रामेश्वरनाथ काव : बांगलादेश मुक्तीचे मास्टरमाईंड कसे बनले RAWचे पहिले प्रमुख?

रामश्वेरनाथ काव.
प्रतिमा मथळा इंदिरा गांधी यांच्या बाजूला बंद गळ्याच्या सूटमध्ये दिसणारी व्यक्ती म्हणजे RAWचे पहिले संचालक रामश्वेरनाथ काव.

1996मध्ये बांगलादेशचा 25वा स्थापना दिवसाचा उत्सव भारतात सुरू होता. यानिमित्ताने विविध बैठकांचं आयोजनही करण्यात आलं होतं.

एका बैठकीत एक बांगलादेशी पत्रकार मागच्या सीटवर बसलेल्या उंच, स्मार्ट आणि आकर्षक दिसणाऱ्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि म्हणाला, "सर, तुम्ही तिथं मंचावर मध्यभागी असायला हवं. तुमच्यामुळंच तर 1971 शक्य झालं होतं."

आकर्षक आणि काहीशा लाजाळू अशा या व्यक्तीनं उत्तर दिलं, "नाही, मी काहीच केलं नव्हतं. जे स्टेजवर बसले आहेत, त्यांचं कौतुक झालं पाहिजे."

आपल्याला कुणीतरी ओळखलं आहे, हे त्यांच्या लक्षात येताच ते तिथून उठले आणि शांतपणे सभागृहातून बाहेर पडले.

या व्यक्तीचं नाव होतं रामेश्वरनाथ काव. ते भारताची गुप्तचर संस्था RAWचे पहिले संचालक.

1982मध्ये फ्रांसची गुप्तचर संस्था SDECEचे प्रमुख काऊंट एलेक्झाड्रे द मेरेंचे यांना विचारण्यात आलं होतं - 1970च्या दशकातले जगातले 5 सर्वश्रेष्ठ गुप्तहेर विभागप्रमुख कोण?

त्यांनी घेतलेल्या 5 नावांमध्ये एक नाव काव यांचंही होतं. ते म्हणाले होते, "ही व्यक्ती शारीरिक आणि मानसिक जडणघडणीचं उत्तम उदाहरण आहे. असं असतानाही ते आपले मित्र, आपलं यश यावर बोलताना फारच लाजतात."

पोलीससेवा ते अधिकारी

काव यांचा जन्म 10 मे 1918ला वाराणसीत झाला. 1940मध्ये ते भारतीय पोलीस सेवेची आयपी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना उत्तर प्रदेश केडर मिळालं होतं.

1948मध्ये जेव्हा इंटेलिजन्स ब्युरोची स्थापना झाली तेव्हा त्यांची नियुक्ती ब्युरोत साहाय्यक संचालक म्हणून झाली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

करिअरच्या सुरुवातीलाच त्यांना अत्यंत महत्त्वाची केस मिळाली होती.

1955मध्ये चीन सरकारने एअर इंडियाचं एक विमान 'काश्मीर प्रिसेंस' भाडेतत्त्वावर घेतलं होतं. हाँगकाँगवरून जकार्ताला जाणाऱ्या या विमानातून चू एन लाई हे चीनचे तत्कालीन पंतप्रधान बांडुंग संमेलनाला जाणार होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चऊ एन लाई आणि व्हिएतनामचे राष्ट्रपिता हो चीन मिन्ह यांच्या समवेत.

पण लाई यांना अपेंडिक्सचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी अखेरच्या क्षणी हा प्रवास रद्द केला. पण या विमानाला इंडोनेशियाजवळ अपघात झाला आणि त्यात असलेले चीनचे सर्व अधिकारी आणि पत्रकार ठार झाले होते.

या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी काव यांच्याकडे होती. त्यांनी तपास करून हा शोध लावला होता की या घटनेमागे तैवानच्या गुप्तचर संस्थेचा हात होता.

RAWची स्थापना

काव यांचे निवटवर्तीय आर. के. यादव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की या तपासामुळं चीनचे पंतप्रधान चू एन लाई भलतेच खूश झाले होते. त्यांनी काव यांना त्यांच्या कार्यालयात बोलवलं होतं.

या भेटीत त्यांनी काव यांना एक शिक्का भेट दिला होता, जो काव यांच्या टेबलवर अखेरपर्यंत होता.

Image copyright GETTY IMAGES
प्रतिमा मथळा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समवेत चू एन लाई

1968ला इंदिरा गांधी यांनी CIA आणि MI6च्या धर्तीवर भारताच्या बाहेर काम करण्यासाठी Research And Analysis Wing (RAW)ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेचे पहिले प्रमुख ठरले ते रामेश्वरनाथ काव.

1971ला झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात RAWने आपली उपयुक्तता सिद्ध केली. काव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेश 'मुक्तिवाहिनी'च्या एक लाखापेक्षा जास्त जवानांना भारतात प्रशिक्षण देण्यात आलं होतं. काव यांचं हेरगिरीचं तंत्र इतक भक्कम होतं की पाकिस्तान भारतावर कधी हल्ला करेल, याचीही माहिती त्यांना होती.

Image copyright Getty Images

RAWचे माजी संचालक आणि त्यांचे निकटवर्तीय आनंद कुमार वर्मा म्हणतात, "पाकिस्तानचे राष्ट्रपती याह्या खान यांच्या कार्यालयातल्या एका सूत्राने आम्हाला पाकिस्तान भारतावर कधी हल्ला कारणार, याची तारीख खात्रीलायकरीत्या सांगितली होती."

ते म्हणाले, "हा संदेश वायरलेसवरून सांकेतिक भाषेत आला होता. हा कोड वाचताना चुकून दोन दिवस आधीची तारीख वाचण्यात आली. त्यामुळे हवाई दलाला अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं. दोन दिवस काहीच न झाल्याने हवाई दल प्रमुखांनी काव यांना सांगितलं की आम्ही हवाई दलाला इतके दिवस सतर्क नाही ठेऊ शकत. त्यावर काव यांनी हवाई दलाला आणखी काही दिवस वाट पाहण्यास सांगितलं."

Image copyright GETTY IMAGES

अखेर 3 डिसेंबरला पाकिस्तानने हल्ला केला. पण या हल्ल्याला तोंड देण्यासाठी हवाईदल पूर्ण सज्ज होतं. हा जो एजंट होता त्याचं लोकेशन उत्तम होतं आणि वायरलेस यंत्रणाही होती.

सिक्कीमचं विलीनीकरण

सिक्कीमच्या भारताच्या विलिनीकरणात काव यांची मोठी भूमिका होती. फक्त चार अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हे विलिनीकरण घडवलं. इतकंच काय तर क्रमांक दोनचे अधिकारी शंकरन नायर यांनाही यातलं काहीच माहीत नव्हतं.

आर. के. यादव सांगतात, "सिक्कीमचं नियोजन काव यांचं होतं. पण त्यावेळी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व निर्विवाद बनलं होतं. बांगलादेश युद्धातल्या विजयामुळं त्यांचा आत्मविश्वास बळावला होता. सिक्कीमच्या राजानं अमेरिकेतल्या एका महिलेशी लग्न केल्यानंतर तिथं समस्यांना सुरुवात झाली होती. तिथं CIAने हस्तक्षेप सुरू केला होता."

यादव म्हणतात, "काव यांनी इंदिरा गांधींना सांगितलं की सिक्कीमचं भारतात विलिनीकरण शक्य आहे. हा एका प्रकारे अहिंसक सत्तापालट होता. विशेष म्हणजे हे सगळं चीनच्या नाकाखाली झालं होतं. चीनचं सैन्य सीमेवर होतं. पण इंदिरा गांधीना याची फिकीर नव्हती. त्यांनी 3,000 चौरस किलोमीटरच्या सिक्कीमचं भारतात विलीनीकरण केलं आणि सिक्कीम भारताच राज्य बनलं."

इंदिरा गांधींची पर्स

इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी काव यांच्यावरच होती. इंदर मल्होत्रा यांना काव यांनी एक किस्सा सांगितला होता -

काव आणि इंदिरा गांधी राष्ट्रकुल संमेलनासाठी मेलबर्नला जाणार होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा टीममधली एक व्यक्ती काव यांना भेटायला आली होता. त्यानं सांगितलं की इंदिरा गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर आहे.

Image copyright GETTY IMAGES
प्रतिमा मथळा इंदिरा गांधी

तो म्हणाला होता, "त्या जेव्हा कारमधून उतरतात तेव्हा त्यांची पर्स आणि छत्री माझ्या हातात देतात, मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. जेव्हा कुणी नेता कारमध्ये चढतो किंवा उतरतो तेव्हा अतिरेक्यांना गोळी चालवण्याची संधी असते. अशा वेळी माझे दोन्ही हात रिकामे असले पाहिजेत. शिवाय त्यांच्या कारमध्ये आणखी एक व्यक्तीही असणं आवश्यक आहे."

काव यांनी इंदिरा गांधींना हे सांगितल्यानंतर त्यांनी हे समजून घेतलं. त्यांनंतर त्यांनी आपली पर्स आणि छत्री त्या व्यक्तीकडे देणं बंद केलं. पण भारतात आल्यानंतर त्यांनी ही सवय पुन्हा सुरू केली.

काव यांना उंची कपड्यांचा शौक होता. यादव सांगतात, "निवृत्तीनंतर मी त्यांना नेहमी सूट आणि टायमध्येच पाहिलं आहे. कधीकधी ते खादीचा कुर्ताही वापरायचे. त्यांची शरीरिक ठेवण खेळाडूसारखी होती. त्यांच्याकडं एक घोडाही होता. ते म्हणायचे की त्यांचा निम्मा पगार घोड्यावरच खर्च होतो. ते त्यावेळचे 'बेस्ट ड्रेस्ड पर्सन' होते आणि त्यांच्याबद्दल अनेक अधिकाऱ्यांना असूयाही वाटायची."

प्रतिमा मथळा RAWसोबत काम केलेले आर. के. यादव यांनी मिशनR&AW हे पुस्तक लिहिलं आहे.

रॉचे निवृत्त अतिरिक्त संचालक राणा बॅनर्जी यांनी बीबीसीला सांगितलं की, काव यांचं बनियन जाळीदार असायचं. हे बनियन कलकत्त्याच्या गोपाळ होजियरी या कंपनीत बनायचं. ही कंपनी नंतर बंद पडली, तरीही काव यांच्यासाठी ते बनियन बनवून पाठवायचे.

राणा सांगतात, "माझी नियुक्ती कलकत्त्यात झाली, तेव्हा मला एका अधिकाऱ्यानं सांगितलं की मला आणखी एक काम करावं लागणार. ते म्हणजे, काव यांना गोपाळ होजियरीमधून बनियन पाठवणं. मला काव यांचाच एकदा फोन आला आणि मी त्यांना सांगितलं की बनियन पाठवल्या आहेत. पण मी पाठवलेल्या बनियन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मला त्या बनियनची रक्कम, म्हणजे 25 रुपये पोहोचले होते. ती इतके काटेकोर होते."

जनता सरकारकडून चौकशी

1977 मध्ये इंदिरा गांधी निवडणुका हरल्या आणि मोरारजी देसाई सत्तेत आले. मोरारजींना संशय होता आणीबाणीच्या काळात घडलेल्या मुस्कटदाबीत काव यांचाही हात होता. त्यांनी काव यांना तसं विचारूनही टाकलं. काव यांनी हे आरोप फेटाळले आणि हवी तर चौकशी करा, असं मोरारजींना सांगितलं.

त्यानंतर एस. पी. सिंह समिती नेमण्यात आली, जिने आणीबाणीत काव यांची काही भूमिका नव्हती, असा अहवाल दिला. RAWचे अधिकारी काव यांच्या या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची आजही आठवण करतात.

Image copyright PN DHAR
प्रतिमा मथळा RAWचे पहिले संचालक रामेश्वरनाथ काव आणि इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव पी. एन धर

अतिरिक्त सचिव पदावर काम केलेल्या ज्योती सिन्हा म्हणतात, "ते फारच सभ्य होते, सोफिस्टिकेटेड होते. त्यांची बोलण्यात गोडवा होता. ते म्हणायचे की जर तुमचा कोणी विरोध करत असेल तर त्याला विष देऊन कशाला मारता? त्याला मध देऊनही मारता येईल. सांगायचा अर्थ असा की त्यांना गोड बोलून तुमच्या बाजूनं वळवता येऊ शकतं. आम्ही त्यावेळी तरुण होतो आणि त्यांची अक्षरशः व्यक्तिपूजा करत होतो."

इतर देशांच्या गुप्तचर संस्थांच्या प्रमुखांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्याचा भारताला किती फायदा झाला याची माहिती सर्वसामान्य लोकांना कधीच समजणार नाही.

Image copyright GETTY IMAGES
प्रतिमा मथळा जॉर्ज बूश

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि CIA प्रमुख राहिलेले जॉर्ज बुश सिनियर यांनी त्यांना अमेरिकन काऊबॉयची लहान मूर्ती भेट दिली होती. या घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांना 'काऊबॉईज' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि मग काव यांनी या मूर्तीची एक फायबर प्रतिकृती बनवून RAWच्या मुख्यालयातल्या स्वागत कक्षात बसवून घेतली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)