#HerChoice : 'नपुंसक पुरुषाशी आपलं लग्न झालंय हे कळलं तेव्हा...'

Her desire
फोटो कॅप्शन,

'जोडीदाराच्या खांद्यावर विसावणारी आणि हातात हात घालून चालणारी जोडपी पाहिली की मला असूया वाटायची.'

नवरा नपुंसक आहे, हे समजल्यावर भारतातल्या महिला काय करत असतील? भारतातील आधुनिक स्त्रियांच्या कहाण्या मांडणाऱ्या #HerChoice या मालिकेत अशाच एका महिलेची ही कहाणी.

लग्नानंतरची ती पहिली रात्र होती. माझ्या आयुष्यात नवरा म्हणून जो पुरुष होता, त्याच्या जवळ येण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. माझ्या मनात या रात्रीविषयी वेगळ्याच कल्पना होत्या. काहीशा अस्पष्ट आणि स्वप्नाळू अशा या कल्पना होत्या.

अगदी खासगीत जवळच्या मैत्रिणींसोबतच्या गप्पांमधून आणि पॉर्न व्हीडिओतून माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्रीविषयी या कल्पना माझ्या मनात तयार झाल्या होत्या.

त्या रात्री हातात दुधाचा ग्लास घेऊन मी खोलीत गेले. अर्थातच हे अगदी पारंपरिक होतं. पुढं काय घडणार आहे, याची पुसटशीही कल्पना माझ्या मनात नव्हती.

पण माझ्या स्वप्नांचा चक्काचूर होणार होता.

मी स्वप्न पाहात होते... माझा नवरा मला घट्ट जवळ ओढून घेईल. रात्रभर माझ्यावर प्रेमाची उधळण करेल. पण प्रत्यक्षात घडल ते भलतंच. मी येण्यापूर्वीच तो चक्क झोपी गेला होता.

माझं वय तेव्हा 35 वर्षं होतं आणि माझं कौमार्य कायम होतं. या घटनेमुळं मी दुखावले होते आणि हे दुःख होतं नाकारलं गेल्याचं.

#HerChoice ही मालिका आहे १२ भारतीय स्त्रियांच्या आयुष्यांवरील खऱ्याखुऱ्या कहाण्यांची. आधुनिक भारतीय स्त्रीच्या समोरील आव्हानं आणि तिच्या जगण्याचा विस्तारलेला परीघ उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. या कहाण्यांच्या केंद्रस्थानी आहेत, तिच्या जगण्याचा वेध घेत तिचं निवड स्वातंत्र्य, आकांक्षा आणि इच्छा.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

कॉलेजच्या दिवसांमध्ये आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी मी मुला-मुलींमधील जीवलग मैत्री पाहायचे. जोडीदाराच्या खांद्यावर विसावणारी आणि हातात हात घालून चालणारी जोडपी पाहिली की मला असूया वाटायची.

मलाही असा जोडीदार कधी मिळेल का, असं वाटत राहायचं.

चार भाऊ, एक बहीण आणि वृद्ध आई-वडील असं आमचं मोठं कुटुंब होत. पण या भरलेल्या घरातही मला नेहमी एकटं वाटायचं.

माझ्या सगळ्या भावांची लग्न झाली होती आणि ते त्यांच्या संसारात रमले होते. माझं वय वाढत चाललं होतं पण लग्न काही जमत नव्हतं. माझ्या भावांना माझी काही काळजी आहे की नाही, असा प्रश्न मला नेहमीच पडत असे.

एकीकडे मला प्रेमाची आस होती. मनात अनेक इच्छा होत्या. तर दुसरीकडे एकटेपणाने मला घेरलं होतं.

मी लठ्ठ आहे म्हणून लग्न ठरत नाही का, असा प्रश्नही माझ्या मनात येत असे.

पुरुष जाड्या स्त्रियांचा तिरस्कार करतात का? माझं वजन वाढलेलं आहे म्हणून माझ्यासाठी जोडीदार पाहणं घरच्यांना कठीण जात असावं का? मला आयुष्यभर लग्नाशिवाय राहावं लागेल का? मला कधीच लैंगिक सुख मिळणार नाही का? असे अनेक प्रश्न सतत मला छळायचे.

अखेर मी ३५ वर्षांची असताना चाळिशीतला एक पुरुष माझ्याशी लग्न करायला तयार झाला.

लग्नाबद्दल रीतसर बोलणी झाल्यावर, मी त्याला माझ्या भावना त्याला सांगितल्या. पण त्याने ना त्याकडे लक्ष दिलं ना काही प्रतिसाद दिला. तो काहीसा निराशच असायचा.

फोटो कॅप्शन,

'मी स्वप्न पाहात होते... माझा नवरा मला घट्ट जवळ ओढून घेईल.'

तो अनेकदा शांत आणि खाली पाहात बसलेला असायचा. मला वाटलं, हल्ली बायकांपेक्षाही काही पुरुष लाजाळू असतात. माझा होणारा नवराही त्याला अपवाद नसेल, असा विचार मी केला.

पण लग्नानंतरच्या रात्रीने मला अधिकच गोंधळात टाकलं. मला कळत नव्हतं की तो असा का वागतोय.

मी सकाळी त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा तो 'तब्येत बरी नव्हती' असं म्हणाला. पण पुढेही काहीच बदललं नाही. पहिल्या रात्रीसारख्याच कित्येक रात्री गेल्या.

झालेल्या या प्रकाराबद्दल मी माझ्या सासूला सांगितलं. पण त्यांनी माझ्या नवऱ्याचीच बाजू घेतली. "लहानपणापासून तो मुलींशी बोलायला लाजतो. शिवाय तो मुलांच्या शाळेत शिकलाय. त्याला बहीणही नसल्याने त्याला मुलींशी बोलायची सवय नाही," अशी त्यांनी सारवासारव केली.

सासूबाईंनी असं सांगितल्यावर मला जरा हायसं वाटलं. पण माझ्या मनातलं काहूर काही संपलं नव्हतं. माझ्या सगळ्या अपेक्षा, स्वप्नं आणि इच्छा यांचा दिवसांगणिक चक्काचूर होत होता.

माझ्या अस्वस्थतेचं कारण केवळ सेक्स हे नव्हतं. तो माझ्याशी क्वचितच बोलायचा. स्पर्श तर सोडाच माझा हातही कधी त्यांनं हातात घेतला नव्हता. एकदा तर मी अंगावरचे कपडे उतरवले, तरीसुद्धा त्यानं माझ्याकडे पाहिलंही नाही.

काय कारण होतं? माझा लठ्ठपणा कारणीभूत होता का? त्याने दबावाखाली येऊन माझ्याशी लग्न केलं होतं का?

हे सगळं कोणाशी बोलायचं हे मला कळत नव्हतं. मी माझ्या माहेरच्या लोकांशीही मोकळेपणाने बोलू शकत नव्हते. मी संसारात खूप आनंदी आहे असाच त्यांचा समज होता.

पण माझ्या सहनशक्तीचा अंत होत होता. मला लवकरच काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं.

तो सुटीचा दिवस होता. सुटीच्या दिवशी माझा नवरा कधीच घरी थांबत नसे. एकतर तो स्वतः मित्रांच्या घरी जायचा किंवा आई-वडिलांना घेऊन बाहेर जात असे. त्या दिवशी नेमका तो घरी होता.

मी त्याच्या रूममध्ये गेले आणि दरवाजाला आतून कडी लावून घेतली. तो बेडवरून अक्षरशः उठून बसला.

मी त्याच्या जवळ गेले आणि शांतपणे त्याला विचारलं, "मी तुला आवडत नाही का? लग्नानंतर आपण एकदाही जवळ आलेलो नाही. कधी एकमेकांसमोर मोकळेही झालो नाही. तुझा काय प्रॉब्लेम आहे?"

तो म्हणाला, "माझा काहीच प्रॉब्लेम नाही."

त्याचं पूर्णपणे माझ्याकडे लक्ष होतं. ही संधी पाहून मी त्याच्या आणखी जवळ जायचा प्रयत्न केला. पण त्याचा कोणताही अवयव जराही उत्तेजित झालेला नव्हता. पॉर्न व्हीडिओत जे दाखवलं जातं त्यापेक्षा मी काहीतरी वेगळं अनुभवत होते.

हे कोणासोबत बोलावं, हे मला कळत नव्हतं. मला शरमही वाटत होती.

पण मला त्याचा खूप त्रास होत होता. पुरुष स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल एरव्ही खूप चर्चा करतात. मग मी पुरुषांच्या शारीरिक क्षमतेबद्दल का बोलू नये? माझ्या त्याच्याकडून जर काही अपेक्षा असतील तर त्यात चूक काय आहे?

मग मला कळून चुकलं की, तो नपुंसक आहे. आमच्या लग्नाआधीच डॉक्टरांनी त्याचं निदान केलं होतं. तो आणि त्याच्या आई-वडिलांना तो नपुंसक असल्याचं आधीच माहीत होतं. तरीही त्यांनी मला फसवलं होतं.

आता मला खरं काय ते कळलं होतं. त्याला माझ्यासमोर उभं राहायला लाज वाटत होती. पण त्याने माझी माफी मागितली नाही.

स्त्रीने छोटीशी जरी चूक केली तर समाज तिला खूप हिणवतो. पण पुरुषाने चूक केली तरी त्यासाठी स्त्रीलाच दोषी धरलं जातं.

माझ्या नातेवाईकांनी मला सल्ला दिला, 'आयुष्यात फक्त सेक्सच महत्त्वाचा नाही. तू मूल दत्तक घे.'

माझ्या सासरच्या मंडळींनी मला विनंती केली की याची कुठंही वाच्यता करू नकोस. 'लोकांना खरं काय ते कळलं तर समाजात आमची नाचक्की होईल,' असं ते म्हणाले.

माझ्या घरच्यांच्या मते हे माझ्या नशिबातचं होतं. पण माझ्या नवऱ्याचं बोलणं माझ्या अधिकच जिव्हारी लागलं.

तो म्हणाला, "तुला हवं तसं वाग. तू कोणासोबतही संबंध ठेवलेस तरी त्याला माझी हरकत नाही. मी हे कुणालाही सांगणार नाही. तुला त्या संबंधातून मूल झालं तर मी त्याला माझं नाव द्यायला तयार आहे."

नवऱ्याची अशी भयावह कल्पना कोणत्याही पत्नीने ऐकली नसेल.

त्याने मला फसवलं होतं. आता तो स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची इभ्रत वाचवण्यासाठी मला हे सांगता होता. तो मला काकुळतीला येऊन म्हणाला, "प्लीज हे कुणालाही सांगून नकोस. मला घटस्फोट देऊ नकोस."

फोटो कॅप्शन,

'त्याला स्वतःची आणि कुटुंबाची इभ्रत प्रिय होती.'

तो जी विनवणी करत होता, त्याविषयी मी कल्पनाच करू शकत नव्हते. दोनच पर्याय माझ्यासमोर शिल्लक होते. एक तर त्याला सोडून द्यावं किंवा माझ्या प्रेम आणि जोडीदारासोबतच्या स्वप्नांना मारून टाकावं.

अखेर मी निर्णय घेतला आणि माझ्या नवऱ्याचं घर सोडलं.

माझ्या आई-वडिलांनी मला स्वीकारलं नाही.

माझ्या मैत्रिणींच्या मदतीने मी नोकरी शोधली आणि लेडीज हॉस्टेलला राहायला गेले.

माझं आयुष्य हळूहळू मार्गी लागत होतं. मी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला.

माझ्या सासरची माणसं निर्लज्ज होती. त्यांनी माझ्यावर व्यभिचार केल्याचा आरोप करत, लग्न मोडण्यासाठी मी खरं कारण लपवतेय, असं सांगितलं.

पण मी हिंमत हरले नाही. मी नवऱ्याच्या मेडिकल चाचणीची मागणी केली. कोर्टकचेरीत तीन वर्षं गेली, पण अखेर मला घटस्फोट मिळाला. ज्या दिवशी मला घटस्फोट मिळाला, त्या दिवशी मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं.

मी अजून चाळिशी ओलांडलेली नाही आणि अजूनही व्हर्जिन आहे.

गेल्या काही वर्षांत मला अनेक पुरुषांनी विचारलं. त्यांचा समज होता की मला लैंगिक सुख मिळत नव्हतं म्हणून मी नवऱ्याला सोडलं.

माझ्यासोबत जे घडलं ते साफ चूक होतं. माझ्याविषयी माझ्या नवऱ्याचे विचार संकुचित होते. मी अशा संकुचित विचारांच्या पुरुषांपासून दूर राहणंच पसंत करते.

जोडीदाराविषयी माझ्या इच्छा, भावना आणि माझी स्वप्नं आहेत. ज्या पुरुषाचं माझ्यावर प्रेम असेल त्याच्यावर मला प्रेम करायचं आहे. त्याला माझ्या भावना कळतील. तो माझी काळजी घेईल आणि मला आयुष्यभर साथ देईल.

मी वाट पाहातेय माझ्या स्वप्नातील जोडीदाराची.

तोपर्यंत मी माझ्यात आनंदी आहे. मैत्रिणींसोबत त्यांच्या लैंगिक आयुष्याबद्दल आमचं अगदी खासगीत बोलणं होतं आणि जेव्हा माझ्या मनात सेक्सबद्दल विचार येतात, तेव्हा वेबसाईट्स जवळच्या वाटतात.

मी जे काही केलं, त्यासाठी माझी झाडाझडती घेणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. स्त्री काही वस्तू नाही. स्त्रीला भावना असतात, हे कळण्याची लोकांना सुबुद्धी मिळो!

(ही कहाणी दक्षिण भारतातल्या एका शहरात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे. बीबीसी रिपोर्टर ऐश्वर्या रविशंकरयांनी शब्दांकन केलं आहे. तर दिव्या आर्य यांनी निर्मिती केली आहे. या कहाणीतील महिलेची ओळख तिच्या विनंतीनुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.)

हे वाचलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)