाचं तिकीट.

पण दिलेल्या शब्दाला जागणारा, योग्य तिथं बळाचा वापर करण्यात न कचरणारा आणि स्वतः एखादी गोष्ट केल्याशिवाय दुसऱ्याला त्याबद्दल न ऐकवणारा माणूस शहाणा मानावा असंही ते सांगतात.

बोलिला बोल विसरों नये | प्रसंगी सामर्थ्य चुकों नये |

केल्याविण निखंदूं नये | पुढिलांसि कदा ||१२||

10. अर्थाचा अनर्थ करणारा

अक्षरें गाळून वाची | कां तें घाली पदरिचीं|

नीघा न करी पुस्तकाची | तो येक मूर्ख ||७०||

पुस्तकांची निगा न राखणारा जो माणूस मुळातली अक्षरे वाचायची सोडून त्यात स्वतःकडच्या मजकुराची भर घालतो तो मूर्ख मानला जातो.

दुसरीकडे, आपल्याबद्दल वाईट समज पसरणार नाहीत याबाबत जो जागरूक असतो आणि जो सतत सत्याचा पाठपुरावा करतो तो शहाणा.

फोटो स्रोत, keport

फोटो कॅप्शन,

पडताळून पाहा.

अपकीर्ति ते सांडावी | सत्कीर्ति वाढवावी |

विवेकें दृढ धरावी | वाट सत्याची ||४१||

'फेक न्यूज' हा सध्या परवलीचा शब्द आहे. अशा काळात तथ्यांशी फारकत न घेता सत्य सांगणारा माणूस शहाणा समजावा असाच संदेश समर्थ देतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)