पाहा व्हीडिओ : शहाजीराजांच्या या वेरूळच्या गढीबद्दल माहीत आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : शहाजीराजांची वेरूळची गढी (शूट : अमेय पाठक)

औरंगाबादजवळचं वेरूळ जगप्रसिद्ध आहे तिथल्या लेण्यांसाठी. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव, अशीही याची ओळख सांगितली जाते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या वेरूळच्या गढीबद्दलची ही गोष्ट.

वेरूळ हे शहाजीराजे भोसले यांचं मूळ गाव. आजही वेरूळात शहाजी राजांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात.

दरवर्षी 18 मार्चला वेरूळ इथे शहाजीराजांच्या जयंतीचा कार्यक्रम केला जातो. 23 जानेवारी 1664 रोजी बंगळूरजवळील होदेगिरीच्या जंगलात शहाजीराजे शिकारीसाठी गेले असता घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला, असे दाखले इतिहासात दिले जातात. शहाजीराजांच्या 354वा स्मृतिदिनानिमित्त होदेगिरीत त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रमही झाला.

Image copyright Yogesh Keware

वेरूळलाही त्यांच्या गढीजवळ स्मारक उभारण्यात आलं आहे. इथे शहाजीराजे यांचे वडील मालोजीराजे यांचं निवासस्थान होतं. या गढीच्या भिंतींचे, बुरूजाचे आणि निवासस्थानाचे अवशेष आज इथे बघायला मिळतात.

गढीच्या परिसरात 2004 ते 2006 दरम्यान राज्य पुरातत्व विभागातर्फे उत्खनन करण्यात आलं. "या उत्खननामध्ये मूदपाकखाना, खोल्यांच्या जोत्यांचे अवशेष, पूर्व-पश्चिम भिंतीचा काही भाग तसंच धान्य कोठारं मिळाली", अशी माहिती राज्य पुरातत्त्व विभागाचे समन्वयक कामाजी डक यांनी दिली.

Image copyright AMEY PATHAK/BBC
प्रतिमा मथळा वेरूळ इथं असलेला शहाजी राजे यांचा पुतळा

"याच ठिकाणी लाल दगडातील गणपतीची मूर्ती, चांदीची अंगठी, तांब्याची नाणी, भाजलेल्या मातीचे दिवे, गळ्यातील दागिना, प्राण्यांच्या मूर्ती, काचेचे आणि मौल्यवान दगड तसंच शंखाच्या आणि काचेच्या बांगड्या मिळाल्या," असंही कामाजी डक यांनी दिली.

शहाजी राजे यांचं स्मारक

वेरूळ इथं या गढीच्या परिसरात सध्या एक ते पावणेदोन मीटर जाडीच्या आणि चार ते पाच मीटर उंचीच्या मातीच्या भिंती उभ्या आहेत.

या भिंती उभारताना माती, तण आणि कोंडा याचा वापर झाला आहे. पाच मीटर उंचीचा बुरूज इथे आहे. मालोजीराजांच्या गढीचं संरक्षित क्षेत्र सोडून दर्शनी भागात शहाजीराजांचं स्मारक उभारण्यात आलं आहे.

Image copyright AMEY PATHAK/BBC
प्रतिमा मथळा मालोजीराजे गढी परिसरातील अवशेष.

राज्य सरकारतर्फे 2008 मध्ये इथे स्मारकाचं काम सुरू झालं. शहाजी राजे स्मारक सल्लागार समितीचे सदस्य किशोर चव्हाण म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ वंशज हे वेरूळचे आहेत. बाबाजी भोसले यांच्यापासून वेरूळ इथं त्यांचा इतिहास सापडतो."

Image copyright AMEY PATAHK/BBC
प्रतिमा मथळा मालोजीराजे यांच्या गढीचा परिसर.

"ही जागा दुर्लक्षित होती. आज इथं शहाजी राजे भोसले यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी भारतातला त्यांचा पहिला पुतळाही उभारण्यात आला आहे", असं चव्हाण म्हणाले.

Image copyright AMEY PATAHK/BBC
प्रतिमा मथळा गढीच्या भितींचे अवशेष आजही इथं पहायला मिळतात.

"वेरूळ इथं 2004 आणि 2005 मध्ये उत्खनन झालं. उत्खनन करताना 22 खोल्या सापडल्या. राज्य पुरातत्त्व विभागानं त्याकाळातल्या वस्तू जमा करून त्यांच्या कार्यालयात ठेवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनं 2008 ला स्मारक सल्लागार समिती स्थापन केली", अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

बाबाजी भोसले यांची जहागिरी

राज्य पुरातत्त्व विभागाचे पुरातत्व समन्वयक कामाजी डक यांनी मालोजीराजे भोसले यांच्या इतिहासासंदर्भात माहिती दिली.

"छत्रपती शिवाजीराजे यांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावची पाटीलकी होती. तसंच परिसरातील गावांची जहागिरीही होती. बाबाजी भोसले यांच्या कार्यकाळात हा मुलुख निजामशाहीच्या अंमलाखाली होता. त्यांना मालोजीराजे आणि विठोजीराजे अशी दोन मुलं होती," असं डक म्हणाले.

Image copyright AMEY PATAHK/BBC
प्रतिमा मथळा राज्य सरकारने 2008 मध्ये या परिसरात स्मारक उभारलं.

"मालोजीराजे यांना दोन मुलं होती. त्यापैकी थोरले शहाजीराजे तर धाकट्या मुलाचं नाव शरीफजी होतं. शहाजीराजे यांचा जन्म इथेच वेरूळला झाला. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर निजामशहानं त्यांची जहागिरी त्यांच्या मुलांना दिली. विठोजी राजे यांच्या मार्गदर्शनाने सुरुवातीला त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार बघितला," असं डक यांनी सांगितलं.

इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी शहाजीराजे आणि वेरूळ यांचा फार जवळचा संबध असल्याची माहिती दिली. "वेरूळ हे त्यांचं वतनाचं गावं होतं. त्याकाळी दौलताबाद आणि वेरूळ एकच समजलं जायचं. अहमदनगरच्या निजामशाहीचं राज्य सांभाळताना मोगलांशी लढाईचं नियोजन निजामशहानं इथूनच केलं," असं मोरवंचीकर म्हणाले.

मालोजीराजांनी बरीच जनहितार्थ आणि धार्मिक कार्यं केली. शिखर शिंगणापूरातील तलाव, वेरूळच्या घृष्णेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार ही काही उल्लेखनीय कार्य असल्याचं डक म्हणाले.

Image copyright AMEY PATAHK/BBC

याचा उल्लेख डॉ. ब्रह्मनंद देशपांडे लिखित शोधमुद्रा या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडातही आढळतो. आक्रमकांनी घृष्णेश्वराचं मंदिर पाडल्यानंतर मालोजी राजे यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. पण मराठी बखरी, कागदपत्रे आदी साहित्यात तसा उल्लेख आढळत नसल्याचं शोधमुद्रामध्ये म्हटलं आहे.

शिवाजींच्या कार्यामागे शहाजी राजांची परंपरा

रणजित देसाई यांच्या 'श्रीमान योगी'साठी नरहर कुरूंदकर यांनी त्यांना लिहिलेलं पत्रच प्रस्तावना म्हणून वापरलं आहे. या पत्रात कुरूंदकर यांनी "शिवाजीच्या कार्याला मागे शहाजीची परंपरा आहे. ही कल्पना मान्य केल्यावाचून काही घटनांची संगती लागतच नाही. कर्नाटकाची जहागिरी थोरला मुलगा संभाजीसाठी तर पुण्याची जहागिरी धाकटा मुलगा शिवाजीसाठी, असं नियोजन शहाजीने 1636लाच केलं," असं म्हटलं आहे.

Image copyright AMEY PATHAK/BBC
प्रतिमा मथळा शहाजी राजे यांचा पुतळा इथं उभारण्यात आला आहे.

"बंगळूरला संभाजी आणि पुण्याला शिवाजी यांच्या सर्व वागणुकीमध्ये योजनाबद्धता आणि एकसारखेपणा दिसतो. त्याचे कारण मागे शहाजींची पार्श्वभूमी व त्यांच्या तालमीत तयार झालेले सरदार, कारभारी हे आहे."

"मागे कर्तबगार शहाजी, पुढे कर्तबगार संभाजी, मध्ये महान निर्माता शिवाजी या मानवी पद्धतीने शिवाजीचे मोठेपण समजून घेतले जावे," असं नरहर कुरूंदकर यांनी पत्रात म्हटले.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)