जातपंचायतीविरोधात उभे राहिले आहेत कंजारभाट समाजातील तरुण

प्रियांका तमाईचिकर Image copyright Priyanka Tamaichikar
प्रतिमा मथळा कंजारभाट समाजातील प्रियांका तमाईचिकर कौमार्य चाचणीविरोधात उभी राहिली.

पुण्यात पिंपरी येथील भाटनगर येथे कंजारभाट समाजाच्या तीन तरुणांना मारहाण झाली. कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीला विरोध केल्याने मारहाण झाली असं या तरुणांचं म्हणणं आहे.

याप्रकरणी कंजारभाट समाजातील 40 जणांवर पिपंरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चारजणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पण समाजातील काही लोकांकडून धमक्या येत असल्याचं तरुणाचं म्हणणं आहे.

कंजारभाट या समाजात पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा आहे. तसंच जातपंचायतीच्या प्रत्येक बैठकीच्या वेळी संबंधित कुटुंबांना आर्थिक रक्कम भरावी लागते. अशा प्रथांविरोधात याच समाजातील तरुणांनी अभियान सुरु केलं आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून Stop The V Ritual हा व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला आहे. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी विवेक तमाईचीकर आणि प्रशांत इंद्रेकर यांच्यासारखे तरुण समाजातील लोकांशी संवाद साधत आहेत.

पिंपरीमधील कंजारभाट समाजाच्या एका लग्नसमारंभात रविवारी जातपंचायतीमधील वादातून मारहाणीची घटना घडली.

"पिंपरी येथे सनी मलके यांच्या बहिणीच्या लग्नासाठी आम्ही गेलो होतो. लग्न लागल्यानंतर जातपंचायतीची बोलणी सुरु होती. लग्नातील वधू आणि वर यांच्या कुटुंबांनी पंचाना पैसे देण्याची 'खुशी' नावाची प्रथा आहे. हे आर्थिक शोषण आहे. 'खुशी' या प्रथेविरोधात मत व्यक्त केल्याने जातपंचायतीतील सदस्य नाराज होते. तिथून निघताना जवळपास चाळीस लोकांनी मारहाण केली", प्रशांत इंद्रेकर याने सांगितलं.

Image copyright Vivek Tamaichikar
प्रतिमा मथळा प्रशांत इंद्रेकर

"कौमार्य परीक्षेला विरोध करून मीडियासमोर समाजाची बदनामी करता, असा आरोप जातपंचायतीतील सदस्यांनी केला", असं प्रशांतने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे. कंजरभाट जातपंचायतीचा व्हिडिओ घेताना वाद झाल्याचंही प्रशांतने सांगितलं.

प्रशांत इंद्रेकर याच्यासोबत असणाऱ्या सौरभ मछले आणि प्रशांत तामचीकर या दोघांनाही मारहाण करण्यात आली. प्रशांत इंद्रेकर आणि प्रशांत तामचीकर यांचा पुण्यात स्वत:चा व्यवसाय असून मारहाण झालेला सौरभ अकरावीत शिकत आहे.

पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये या तरुणांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंजरभाट समाजातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल यांनी बीबीसीला आरोपी आणि तपासाविषयी माहिती दिली. "मारहाण प्रकरणी सनी मलके, विनायक मलके, अमोल भाट आणि सुशांत रावळकर यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आलं आहे."

"जातीने लादलेल्या प्रथेविरोधात तरुण वर्ग अधिक प्रमाणात पुढे येऊन बोलायला तयार आहे. मात्र काही कुटुंबामध्ये आजही अनेकांवर दबाव असल्याने ते पुढे येऊन बोलत नाही. हा लढा असाच आम्ही सुरू ठेवणार आहोत," असं प्रशांतने म्हटलं आहे.

कंजरभाट समाजाच्या जातपंचायतीविरोधातील ही तिसरी तक्रार दाखल झाल्याचं विवेक तमाईचिकर यांनी सांगितलंय. विवेक हे कंजारभाट समाजाचे असून त्यांनी काही तरुण मुलं आणि मुलींच्या मदतीने या समाजातील अन्यायकारक प्रथांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

"भारताची राज्यघटना असताना कंजारभाट समाजाने 2000 साली प्रतिसंविधान लिहिलं. या प्रतिसंविधानानुसार महाराष्ट्रभर वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जातपंचायत काम करते. त्यांची स्वतंत्र न्याय आणि दंडव्यवस्था आहे. त्यातील अनेक प्रथा अनिष्ट आणि अमानुष असून त्याला आमचा विरोध आहे", असं विवेक म्हणाला.

त्याआधी या समाजाच्या चालीरिती मौखिक स्वरूपात होत्या. हा समाज महाराष्ट्रात भाट या नावाने तर गुजरातमध्ये सहसंमल नावाने ओळखला जातो.

Image copyright Vivek Tamaichikar
प्रतिमा मथळा कंजारभाट समाजातील तरुणांनी जातीप्रथांच्या विरोधात 'Stop The V Ritual' हा गट स्थापन केला.

"आमच्या "Stop The V Ritual" या उपक्रमात सक्रिय असणाऱ्या सदस्यांना एक प्रकारे बहिष्कृत केल्याचा अनुभव येतोय. पंचायतीत मत मांडू न देणं, समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ न देणं असे प्रकार सुरु झाले आहेत", असं विवेक यांने सांगितलं.

अंबरनाथमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत विवेकला बोलवण्यात आलं नाही. पण अभियानात सामील झालेल्या लोकांविरोधात अजब फतवे काढले जात असल्याचं विवेक यांनी सांगितलं. अभियानातील लोकांवर मानहानीचे खटले दाखल करा, तसंच वेळप्रसंगी स्त्रियांना विनयभंगाचे गुन्हे दाखल करायला सांगा, असे निर्णय जात पंचायतीच्या बैठकीत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

कौमार्य चाचणीविरोधात अभियान

कंजारभाट समाजात लग्न झाल्यानंतर नवविवाहित वधूची कौमार्य चाचणी करण्याची प्रथा आहे. या प्रथेविरोधातही #STOPVTEST हे अभियान गेल्या महिन्यात सुरू केलं. कंजारभाट समाजाची सर्वांत मोठी नाराजी या प्रथेविषयी चर्चा केल्याच्या विरोधात आहे.

बीबीसी मराठीने कंजारभाट समाजातील पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.

"लग्नामध्ये कौमार्य चाचणी बंद झाली पाहिजे या मागणीवर जातपंचायतीची नाराजी असून त्यामुळे समाजाची बदनामी होतेय असं पंचांचं म्हणणं आहे", असं विवेक यांनी सांगितलं.

Image copyright Vivek Tamaichikar
प्रतिमा मथळा कांजरभाट समाजातील विवेक तमाईचिकर हे TISS या संस्थेत एमए करत आहेत.

या समाजात हिंदू वैदिक पद्धतीने लग्न करण्याची प्रथा आहे. लग्न पार पडल्यानंतर त्याच लग्नमंडपात पंचायत भरवून वर आणि वधूला कौमार्य चाचणीसाठी मानसिकदृष्ट्या तयार केलं जातं. कंजारभाट समाजाच्या कलम 38 (4) नुसार या नवविवाहित जोडप्याला लॉजमध्ये नेलं जातं. त्यावेळी दोन्हीकडचे मोजके नातेवाईक आणि पंच उपस्थित असतात. कौमार्य चाचणी ही खासगीपणाच्या हक्काला पायदळी तुडवणारी आहे असं विवेक यांचं म्हणणं आहे.

विवेकचा कंजारभाट समाजातल्या एका मुलीसोबत नुकताच साखरपुडा झाला. त्याने आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीने लग्नाच्या वेळी कौमार्य चाचणी करायला विरोध दर्शवली आहे.

'लॉजच्या खोलीची तपासणी केल्यानंतर घृणास्पद खेळ सुरू होतो. पांढऱ्या शुभ्र चादरीवरील लाल रक्ताच्या डागाचा तमाशा पाहण्यासाठी हा खेळ असतो.'

'हा खेळ इतका क्रूर आहे की कधी-कधी हे पंच नवऱ्या मुलाला ब्लू फिल्म पाहायला लावतात, औषध किंवा दारू प्यायला देतात. हा त्या वधू वर अमानुष असा अत्याचार आहे', विवेक यांनी या प्रथेविषयी माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी चादरीला रक्ताचा डाग लागला नाही म्हणून पंचांनी नववधूला चपलेने मारहाण केली होती, त्याविरोधात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

कौमार्य चाचणीला विरोध करण्याचा निर्धार याच समाजातील अनेक तरूण-तरूणींनी उघडपणे केला आहे.

पिंपरीच्या भाटनंगरमध्ये राहणारी प्रियांका तमाईचिकर ही 23 वर्षांची तरूणीदेखील #STOPVTEST अभियानात सामील झाली आहे. 'चारित्र्यावर संशय घेणं आणि मुलींवर व्यभिचाराचा आरोप करणं हा कसला न्याय? असा सवाल प्रियांका विचारते.

प्रसारमाध्यमांशी बोलल्याबद्दल प्रियांकाला कंजरभाट समाजातून धमक्या येत आहेत. तिच्या कुटुंबाचा तिला पाठिंबा असला तरी ती राहते त्या ठिकाणी ती सुरक्षित नाही, असं तिचं म्हणणं आहे. "ही प्रथा बंद करण्यासाठी गेल्या ती महिन्यांपासून आम्ही समाजातील तरूण-तरूणींना संघटीत करतोय", अशी माहितीही तिने दिली.

कौमार्य चाचणीविरोधात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेकदा आवाज उठवला आहे. अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांच्या मते, "कंजारभाट समाजातील कौर्माय चाचणीबाबत तक्रारी करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. आता याच समाजातील काही तरुण पुढे येऊन या प्रथेविरोधात लढा देत आहे. त्यांना मारहाण केली जात आहे. हे निषेधार्थ आहे. वेळीच कारवाई झाली असती तर अशा प्रकारची घटना घडली नसती."

त्यामुळे पोलिसांनी तातडीने जात पंचायतीच्या प्रमुखांना अटक करावी, अशी मागणी नंदिनी जाधव यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)