काय खरं काय खोटं? फेक न्यूज ओळखण्याचे 8 मार्ग

फेक न्यूज Image copyright Getty Images

कधी आपली प्रतिमा उजळवण्यासाठी, कधी विरोधकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी, कधी द्वेष पसरवण्यासाठी तर कधी गैरसमज, विभ्रम निर्माण करण्यासाठी फेक न्यूज पसरवल्या जातात. अशा फेक न्यूज कशा ओळखाल?

ऐव्हाना तुम्हाला समजलं असेल की, 2000 रुपयांच्या नोटेत कुठलीच GPS चिप लावण्यात आलेली नव्हती किंवा युनेस्कोने आमच्या राष्ट्रगीताला जगातलं सर्वांत चांगलं राष्ट्रगीत म्हणूनही घोषित केलेलं नव्हतं. युनेस्को एक संस्था आहे आणि ते असलं काही ठरवतंही नाहीत. भारतात 2016 मध्ये मीठाचा कुठलाच तुडवडा नव्हता.

या सगळ्या फेक न्यूज किंवा बोगस बातम्या होत्या. पण काही महिन्यांपूर्वी या बातम्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाल्या होत्या.

असल्या बिनडोक गोष्टींमुळे कुठलाच फरक पडत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या हे लक्षात आणून द्यायला हवं की, जेव्हा ही अफवा पसरली तेव्हा या गोंधळात कानपूरमध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता.

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपवर व्हायरल झालेल्या या सगळ्या खोट्या बातम्या (फेक न्यूज) होत्या. अशा अफवांची यादी फार मोठी आहे.

इंटरनेटवरचं वातावरण

कधी आपली प्रतिमा उजळवण्यासाठी, कधी विरोधकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी, कधी द्वेष पसरवण्यासाठी तर कधी भ्रम निर्माण करण्यासाठी असे बातम्यांचे मेसेज पसरवले जातात.

Image copyright Getty Images

अशा मेसेजच्या जाळ्यात अडकणारे फक्त मूर्खच ठरत नाहीत तर कळत नकळत लबाड लोकांच्या हातचे बाहुलेही होतात. कधीकधी विशिष्ट विचारांनी प्रभावित होऊन सत्य माहीत असतानाही लोक खोटी माहिती पसरवतात.

इंटरनेटवरचं वातावरण चांगलं राहावं याची जबाबदारी त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर असते. असंच जर चालत राहिलं तर इंटरनेटच्या जगात इतका कचरा वाढेल की नंतर मोबाइल किंवा इंटरनेटवर मिळणाऱ्या कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवण्यास कुणी धजावणार नाही.

फक्त सत्य वाचा आणि सत्यच शेअर करा. असं करणं थोडं कठीण वाटत असलं तरी हे करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते करू शकतात. तुम्ही फॉरवर्ड करत असलेली बातमी फेक न्यूज आहे की खरी आहे हे कसं ओळखायचं?

फेक न्यूज ओळखण्याचे 8 मार्ग

1. व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ब्राउजरही वापरा

जर तुमच्या कुटुंबाच्या किंवा शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एखादा मेसेज आला तर तुम्ही त्याची सत्यता पडताळता का?

तुम्ही व्हॉट्सअप वापरता म्हणजे तुम्ही एकतर वाय-फाय किंवा मोबाइल इंटरनेटचा वापरही करत असाल.

Image copyright PA

याचा अर्थ तुम्हाला आलेल्या मेसेजची सतत्या तुम्ही गुगलवर सर्च करून चेक करू शकता. कुठलाही मेसेज दुसऱ्यांना फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्यता तपासून पाहा अन्यथा तुम्ही खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या हातचं बाहुलं व्हाल.

2. तथ्य तपासणं फार अवघड नाही

जर तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी माहिती कळली असेल तर ती खरी किंवा खोटी आहे हेही तपासलं पाहिजे. जर ती माहिती खरी असेल तर देश-विदेशातील दहा-बारा विश्वासू वेबसाइटवर नक्कीच छापून आलेली असेल. जर तुम्हाला संबधित मेसेजमधील माहिती कुठंच सापडत नसेल तर त्यावर विश्वास ठेऊ नका.

Image copyright PA

तुम्ही लेखकाचं नाव किंवा माहिती देणारी वेबसाइटही सर्च करू शकतात. त्यातून तुम्हाला किमान हे तर कळेल की त्यांनी आणखी काय-काय प्रसिद्ध केलं आहे.

यामुळं हेही कळेल की त्यांनी यासारख्याच दुसऱ्या अफवाही पसरवल्यात किंवा नाही.

3. स्रोत किंवा urlची माहिती घ्या

जेव्हा तुम्ही कुठलीही माहिती ऑनलाइन वाचत असाल तर हेही जरूर बघा की, ती माहिती कुणी प्रसिद्ध केली आहे?

ज्यावर विश्वास ठेवता येईल अशी एखादी जुनी वृत्तसंस्था, प्रकाशनसंस्था किंवा चर्चित नाव आहे का तेही बघा. पण जर तुम्ही त्या प्रकाशकाविषयी यापूर्वी कधी एकलेलं नसेल तर थोडं सावध व्हा. महत्त्वाचं म्हणजे फक्त प्रकाशकावरच विश्वास ठेऊ नका.

कुठलीही व्यवसायिक संस्था हे नक्कीच सांगते की, त्यांच्या माहितीचा स्रोत काय आहे. स्रोताची माहिती न देणाऱ्यांपासून सावध राहा. वेबसाइटची url म्हणजे पत्तापण तपासा.

बीबीसी, द क्विंट, द गार्डियन किंवा टाइम्स ऑफ इंडिया यांची साइट तुम्ही बघत आहात असं कदाचित तुम्हाला वाटू शकेल पण 'डॉट कॉम'च्या ऐवजी 'डॉट इन' किंवा 'डॉट को' असा छोटासा बदलसुद्धा पूर्ण नवीन वेबसाइट ओपन करू शकतो.

उदाहरणार्थ www.bbcmarathi.in ही बीबीसी मराठीची वेबसाइट नाही. ती www.bbcmarathi.com अशी आहे.

4. तारीख चेक करा

कुठलीही माहिती वर्ल्ड वाइड वेब (www) वर आल्यावर ती कायमस्वरुपी तिथंच राहते. हीच बाब बातम्यांसाठीही लागू आहे.

सर्वच विश्वसनीय बातम्यांमध्ये स्रोताची माहिती दिलेली असते. शिवाय प्रसिद्धीची तारीखही असते, ही चांगली गोष्ट मानायला हवी. कुठलीही बाब शेअर करताना ती कधी प्रसिद्ध झाली आहे, हे जरूर तपासून पाहा.

Image copyright Getty Images

जुने लेख, विशेष करून दहशतवाद्यांशी लढाई किंवा सतत बदलणाऱ्या आर्थिक विकासाच्या बातम्यांचं महत्त्व हे काळानुरूप असतं. एकदा ती वेळ निघून गेल्यावर त्यांचं महत्त्व संपतं.

5. खात्री करून घ्या, ही मस्करी तर नाही ना!

फेकिंग न्यूज किंवा ओनियन यासारख्या वेबसाइटवर छापून आलेले लेख, बातम्या या विशेषकरून मस्करी किंवा थट्टा करण्याच्या उद्देशाने टाकलेल्या असतात.

Image copyright SAM PANTHAKY/AFP/GETTY IMAGES

अशा बातम्या वास्तविक तथ्यांवर आधारित नसतात आणि शक्यता आहे की त्या चालू घडामोडींवर केंद्रित असतात. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या बातम्यांचं माध्यम हे एखादी व्यंगात्मक टीका करणारी वेबसाईट तर नाही ना!

6. वेबसाइटवर 'अबाउट'चं पेज नक्की पाहा

प्रत्येक विश्वसनीय प्रकाशकांचं स्वतःच्या संस्थेविषयी माहिती देणारं 'अबाउट'चं पेज नक्की असतं. ते वाचा.

प्रकाशकाच्या विश्वसनीयतेविषयी माहिती देतानाच त्यावर ही संस्था कोण चालवते हेही कळेल. एकदा हे कळल्यावर त्यांचा कल, उद्देश समजण्यासही सोपं जाईल.

7. बातमीवर स्वतःची प्रतिक्रिया आजमावा

बातमी खोटी आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचं असेल तर सोपं आहे. ती बातमी वाचल्यावर तुमच्यावर काय परिणाम झाला? हे बघा.

Image copyright SCREENSHOT

बातमी वाचल्यानंतर तुम्हाला राग आला, अभिमान वाटला किंवा दुःख झालं का? जर असं जाणवलं तर बातमीतल्या तथ्यांची तपासणी करण्यासाठी तत्काळ गुगलमध्ये माहिती सर्च करा.

खोट्या बातम्या यासाठीच तयार केल्या जातात, जेणेकरून त्यातून लोकांच्या भावना भडकाव्यात आणि जास्तीत जास्त त्या पसराव्यात.

शेवटी ज्यावेळी तुमच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतील अशाच वेळी तुम्ही ती बातमी शेअर कराल ना!

8. हेडलाईनच्या पलीकडेही बघा

जर तुम्हाला भाषा आणि वाक्यरचनेत असंख्य चुका आढळून आल्या आणि फोटोचा दर्जाही खराब असेल तर तथ्यांची पडताळणी जरूर करायला पाहिजे.

गुगलच्या जाहिरातींमधून जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी अनेक वेबसाइट या खोट्या बातम्या पसरवण्याचे प्रकार करतात.

शेवटी एक गोष्ट महत्त्वाची ठरते, डिजिटल वर्ल्डमध्ये सर्व बातम्या या प्रेक्षक किंवा वाचकांवर अवलंबून असतात. तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर किंवा चॅटमध्ये अशा किती बातम्या शेअर करता हे त्यावर ठरतं.

पण जर तुम्ही कळून सवरून असत्य किंवा द्वेष पसरवणाऱ्या बातम्या शेअर करत असाल तर त्याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाईही होऊ शकते. त्यासाठी शेअर करा पण जबाबदारीनं.

(हा लेख बीबीसी हिंदी आणि 'द क्विंट' यांच्या सहकार्याने राबवण्यात येत असलेल्या 'स्वच्छ डिजिटल इंडिया'चा एक भाग आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)