'बाळासाहेबांची शेवटची भेट कायम लक्षात राहील!'

बाळासाहेब ठाकरे Image copyright STRDEL/Getty

24 एप्रिल 2012! बाळासाहेबांशी माझी शेवटची भेट झाली आणि काही महिन्यांतच ते गेले. ती तारीख माझ्या विशेष लक्षात राहण्याचं कारण म्हणजे त्यांच्या माझ्यावरच्या प्रेमाचं दर्शन घडवणारे दोन सुयोग त्या दिवशी घडले.

त्या सकाळी त्यांनी मला 'मातोश्री'वर बोलावलं. म्हणाले, "आज दीनानाथ पुण्यतिथी! लता मंगेशकरांनी मला संध्याकाळी 'षण्मुखानंद'मध्ये बोलावलं आहे. तिथं करायचं भाषण मी तुला दाखवतो. ते तू मोठ्यानं वाच. अशाकरता की, माझा घसा आज नीट काम देत नाहीये. तर मी अडलो की, मी तुझ्याकडे बघेन. पुढचं माझं तू वाच."

कमालीचा विश्वास त्यांनी दाखवला. आम्ही भाषणाची रिहर्सल केली.

संध्याकाळी 'षण्मुखानंद'च्या VIP रूममध्ये ते आणि दीदी बोलत होते. दोघं ग्रेट माणसं! म्हणून मी रूमबाहेरच उभा होतो. त्यांनी मला आत बोलावलं. शेजारी बसवलं आणि त्यांनी दीदींना सांगितलं, "माझं भाषण मी आणि सुधीर आज सादर करणार आहोत."

लतादीदी 'म्हणजे' या अर्थी खळाळून हसल्या.

Image copyright SUDHIR GADGIL
प्रतिमा मथळा लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे आणि सुधीर गाडगीळ

"माझी तब्बेत बरोबर नाही. मला दीनानाथांबद्दल जे बोलायचं ते मी लिहून काढलंय. आम्ही दोघं मिळून ते भाषण सादर करणार आहोत."

आणि त्या संध्याकाळी त्यांनी आपल्या भाषणात मध्येच थांबून काही भाग मला वाचायला सांगून त्यांच्या भाषणात मला सहभागी करून घेतलं. त्यांचं त्या संध्याकाळचं भाषण आम्ही दोघांनी मिळून सादर केलं.

सकाळी त्या भाषणाची तयारी करताना सहकाऱ्याला म्हणाले, "त्या कप्प्यातले डावीकडचे कागद काढ. दीनानाथांची माहिती आहे." संदर्भ असे नोंदवून ते कुठे ठेवले आहेत, हे त्यांना अचूक लक्षात होतं.

1974 साली टीव्हीवर 'आमची पंचविशी' या कार्यक्रमात मी त्यांच्या तरुणपणावर त्यांची मुलाखत घेणार होतो. म्हणाले, "माझ्या बरोबर कोण आहे?" म्हटलं, "व. पु. काळे!"

तसं मिश्कीलपणे म्हणाले, "आम्ही एकाच भागात राहतो म्हणून आमची जोडी वाटतं?" बोला आता!

तरुणपणाविषयी बोलताना बाळासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे त्यांच्यावर झालेले संस्कार, शिवसेनेची स्थापना, भाषणातलं मुद्द्यांचं, वाणीचं महत्त्व सांगितलं. व्यंगचित्रकलेवर बोलले.

संध्याकाळी टीव्हीवर येऊन सारं सांगितलं. अनेक पुस्तकांचे संबंध सांगितले. ती त्यांची मी घेतलेली पहिली मुलाखत.

Image copyright SUDHIR GADGIL
प्रतिमा मथळा बाळासाहेब ठाकरे आणि सुधीर गाडगीळ

या पहिल्या आणि 'षण्मुखानंद'मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळच्या गप्पा यांमध्ये जवळ जवळ बारा वेळा त्यांनी मला एकट्याला 'मातोश्री'वर बोलावून मुलाखती दिल्या.

मधल्या एका टप्प्यावर माझ्या साठीनिमित्त त्यांनी मला एक सुंदर मानपत्र दिलं.

त्यात त्यांनी म्हटलं की, तुम्ही 25 वर्षं शब्दसुमनांचा गजरा विणत आहात. आपल्याला ऐकणं हा अविस्मरणीय अनुभव असतो. यापुढे तुम्ही जेव्हा मुलाखत घ्याल, तेव्हा महाराष्ट्र म्हणेल की, ही मुलाखत सुधीर गाडगीळांनी घेतली आहे, म्हणजे मुलाखत देणारा 'मोठा माणूस'च असेल. हे त्यांचं दाद देण्याचं मोठेपण!

एका सत्कारात उत्सवमूर्ती म्हणून मी स्टेजवर त्यांच्या शेजारीच बसलो होतो. मला विचारलं, 'आई-वडील आलेत का?' म्हटलं, 'हो!'

सत्कार सोहळा सुरू झाला. मध्येच उभे राहून म्हणाले, "एका मध्यमवर्गीय घरातल्या पालकांनी आपल्या मुलाला निवेदनाच्या बेभरवशी व्यवसायात करिअर करायला प्रोत्साहन दिलं, तेव्हा सुधीरच्या आधी त्याच्या पालकांचा सत्कार करायला हवा."

त्यांनी प्रेक्षागारातून माझ्या आई-वडिलांना स्वत: व्यासपीठावर बोलावलं आणि त्या दोघांचा सत्कार केला. आम्ही तो क्षण कधीच विसरू शकत नाही.

त्यांच्याशी गप्पा मारताना जेव्हा त्यांना कळलं की, ह्या व्यवसायात काम करण्यासाठी आर्थिक स्थिती फारशी बरी नसताना माझ्या पत्नीनं मला सांगितलं, "तुम्ही नोकरी सोडून या व्यवसायात पडा. मी नोकरी करेन."

Image copyright SUDHIR GADGILK
प्रतिमा मथळा सुधीर गाडगीळ यांच्या कुटुंबीयांसह बाळासाहेब

ते ऐकून बाळासाहेब खुश झाले. माझ्या पत्नीला आणि मुलाला 'मातोश्री'वर बोलवून घेऊन, फोटो काढून भरभरून कौतुक केलं.

एकदा उद्धवजींनी सुचवलं की, साहेब तुमच्याशी मोकळेपणे बोलतात, तर त्यांची एक मुलाखत व्यक्तिगत विषयांवर घ्या! 'मातोश्री'वर आपण शूट करू!

बाळासाहेब शाल सरसावून बसले आणि म्हणाले, 'विचारा काहीही!'

व्यक्तिगत काय विचारणार! पण मी विचारलं, "तुम्ही प्रबोधनकारांसारख्या पुरोगामी विचाराच्या व्यक्तीचे चिरंजीव! पोथी, माळा, बुवा, महाराज यात न रमणारे. तरीही तुम्ही गळ्यात एवढ्या माळा कसल्या घालता?"

तशी आजोबांनी नातवाला समजावून द्यावं, अशा पद्धतीने गळ्यातली एक माळ हातात घेऊन म्हणाले, "तिच्या अंगावरचं आपल्या गळ्यात काहीतरी आठवण म्हणून असावं, म्हणून ही माळ घातली आहे."

त्यांनी त्या पाठोपाठ सर्व माळांचा हिशोब सांगितला. खरं तर ते बांधील नव्हते. पण आपुलकीनं त्यांनी तिरकस प्रश्नालाही सविस्तर उत्तर दिलं. काळानुसार बदलत गेलेल्या स्वत:च्या पोशाखावरही बोलले.

मी बाळासाहेबांचा कायम ऋणीच आहे.

तुम्ही हे वाचलंत का?