#5मोठ्याबातम्या : 'आत्मकेंद्रित आर्थिक धोरण दहशतवादाएवढच धोकादायक'

नरेंद्र मोदी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोदींच्या काळात आर्थिक विकासाचा दर कमी झाला आहे

जागतिकीकरणविरोधी अर्थव्यवस्था आणि आत्मकेंद्रीत आर्थिक धोरणांवर ताशेरे ओढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी वृत्ती दहशतवाद किंवा पर्यावरण बदलाएवढीच धोकादायक असल्याचं मत दावोसमध्ये व्यक्त केलं.

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक अर्थ परिषदेच्या उदघाटन समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. दावोसला भेट देणारे मोदी हे गेल्या 20 वर्षांतले पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

'द हिंदू'मध्ये आलेल्या वृत्तानुसार, मोदी म्हणाले, "देशांदेशांमध्ये व्यापार अधिक खुला होण्याऐवजी भिंती उभ्या केल्या जात आहेत. आयात करांमध्ये वा बिगर करविषयक अडथळ्यांमध्ये वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय व्यापार संकुचित होत आहे."

"अलीकडे देश आर्थिक विकासाबाबात स्वतःपुरताच विचार करत आहेत. या अडथळ्यांमुळे द्विपक्षीय व्यापार संबधालाच खीळ बसली असून हे धोकादायक आहे. जागतिकीकरणविरोधी प्रवाह अर्थव्यवस्थांसाठी आव्हान निर्माण करत आहे. त्यामुळे मतभेद आणि भेदाभेद दूर करून नव्या जगाची उभारणी केली पाहिजे," असं आवाहनही त्यांनी केल्याचं लोकसत्ताच्या वृत्तात म्हटलं आहे.

2. 'पद्मावत'वरून अहमदाबादेत जाळपोळ

अहमदाबादेत मंगळवारी रात्री 'पद्मावत' सिनेमाविरोधात करणी सेनेतर्फे काढण्यात आलेल्या कँडल मार्चला हिंसक वळण लागलं आणि अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली.

Image copyright Reuters

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, संध्याकाळी शहरातून कँडल मार्च काढण्यात आला होता, आणि आठ वाजल्यानंतर जाळपोळीला सुरुवात झाली.

150हून अधिक वाहनांचं या जाळपोळीत नुकसान झालं. तर मल्टीप्लेक्स आणि शहरातल्या पश्चिम भागातील एकपडदा सिनेमागृहांना लक्ष करण्यात आलं.

करणी सेनेचे गुजरात राज्य प्रमुख राज शेखावत यांनी, हिंसेचा प्रकार हा दुर्दैवी असून करणी सेनेचं त्याच्याशी काहीही संबध नाही, असं म्हणाले.

अॅक्रोपोलिस, अहमदाबाद वन, हिमालय मॉलसह सिनेमॅक्स सिनेमागृहाचं यात नुकसान झालं.

दिल्लीजवळील गुडगावमध्ये जिल्हा प्रशासनानं रविवारपर्यंत जमावबंदीचं आदेश लागू केले आहेत. गुडगावमध्ये 40 हून अधिक मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृह आहेत.

दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पद्मावत सिनेमाला पाठिंबा दर्शवत मुंबईतल्या संरक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे.

3. सोहराबुद्दीन प्रकरणात CBI विरोध करणार

सोहराबुद्दीन शेखच्या कथित एनकाऊंटर प्रकरणात भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या सुटकेविरोधात जी याचिका दाखल झाली आहे, त्याचा आम्ही विरोध करणार असल्याचं CBIने म्हटलं आहे.

Image copyright TWITTER/AMIT SHAH

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सोहाराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना ATSच्या पथकानं एनकाऊंटरमध्ये मारलं होतं. पण हे एनकाऊंटरच खोटं असल्याचा आरोप केला जातो.

बॉम्बे हायकोर्टात मुंबई वकील संघटनेतर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत विशेष न्यायालयातर्फे अमित शाह यांना आरोपमुक्त करण्याच्या निर्णायाला आव्हान देण्यात आलं आहे.

CBIने या याचिकेला विरोध करणार असल्याचं न्यायालयात सांगितलं.

4. हदिया प्रकरण : विवाहाची चौकशी करता येणार नाही

केरळमधल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करू शकेल, मात्र त्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या विवाहाची चौकशी करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले.

Image copyright Reuters

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील हदिया या महिलेचा विवाह म्हणजे 'लव्ह जिहाद' होय, असा आरोप करण्यात आला होता. काही हिंदुत्ववादी संघटनांचा असा आरोप आहे की मुस्लीम तरुणांकडून हिंदू महिलांची प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करून त्यांच्याशी जबरदस्तीने विवाह केला जातो. त्यानंतर त्यांचं इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केलं जातं, ज्याला त्यांनी 'लव्ह जिहाद' म्हटलं आहे.

एका मुस्लीम माणसाशी लग्न होण्याआधी हदिया हिंदू होत्या. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून NIA तपास करत आहे.

"तपासामध्ये प्रगती झाली आहे. आम्हाला त्याची चिंता नाही. तुम्ही तपास करून एखाद्याला अटक केली तरी आम्हाला चिंता नाही. तुम्ही तपास करू शकता. मात्र एखादी स्त्री आणि पुरुष यांच्या विवाहाबाबत तुम्हाला तपास करता येणार नाही. एखाद्या प्रौढाने कोणाशी विवाह करायचा ही त्याची निवड आहे," असं सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.

5. शेअर बाजाराला अवकाली उधाण

देशातील दोन्ही प्रमुख निर्देशांकातील आठवड्याच्या दुसऱ्या सत्रातील उधाणाने गुंतवणूकदार कोट्यावधीने श्रीमंत बनले. मंगळवारी सेन्सेक्स 36,150 नजीक पोहोचला तर निफ्टी 11,100 नजीक पोहोचला.

Image copyright Getty Images / INDRANIL MUKHERJEE
प्रतिमा मथळा बाँबे स्टॉक एक्सचेंज

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, अवघ्या आठवड्याच्या आत दोन्ही निर्देशांकांनी 1,000हून अधिक अंशांची भर घातली आहे. दोन्ही निर्देशांकांनी मंगळवारी त्यांचे आधीचे विक्रम मोजीत काढून गेल्या काही सलग सत्रातील तेजीला आणखी गती दिली.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2018-2019 करिता व्यक्त केलेल्या भारताच्या 7.4 टक्के सकल राष्ट्रीय उत्पादनाची जोड यासाठी पूरक ठरली.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)