#5 मोठ्या बातम्या : भाजप सोडण्यास भाग पाडू नका - खडसे

एकनाथ खडसे Image copyright Twiiter/eknath khadse

"भारतीय जनता पक्ष सोडण्याची आपली इच्छा नाही पण आपल्याला पक्षच बाहेर ढकलत आहे," असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. मी पक्ष सोडावा यासाठी परिस्थिती निर्माण केली जात आहे, असं वक्तव्य खडसे यांनी रावेर येथे केल्याचं वृत्त लोकसत्तानं दिला आहे.

"आपण पक्षाची 40 वर्षं निष्ठेनं सेवा केली पण राज्यात सरकार आल्यावर माझ्यावर विविध आरोप झाले. मी राजीनामाही दिला. आता चौकशीचे अहवाल देखील आले आहेत. जर त्यात आपण काही केलं हे आढळलं तर ते जनतेसमोर खुले करावं," असं खडसे यांनी म्हटलं.

पद्मावत विरोधात हिंसक निदर्शनं करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- आदित्यनाथ

Image copyright Twitter/Deepika Padukone
प्रतिमा मथळा पद्मावत चित्रपटात दीपिका पदुकोणने राणी पद्मावती यांची भूमिका साकारली आहे.

"पद्मावत विरोधात हिंसक निदर्शनं करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा," असा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे असं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे. राज्यभरात पद्मावतचं प्रदर्शन शांततेत व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चित्रपटगृहांबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

राजपूत करणी सेनेनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केल्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. लखनऊमध्ये अनेक मल्टीप्लेक्समध्ये या चित्रपटाचं प्रदर्शन होत आहे, या ठिकाणी बाउंसर्सची सेवा घेण्यात आली आहे. सर्व राज्यात शांततेत चित्रपट पाहता येईल, अशी ग्वाही आदित्यनाथांनी दिली आहे. योगी आदित्यनाथांचा हा पवित्रा पाहून करणी सेनेनी गुलाबाची फुलं वाटून 'गांधीगिरी' करत निदर्शनं केल्यांचं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.

अभय बंग आणि राणी बंग यांना पद्म पुरस्कार जाहीर

Image copyright TWitter/Maha Info centre
प्रतिमा मथळा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अभय बंग आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केल. डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

3 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण आणि 73 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 14 महिलांचा तर 16 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ASEAN ला 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त केंद्रानं ASEAN राष्ट्रांतील 10 जणांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव केला आहे. प्रसिद्ध संगीतकार इल्लाया राजा यांना पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

इतरांच्या भावना न दुखवता देखील आपण असहमती दर्शवू शकतो- राष्ट्रपती

Image copyright Twitter/rashtrapti bhavan

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केलं. जातीपातीतील भेदभाव आणि प्रांतवादातून होणाऱ्या हिंसेमुळं देशाचं नुकसान होतं असं ते आपल्या संदेशात म्हणाले. दूरदर्शनवर त्यांच्या संदेशाचं प्रसारण करण्यात आलं.

नागरिकांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं तरच सजग राष्ट्र निर्माण होतं, असं ते यावेळी म्हणाले. आपण कुणाच्या मताशी सहमत नसलो तरी आपण त्यांच्या भावना न दुखवता आपली असहमती दर्शवू शकतो, यालाच बंधुत्व म्हणतात, असं ते म्हणाले. आपल्या शिक्षण पद्धतीचा दर्जा सुधारला गेला पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)