#5मोठ्याबातम्या : 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच' गीत गायल्यामुळे चंद्रकात पाटील वादाच्या भोवऱ्यात

चंद्रकांत पाटील Image copyright Twitter
प्रतिमा मथळा चंद्रकांत पाटील

सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रीपद सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच' हे कन्नड अभिमान गीत गायल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. यासह इतर ठळक बातम्यांचा घेतलेला हा आढावा.

लोकमतच्या वृत्तानुसार, बेळगावजवळच्या गोकाक तालुक्यातल्या तवगमध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमास पाटील यांना हजेरी लावली होती. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कन्नडमधून 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे' (हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचं गीत गायलं. कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांनी कानडी लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान मराठी युवा मंच एकीकरण समितीनं पाटील यांचा निषेध केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांनी मराठी जनतेची माफी मागावी, असं म्हटलं आहे.

सरकारी सेवा केंद्रांवर पतंजली उत्पादनं?

राज्य सरकारने 'आपलं सरकार सेवा केंद्रा'च्या माध्यमातून सर्व सेवा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता याच केंद्रावर स्वामी रामदेव यांची पतंजली उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी दिली आहे.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान विभागानं नुकतंच काढलेल्या एका परिपत्रकानुसार ग्रामीण तसंच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर 'आपले सरकार सेवा केंद्र' स्थापन केली जाणार आहेत. 'आपले सरकार' पोर्टलवर उल्लेख करण्यात आलेल्या सर्व ऑनलाईन सेवा 'आपले सरकार सेवा केंद्रा'मार्फत देण्यात येतील.

सरकारने या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांसह पतंजली कंपनीची उत्पादनंही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या परिपत्रकात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये पतंजलीच्या उत्पादनांशिवाय इतर कोणत्याही खासगी कंपनीचा उल्लेख नाही.

Image copyright MONEY SHARMA/GETTY IMAGES

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्ट केलं आहे की पतंजलीप्रमाणंच इतर उत्पादकांनी आमच्याशी संपर्क साधल्यास, त्यांनाही यात सहभागी करून घेण्याचा आमचा विचार आहे.

'राजकारण्यांनी सुप्रीम कोर्ट वादापासून दूर राहावं'

सरकार आणि राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वादापासून दूर रहावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

"या विवादापासून स्वतःला दूर ठेवायला हवं, असं मी मानतो. सरकारने पण यापासून दूर राहिलं पाहिजे. देशातल्या राजकीय पक्षांनी यात पडू नये," असं पंतप्रधान मोदी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

Image copyright Getty Images

"आमच्या देशाच्या न्यायालयीन व्यवस्थेचा मोठा इतिहास आहे. ते फार सक्षम लोक आहेत. ते आपसांत बसून त्यांच्या शंकांचे निरसन करतील, समाधानपूर्वक तोडगा काढतील. मला आपल्या न्याय प्रथा-प्रणालीवर पूर्ण विश्वास आहे," असं मोदी या मुलाखतीत म्हणाल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

आगामी बजेट हे लोकप्रिय नसेल, असे संकेतही पंतप्रधानांनी मुलाखतीदरम्यान दिले.

'मोदीभक्तांनाही लाजवेल अशी BCCI करतं विराटभक्ती'

ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक रामचंद्र गुहा यांनी 'द टेलीग्राफ' या वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या एका लेखात भारतीय क्रिेकेट नियामक महामंडळाची (BCCI) तुलना मोदी सरकारशी केली आहे.

"जेवढी भक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या मंत्रिमंडळाकडून केली जाते, त्याहीपेक्षा जास्त भक्ती BCCIकडून विराट कोहलीची केली जाते," असं गुहा यांनी या लेखात म्हटलं आहे.

Image copyright JEWEL SAMAD/GETTY IMAGES

गुहांच्या या लेखाचा संपादीत अंश अनेक वर्तमानपत्रांमध्ये आला आहे. त्यात 'सकाळ'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, "कोहलीच्या अधिकारापलीकडील क्षेत्रांमध्येही त्यानं व्यक्त केलेल्या मतापुढं मंडळाकडून मान तुकविली जाते. BCCIच्या अधिकाऱ्यांनी कोहलीचा उल्लेख करताना कायम विराट असाच केला आहे. थेट विराट अशा नामोल्लेखामधून जवळीक दाखविण्याचा कदाचित BCCIचा उद्देश असेल. मात्र वर्तणूकशास्त्राच्या दृष्टिकोनामधून पाहिलं असता, ही जवळीक मालक आणि नोकर, अशा नात्याची असल्याचं आढळतं," असं गुहा या लेखात म्हणाले आहे.

सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी BCCIच्या कार्यपद्धतीत नियमितता आणण्यासाठी एका चार सदस्यीय मंडळाची नियुक्ती केली होती. त्यात गुहा होते. मात्र जून महिन्यात गुहा यांनी या समितीतून राजीनामा दिला होता, त्यावेळीही त्यांनी "क्रिकेटमधल्या सुपरस्टार कल्चरवर" टीका केली होती.

नवे मुख्य निवडणूक आयुक्त

नुकतंच आम आदमी पार्टीच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती हे सोमवारी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आता ओम प्रकाश रावत काम पाहतील.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

ज्योती यांच्या आधी नसीम जैदी मुख्य निवडणूक आयुक्त होते, ज्यांचा कार्यकाळ जुलै 2017 मध्ये संपला होता.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एका पत्रकातून ही माहिती समोर आली आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)