#5मोठ्याबातम्या : 'परत सांगतो सोडून जाईन!' राज ठाकरेंची उद्धववर टीका

राज ठाकरेंचं कार्टून Image copyright FACEBOOK/RAJ THACKAREY
प्रतिमा मथळा राज ठाकरेंचं कार्टून

शिवसेना-भाजपच्या युतीसंघर्षावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून उपहासात्मक टीका केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा मंगळवारी मुंबईत केली.

राज यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शिवसेनेच्या या घोषणेची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र टाकलं आहे.

आपल्या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सत्तेवर लाथ मारण्याच्या घोषणेला नाटकाची उपमा दिली आहे, असं लोकसत्ताच्या वृत्तात म्हटलं आहे.

या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोटावर बसून 'सत्ता सोडू का?' अशी धमकी देताना दाखवले आहेत.

2. 'गोपनियतेचा हक्क आणि राष्ट्रहित यामध्ये हवं संतुलन'

UIDAI ने जमा केलेल्या डेटाचा गैरवापर होणार नाही किंवा तो लीक होणार नाही, याची काळजी घेणं आधारशी निगडीत खरी समस्या आहे, असं सुप्रीम कोर्टानं बुधवारी म्हटलं आहे.

आधारच्या वैधतेबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान बोलताना कोर्टानं म्हटलं आहे की, दहशतवादाचा मोठा धोका आणि समाज कल्याणासाठीच्या उपाययोजनांवर सरकारनं हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत.

अशा वेळी नागरिकांचा गोपनीयतेचा हक्क आणि राष्ट्रहित यामध्ये समतोल साधणं आवश्यक आहे, असं द टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तात कोर्टानं म्हटलं आहे.

Image copyright SAJJAD HUSSAIN/GETTY IMAGES

खाजगी आयुष्यात लोक काय करतात, हे ट्रॅक करण्यासाठी डेटाचा वापर होऊ नये, पण कधीकधी राष्ट्रहितासाठी डेटा ट्रॅक करण्यास हरकत नसावी, असं न्यायालयानं सांगितलं.

3. पद्मावतविरोधाचे लोण महाराष्ट्रातही

'पद्मावत' चित्रपटाविरोधात पेटलेल्या आंदोलनाचं लोण महाराष्ट्रातही पोहोचलं आहे. बुधवारी अनेक ठिकाणी तोडफोड, निदर्शनं झाली.

लोकमतच्या वृत्तानुसार, करणी आणि राजपूत सेनेच्या आंदोलनांमुळं गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी हा चित्रपट पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित होत आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई करत एकट्या मुंबईतच १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली.

Image copyright TWITTER/DEEPIKA PADUKONE

ठाणे, डोंबिवलीत बुधवारी थ्रीडी चित्रपटाचे खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 35 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यात मंगळवारी मध्यरात्री 25 जणांनी सातारा-मुंबई महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यात 10 वाहनांचं नुकसान झालं. पोलिसांनी 15 जणांना अटक केली.

औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर इथं निदर्शनं झाली. धुळे महामार्गावर रास्ता रोको झाला. नाशिकला गंगापूर धरणावरील जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळले.

दुसरीकडे, मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी 'पद्मावत'च्या प्रदर्शनाला संरक्षण देण्याचं वक्तव्य केलं होतं. ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचा खुलासा मनसेनं केला आहे.

4. यवतमाळ प्रकरणात कंपन्यांना क्लीन चिट

कीटकनाशकांच्या फवारणीमुळं विदर्भात झालेल्या शेतकरी मृत्यूंच्या प्रकरणात कीटकनाशक कंपन्यांना चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आली.

प्रतिमा मथळा यवतमाळमध्ये आजही सुरक्षा साधनांशिवाय शेतात फवारणी केली जाते.

दिव्य मराठीनं याबाबत वृत्त दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर एसआयटीनं हा अहवाल न्यायालयात सादर केला.

कोणतीही संरक्षक उपकरणं उपलब्ध न करता शेतमजुरांना फवारणीची कामं देणाऱ्या शेतमालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशी शिफारस या मृत्यूंची चौकशी करणाऱ्या एसआयटीनं अहवालात केली आहे.

अमरावतीच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील SITनं आपल्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.

SITनं कीटकनाशक कंपन्यांना दोषी धरलेलं नाही. तसंच, मृत्यूंची व्याप्ती वाढण्यात स्थानिक प्रशासनही जबाबदार असल्याचा उल्लेख अहवालात असला तरी कोणत्याही अधिकाऱ्याचं नाव घेण्यात आलेलं नाही.

मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाच्या वापरामुळं जास्तीत जास्त मृत्यू झाल्याचं SITला आढळल्यानं या कीटकनाशकावर बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.

5. बँकांना सरकारी मदत

थकीत आणि वसूल न होणाऱ्या कर्जांच्या समस्येमुळं बँका त्रस्त आहेत. अशा 20 बँकांना फेरभांडवलीकरणाच्या मोहिमेत चालू आर्थिक वर्षांत 88,139 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

Image copyright Getty Images

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, सर्वाधिक मदत IDBI बँकेच्या वाट्याला आली आहे. या बँकेला 10,160 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.

या 20 बँकांच्या वित्तीय आवश्यकतांचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर ही रक्कम निश्चित करण्यात आल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं.

या 88,139 कोटी रुपयांपैकी 80,000 हजार कोटी रुपये हे 'रिकॅपीटल बाँड'च्या स्वरूपात असतील. तर 8,139 कोटी रुपये अर्थसंकल्पीय साह्याच्या स्वरूपात असतील.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)