पद्मावत : करणी सेनेचं काम चालतं तरी कसं?

पद्मावत Image copyright Narayan Bareth

जर तुम्ही गुगलवर शोध घेतला तर तुम्हाला कळेल की, जानेवारी 2017च्या आधी इंटरनेट युजर्सना करणी सेनेत जास्त रस नव्हता. पण गेल्या काही काळात कोण करणी सेना हे शोधायला अनेक जण गुगलवर गेले असतील. पद्मावत चित्रपटाचा विरोध विशेषतः दीपिका पादुकोणचं नाक कापण्याची धमकी दिल्यानंतर करणी सेना अचानक चर्चेत आली आहे.

देशातल्या अनेक लोकांना ही करणी सेना नक्की कसं काम करते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यांचं काय उद्दिष्ट आहे? आणि 'पद्मावत'ला ते का विरोध करत आहेत?

जयपूरमध्ये करणी सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एका मल्टिप्लेक्ससमोर जमलेल्या विद्यार्थ्यांबरोबर बातचीत करून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला.

राजकीय संघटना नाही

करणी सेना कोणतीही राजकीय संघटना नाही. पण राजकीय पक्ष त्यांच्या मागे हात बांधून उभे असल्याचं दिसतं.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सोशल मीडियावर करणी सेनेचा मेसेज आल्यावर रजपूत युवकांचा जथ्था जयपूरच्या मल्टीप्लेक्स सिनेमा हॉलसमोर गोळा झाला.

जोशपूर्ण भाषण आणि भावनिक आव्हानानंतर जेव्हा रजपुतांच्या 'आन बान शान' चे दाखले दिले गेले तेव्हा समोर जमलेल्या जमावाच्या डोळ्यासमोरून त्या काळाचा आणि किल्ल्यांचा इतिहास तरळून गेला.

Image copyright PADMAAVAT/FACEBOOK

या गर्दीत कोणी महाविद्यालयात शिकणारा तरुण होता तर कोणी अन्य शिक्षण संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी होते.

जयपूरमध्ये कायद्याचे शिक्षण घेणारे दलपिंत सिंह देवडा सांगतात, "करणी सेना रजपुतांचं रक्षण करते असं नाही तर पण ही संघटना समाजहिताची चिंता करते. आज रजपूत लोक बेरोजगार फिरत आहेत. करणी सेना हिंदू संस्कृतीच्या रक्षणाचं काम करत आहे."

काही रजपूत युवक आरक्षणाचा आधार आर्थिक निकषांचा असावा अशी मागणी करत आहेत.

जैसलमेरमध्ये राहणारे त्रिलोकसुद्धा याच गर्दीचा भाग आहेत.

त्रिलोक सांगतात, "रजपूत तरुण शिकत आहेत आणि त्यांची वाढ होते आहे. आरक्षणानं प्रगती खुंटते. या रजपूत युवकाचं म्हणणं आहे की, ते आरक्षण बंद करायला सांगत नाहीत, तर आरक्षण धोरणात काही सुधारणा करायला हव्यात, अशी त्यांची मागणी आहे."

एका मेसेजवर कसे येतात शेकडो युवक?

करणी सेनेनं राजस्थानमधील रजपूतबहुल जिल्ह्यात आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यांच्या आवाहनावर युवक लगेच एकत्र येतात.

करणी सेनेचे पदाधिकारी शेर सिंह सांगतात, "जयपूरमध्ये रजपुतांची स्थिती मजबूत आहे. जयपूरमध्ये झोटवाडा, खातीपुरा, वैशाली आणि मारलीपुरा अशी रजपूतबहुल वस्ती आहे जिथे करणी सेनेच्या आवाहनाला लगेच प्रतिसाद दिला जातो आणि युवक लगेच धावत येतात. मागच्या काही काळात करणी सेनेने आपला विस्तार वाढवला आणि राज्याच्या बाहेर आपली उपस्थिती दाखवली."

Image copyright Narayan Bareth

नाव न जाहीर करण्याच्या अटीवर रजपूत समाजातील एक तज्ज्ञ सांगतात, "गेल्या काही वर्षांत रजपूत समाजानं नोकरी आणि व्यापारानिमित्त दुसऱ्या राज्यांत आपलं स्थान निर्माण केलं आहे. राजस्थानहून कोणी रजपूत अस्मितेबद्दल बोललं तर या लोकांना फार आवडतं. म्हणूनच जेव्हा या करणी सेनेचा कोणी पदाधिकारी पद्मावत चित्रपटाबद्दल दुसऱ्या राज्यात जाऊन बोलला तरी त्याला तेवढाच पाठिंबा मिळतो."

ते सांगतात, "तसं राज्याच्या सगळ्या प्रमुख शहरांत राजपूत सभा काम करते आणि क्षत्रिय युवक अनेक देशांत संघटित होऊन काम करतात. पण करणी सेनेने आपला वेगळा मार्ग चोखाळला आणि स्वत:ला युवकांभोवती केंद्रित केलं."

खरी करणी सेना कोणती आहे?

रजपूत समाजाच्या एका व्यक्तीनं ओळख लपवण्याच्या अटीवर सांगितलं की, करणी सेना अशी पहिली संघटना आहे जी जातीय अस्मितेच्या मुद्द्यावर गल्लीबोळांत सक्रिय झाली. आपल्याला इतिहासाशी जोडलं जातं आहे याचा तरुणाईला आनंद वाटत आहे.

ते सांगतात की बेरोजगारी हा मोठा मुद्दा आहे. पहिली पिढी शहरात स्थलांतरित झाली तेव्हा त्यांना नोकऱ्या मिळाल्या. आता दुसरी पिढी आली आहे आणि ते रोजगारापासून दूर आहेत. मग हिंदुत्वाची वकिली करणाऱ्यांना पण करणी सेनेच्या घोषणा आणि मुद्दे अनुकूल वाटू लागले.

Image copyright Getty Images

समाजाच्या या विकास आणि विस्तारामुळे करणी सेनेचं त्रिभाजन झालं. आता हे तिन्ही विभाग हे स्वत:ला खरीखुरी करणी सेना म्हणवून घेतात. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की आता तो कोर्टात गेला आहे.

त्यात एक 'श्री राजपूत करणी सेना' आहे. त्यांचे संरक्षक लोकेंद्र सिंह कालवी आहेत.

दुसरी 'श्री राजपूत करणी सेवा समिती' अजित सिंह मामडोली यांची आहे. तिसरी सुखदेव सिंह गोगामेडी यांची 'श्री राजपूत करणी सेना' आहे.

करणी सेनेचे महिपाल सिंह मकराना सांगतात की, लोकेंद्र सिंह कालवी यांनी या संघटनेची उभारणी केली आहे आणि तीच खरी संघटना आहे.

ते सांगतात, "ही एक युवाकेंद्रित संघटना आहे. बाकी संघटनांत वयाने मोठे लोक आहेत. ही संपूर्णपणे युवकांची संघटना आहे. या तिघांची स्वतंत्र कार्यालयं आहेत. त्यात साधनसामग्री आणि पैसा कुठून येतो?"

"आमच्याकडे कोणता खजिना नाही आणि कोणी खजिनदारही नाही. आम्ही वर्गणी घेत नाही. लोक सहकार्यानं ही संघटना चालवतात."

श्री करणी सेवा समितीचे मामडोली सांगतात, "आमची संघटनाच मूळ संघटना आहे. म्हणून ते कोर्टात गेले. त्यांच्या संघटनेच्या स्थापनेला 11 वर्षं झाली आहेत. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे गोगामेडी जातीय अस्मितेच्या बरोबर हिंदुत्वाच्याही घोषणा देत आहेत."

"ते नुकतेच विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडियांना भेटले. गोगामेडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान करतात. त्यांच्या संघटनेचे अनेक नेते व्यापारी आहेत. कोणी रिअल इस्टेट मध्ये तर कोणी खाणकामाच्या उद्योगात आहे. काही लोकांच्या विरुद्ध गुन्हेगारी खटलेही दाखल झाले आहेत."

Image copyright Getty Images

गोगामेडी सांगतात, "हो. अनेक गुन्हे दाखल झाले आहेत जे अनेकदा संघर्ष करताना दाखल झाले आहेत आणि त्यातून ते दोषमुक्तही झाले आहेत. जेव्हा तुम्ही पीडितांविरुद्ध आवाज उठवता तेव्हा तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो. या संघटनांनी आधी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि तीच मोहीम चालवली. मग जिथे जिथे जातीचे मुद्दे उपस्थित करता येतील अशा ठिकाणी संघटना गेली."

मामडोली सांगतात, "जेव्हा चित्रपटात राजपुतांचं चुकीचं चित्र दाखवणं सुरू झालं तेव्हा संघटना सक्रिय झाली. याच भूमिकेतून जोधा अकबरलाही विरोध केला. मागच्या वर्षी आनंदपाल यांचा पोलीस चकमकीत मृत्यूमुळे करणी सेना चर्चेत आली. संजय लीला भन्साळींच्या चित्रपटामुळे त्यांना आणखी एक मुद्दा मिळाला."

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे गोगामेडी सांगतात, "जेव्हा आमच्या समाजात कोणत्याही अधिकाऱ्याबरोबर अन्याय झाला आमि राजकीय पक्षांनी त्यावर मौन बाळगलं तर करणी सेनेला आवाज उठवण्यावाचून कोणताच पर्याय उरत नाही. पण राजपूत समाजात अनेत असे लोक आहेत ज्यांना बदलत्या परिस्थितीची काळजी वाटते आहे."

काही विश्लेषक सांगतात की, "राजकीय पक्षांनी स्वत:ला निवडणूक लढवण्यापुरतं आणि सरकार चालवण्यापुरतं मर्यादित केलं आहे. म्हणूनच जातीयवादी संघटनांना खतपाणी मिळत आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)