#5 मोठ्या बातम्या : 'अयोध्येत राम मंदिर उभारणारच'

मोहन भागवत Image copyright Getty Images

अयोध्येत राम मंदिर उभारणारच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्याचे वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासह आजच्या इतर पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे.

1. 'अयोध्येत राम मंदिर उभारणारच'

अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी पंढरपूर इथल्या संतसंगम चर्चासत्रात केल्याचे वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

राममंदिराबाबत बोलताना भागवत यांनी स्पष्ट केलं, की राममंदिर होणार ही आपली प्रतिज्ञा आहे. समाज जागृतीतून हे मंदिर बांधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

2. 'जात जन्मानंच असते, लग्नानंतर बदलत नाही'

एखाद्या व्यक्तीची जात जन्मानं जी असेल तीच राहणार. इतर जातीत लग्न केलं तरी त्या व्यक्तीची जात बदलणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं गुरुवारी दिला आहे. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं आहे.

Image copyright Getty Images

जातीनं खुल्या प्रवर्गात येणाऱ्या बुलंदशहर इथल्या महिलेनं अनुसूचित जातीतील व्यक्तीशी लग्न केलं. त्यानंतर, अनुसूचित जातीचं जात प्रमाणपत्र तिनं मिळवून पदोन्नती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, अन्य जातीत लग्न झालं तरी जात बदलता येणं शक्य नसल्याचा निकाल देत ही पदोन्नती अवैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं.

3. आनंदीबेन पटेल मध्य प्रदेशच्या राज्यपाल

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. पटेल या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या त्या विरोधक मानल्या जातात.

Image copyright ANANDIBEN PATEL

हे वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. यात म्हटलं आहे की, ऑगस्ट 2016मध्ये त्यांनी गुजरातच्या मुख्यंमत्री पदाचा राजीनामा दिला होता. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

4. अमित शहांच्या दोषमुक्तीविरोधात वकील सरसावले

सकाळमधल्या वृत्तानुसार, गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यामधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बाँबे लॉयर्स असोसिएशन या वकिलांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सोहराबुद्दीन चमकमकीच्या खटल्यामध्ये अमित शहा प्रमुख आरोपी होते. मात्र डिसेंबर 2014मध्ये सीबीआय विशेष न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलं.

Image copyright CHANDAN KHANNA/AFP/GETTY

या विरोधात सीबीआयने वरच्या न्यायालयात अद्याप अपील याचिका केली नाही. सीबीआयच्या या भूमिकेबाबत याचिकादार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

5. विमानातही मोबाईल वापरता येणार

विमानात सध्या मोबाईल वापरावर बंदी आहे. मात्र, बंदी उठवण्यात यावी आणि भारतीय हवाईक्षेत्रात मोबाईल वापरण्यासाठी परवानगी द्यावी अशी शिफारस ट्राय म्हणजेच Telecom Regulatory Authority of India ने केली आहे.

Image copyright Getty Images

विमानात मोबाईल सेवेचा वापर करू देणं न देणं हा निर्णय विमान कंपन्यांचा असला तरी हा वापर करू देण्यास हरकत नसल्याचं ट्रायचं म्हणणं आहे.

सुरक्षेची काळजी घेऊनच हा निर्णय घेतला जावा, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)