लैंगिकतेमुळे होस्टेलमधून बाहेर काढलेला समर्पण मैती कसा बनला 'मिस्टर गे इंडिया'?

समर्पण मैती Image copyright QGRAPHY/FACEBOOK
प्रतिमा मथळा समर्पण मैती

13 जानेवारीला समर्पण मैतींचं आयुष्य कायमचं बदललं. याच दिवशी 29 वर्षीय समर्पण यांनी 'मिस्टर गे इंडिया'चा मान पटकावला.

हो! 'मिस्टर गे इंडिया'चा मान!

मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स यांच्याबद्दल तर तुम्ही ऐकलं असेलच. त्याच प्रकारच्या पुरस्कारांत 'मिस्टर गे इंडिया'चा पुरस्कार मोडतो.

नावावरूनच समजून येतं की या स्पर्धेत केवळ गे (समलैंगिक) पुरुष सहभागी होतात आणि आपल्या लैंगिकतेविषयी सार्वजनिकरीत्या सजग असतात.

2009 पासून भारतात 'मिस्टर गे इंडिया' स्पर्धेचं आयोजन होत आहे. या वर्षी 'मिस्टर गे इंडिया' स्पर्धा समर्पण मैती यांनी जिंकली आहे. LGBT समुदायातल्या प्रसिद्ध लोकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात समर्पण यांच्या नावाची घोषणा झाली तोच टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजानं सभागृह दणाणून गेलं.

Image copyright QGRAPHY/FACEBOOK

पश्चिम बंगालच्या छोट्याशा गावात वाढलेल्या समर्पण यांच्यासाठी हे सगळं स्वप्नवत होतं. काही वर्षांपूर्वी समर्पण स्वत:लाच नाकारत होते, लोकांची चेष्टा आणि कुटुंबाला समजावण्याच्या अयशस्वी प्रयत्नांशी झुंजत होते.

काही दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्येचाही विचार केला होता. पण आता सर्वकाही बदललं आहे. ते अभिनंदनाच्या मेसेज आणि कॉल्सना उत्तरं देत आहेत, मुलाखती देत आहेत.

"सुरुवात जरी कठीण असली तरी शेवटी सर्व काही सुरळीत होतं," ते आता हसून सांगतात.

Image copyright SAMARPAN MAITI

समर्पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजीमध्ये संशोधन करत आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "पदवीच्या काळात मी हॉस्टेलमध्ये राहत होतो. तिथं मित्रांवर विश्वास ठेवून मी त्यांना माझ्या लैंगिकतेबद्दल सांगितलं. पण त्यानंतर माझं तिथं राहणं कठिण होऊन बसलं."

परिस्थिती इतकी बिघडली की समर्पण यांना हॉस्टेल सोडावं लागलं. "माझ्या रूममेटसोबत माझी खूप चांगली मैत्री होती. पण कुणीतरी अफवा पसरवली की आम्ही दोघं कपल आहोत. पण तसं काही नव्हतं."

एकतर रूममेटपासून वेगळा हो किंवा हॉस्टेल सोड, असं त्यांना सांगण्यात आलं. समर्पण यांनी हॉस्टेल सोडण्याचा पर्याय निवडला.

Image copyright QGRAPHY/FACEBOOK

पण LGBT समुदाय आणि ही चळवळ खूप अर्बन-सेंट्रीक, अर्थात शहरांमध्ये केंद्रीत असल्याची तक्रार समर्पण करतात.

"आमच्या समुदायातले जास्त लोक मोठ्या शहरांतले आहेत. ते अस्खलित इंग्रजी बोलतात आणि महागड्या जागांवर मीटिंग्स करतात. त्यामुळे कुणी समलैंगिक गावाहून आला असेल अथवा मागास भागातून आला असेल तर त्यांच्यामध्ये सामावणं त्याच्यासाठी अवघड असतं."

समर्पण यांनाही या भेदभावाला सामोरं जावं लागलं. त्यांनी सांगितलं, "मी कोलकत्याला आलो तेव्हा लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण हळूहळू मी माझी स्वतंत्र ओळख बनवली."

Image copyright ANWESH SAHOO/FACEBOOK
प्रतिमा मथळा अन्वेष साहू, मिस्टर गे-2016

समर्पण यांना लिखाणाची आणि मॉडेलिंगची आवड आहे. ते सांगतात, "जेव्हा लोकांनी माझं लिखाण वाचलं, माझी मॉडेलिंग बघितली, माझ्यातला आत्मविश्वास पाहिला तेव्हा ते स्वत:हून माझ्याकडे आले."

'मिस्टर गे इंडिया'नंतर समर्पण मे महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 'मिस्टर गे वर्ल्ड' स्पर्धेत भाग घेणार आहेत.

यात विशेष असं काय?

विशेष असा लूक आणि सौंदर्याच्या जोरावर या प्रकारच्या स्पर्धा जिंकता येतात का? मिस्टर गे वर्ल्डचे संचालक सुशांत दिवगीकर यांच्यानुसार असं अजिबात नाही.

Image copyright MGWI/FACEBOOK
प्रतिमा मथळा 'मिस्टर गे इंडिया' चे टॉप-5 फायनलिस्ट

त्यांनी सांगितलं, "या स्पर्धा मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड यांपेक्षा वेगळ्या आहेत. मिस्टर गे बनण्यासाठी तुम्हाला उंच अंगकाठी, गोऱ्या त्वचेचं आणि सौंदर्यवान अथवा अविवाहित असण्याची काही गरज नाही. LGBT समुदाय पूर्वीपासूनच अनेक भेदभावांचा बळी ठरला आहे. आम्हीही तसंच वागलो तर लोक आमच्यावर हसतील."

याच कारणामुळे तुम्ही आतापर्यंत 'मिस्टर गे' बनलेल्या लोकांवरून नजर फिरवली तर तुम्हाला लक्षात येईल की ते एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. ते पुढे सांगतात, "तुम्ही मागील वर्षीचे विजेते अन्वेश साहू आणि समर्पण यांचंच उदाहरण घ्या. दोघंही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. अन्वेश सावळा आणि सडपातळ तर समर्पण गोरा आणि तब्येतीनं दांडगा आहे."

कसे बनले मिस्टर गे?

'मिस्टर गे'ची निवड कशी केली जाते? यात भाग घेण्यासाठीच्या अटी काय आहेत? फक्त तीनच अटी असतात :

  • 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचा कुणीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकतो.
  • तो भारतीय नागरिक असायला हवा.
  • तो गे असायला हवा आणि सार्वजनिक जीवनात आपल्या ओळखीविषयी सहज असायला हवा.

सुशांत यांनी सांगितलं, "स्पर्धेतल्या नोंदणीनंतर अनेक राउंड्स होतात. उदाहरणार्थ, मिस्टर फोटोजेनिक राउंड आणि पीपल्स चॉईस राउंड. स्पर्धकांना मुलाखत आणि ग्रूप डिस्कशनमध्येही (गटचर्चा) सहभागी व्हावं लागतं."

यानंतर मिस्टर गेचं नाव जाहीर केलं जातं. आणि त्याला मिस्टर वर्ल्ड स्पर्धेचं प्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं.

या स्पर्धांचं आयोजन का?

"या प्रकारच्या स्पर्धांमुळे समुदायाच्या लोकांना एकमेकांशी भेटायला मिळतं," असं सुशांत यांना वाटतं. यात सहभागी होण्यामुळे सर्वांना एक व्यासपीठ मिळतं ज्याच्या माध्यमातून त्यांना त्यांचं मतं सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळते," सुशांत सांगतात.

Image copyright QGRAPHY/FACEBOOK

"भारतासारख्या देशांत याप्रकारच्या स्पर्धेंचं आयोजन करणं खूप गरजेचं आहे. कारण इथं गे, लेस्बियन असंही काही असतं, हेही लोकांना माहिती नसतं. ज्यांना माहिती असतं, ते याला चुकीचं समजतात," सुशांत पुढे सांगतात.

समर्पण यांना हा पुरस्कार जिंकण्याची अपेक्षा होती?

याचं उत्तर देताना ते म्हणतात, "हो नक्कीच. परंतु माझ्या इंग्रजीमुळे मी थोडासा अस्वस्थ होतो. मी ठीकठाक इंग्रजी बोलू शकतो पण माझ्या इंग्रजीत तो स्पष्टपणा नाही जो मोठ्या शहरांतल्या लोकांमध्ये असतो."

"असं असतानाही ज्युरींनी मला निवडल्यामुळे मी ही स्पर्धा जिंकू शकलो, त्यामुळे मी खूश आहे."

समर्पण यांना ग्रामीण भागात जाऊन फक्त LGBT, लैंगिक विषयांवरचं काम करायचं नाही तर आरोग्यविषयक समस्यांवरही काम करायचं आहे. तसंच चित्रपट निर्मितीचीही त्यांना आवड आहे. या क्षेत्रातही समर्पण हात आजमावणार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)