सोशल : मुंबईत फेरीवाल्यांसाठी 'हॉकर्स प्लाझा असताना नवे हॉकर्स झोन कशाला?'

फेरीवाले Image copyright Getty Images

मोठ्या वादानंतर अखेर मुंबईतल्या हॉकर्स झोनची यादी मुंबई महापालिकेने रद्द केली आहे. जुन्या फेरीवाला धोरणानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या घरासमोर हॉकर्स झोन तयार करण्यात आला होता.

ही जुनी यादी रद्द करून नवी यादी तयार करा, असा आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, बीबीसी मराठीनं याच विषयावर सोशल मीडियावर वाचकांना विचारलं होता.

त्यावर आलेल्या अनेक प्रतिक्रियांपैकी या काही निवडक प्रतिक्रिया.

"कायद्यासमोर सगळे नागरिक सर्वसामान्य आहेत, तर सर्वांसाठी एकच कायदा आहे. पुढारी आणि सेलिब्रिटी त्यांच्या मालकीच्या घरात राहतात, रस्ता मात्र महानगरपालिका किंवा शासनाची मालमत्ता आहे. त्याबाबत शासकीय नियमानुसार योग्य निर्णय घेण्यात आला आहे," असं मत चारूदत्त पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"बऱ्याच वर्षांपूर्वी महानगरपालिकेने हॉकर्स प्लाझा बनवलेलं होतं. ते तसेच पडीक आहेत. त्या जागांवर फेरीवाल्यांना बसायला सांगण्याऐवजी तुम्ही नवीन हॉकर्स झोन का बनवत आहात?" असा प्रश्न अमोल यादव यांनी विचारला आहे.

तर अन्सर पठाण म्हणतात, "सेलिब्रिटीही देशाचे सर्वसामान्य नागरीक आहेत. त्यांना जनताच सेलिब्रिटी बनवते. त्यामुळे सर्व त्रास जनतेलाच का? पण सर्व सेलिब्रिटीज आणि नेत्यांना एकच नियम लागू झाला पाहिजे."

Image copyright Facebook

पराग कोडगे यांचं मतही अन्सर पठाण यांच्याशी मिळतं-जुळतं आहे. ते म्हणतात, "जर नियम लावायचेच असतील तर सगळ्यांना सारखेच लावा. 'हे सत्ताधारी नेत्याचं घर आहे. त्यामुळे इथे हॉकर्स झोन नको. ते विरोधकांचं घर आहे. त्याच्या घराबाहेर हॉकर्स झोन करा', असं नसायला हवं. सत्तेचा दुरुपयोग करून कायद्याचा अपमान करत आहेत. हे थांबायलाच हवं."

"रेल्वे स्टेशनच्या आवारातून फेरीवाल्यांना हटवल्यानंतर जो जो नेता त्यांच्या बोजूने उभा राहिला, त्यांच्या घराच्या अवतीभोवती हॉकर्स झोन बनवला पाहिजे," असं मत विरेंद्र वाणगे यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)