कोल्हापूर : ड्रायव्हरच्या ओव्हरटेकनं घेतला 13 जणांचा बळी

अपघात Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक फोटो

कोल्हापूरमध्ये मिनी ट्रॅव्हलर बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जण मृत्युमुखी पडले. बहुतेक सर्व प्रवासी पुण्याचे रहिवासी होते.

शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात झाला आणि मिनीबस 100 फूटांवरून नदीत कोसळली. कोल्हापूर पोलिसांनी हा अपघात दाखवणारं सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध केलं आहे.

अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 8 मुलं आणि 5 महिलांचा समावेश आहे. पुण्याच्या बालेवाडीमध्ये राहणाऱ्या केदारी, वरखडे आणि नांगरे कुटुंबीयांचा अपघातग्रस्तांमध्ये समावेश आहे.

क्रेनच्या साहाय्यानं बस बाहेर काढण्यात आली.

नेमकं काय घडलं?

सहा वर्षांनंतर मुलगा झाला म्हणून नवस फेडायला गेलेली ही सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी गणपतीपुळ्याहून परत होती. त्यावेळी शिवाजी पुलावर चालकाचं मिनीबसवरील नियंत्रण सुटलं.

त्यामुळे गाडी पंचगंगा नदीत कोसळून हा अपघात झाला. अपघातग्रस्त गाडीत १६ लोक होते. त्यात चालकासह तीन महिला, चार मुली, तीन मुलं आणि दोन पुरुष असे १३ जण ठार झाले. भरत सदाशिव केदारी यांचा मुलगा, दोन सुना, मुलगी, जावई आणि सात नातवंडे जागीच ठार झाले.

भरत केदारी यांचा मुलगा सचिन याला संस्कृती ही मुलगी आहे. तिच्यानंतर आता नऊ महिन्यापूर्वी त्यांना मुलगा झाला. या बाळाला देवाच्या पायावर घालण्याचा नवस पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय शुक्रवारी पहाटे पाच वाजता बालेवाडीहून साई ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी मिनीबसमधून निघाले. दुपारनंतर ते गणपतीपुळ्याला पोहचले.

चालकाचं नियंत्रण सुटलं

रात्री ११.३० सुमारास ही मिनी बस पन्हाळ्याच्या दिशेनं कोल्हापूरकडे येत होती. त्याचवेळी कोकणातून कोल्हापूरकडे येणाऱ्या एसटी बसला मिनी बसच्या चालकानं ओव्हरटेक केलं.

नेमका तेव्हाच एक मोटारसायकलस्वार समोरून आल्यानं त्याला चुकविण्याच्या नादात चालकाचं नियंत्रण सुटले आणि ही मिनीबस उजव्या बाजूचा पंधरा फूटाचा पूलाचा मजबूत दगडी कठडा फोडून शंभर फूट खाली पंचगंगा नदीत कोसळली. पंचगंगा घाटाकडील बाजूला ही बस कोसळली.

मदत आली पण...

कोसळताना बस पहिल्यांदा नदीच्या काठावरील खडकांवर समोरच्या बाजूनं आपटली यावेळी प्रचंड मोठा आवाज झाला. बसचा मागचा दरवाजा उघडला गेला. खडकावरून आदळून ती पाण्यात कोसळल्यावर गाडीतील लोक जागे झाले.

वाचवा...वाचवा अशा हाका मारत मदतीची याचना केली. त्याचवेळी तोरस्कर चौकात बसलेली तरुण मुलं मदतीला धावली त्यांनी तिघांना बाहेर काढून सीपीआर रुग्णालयात दाखल केलं.

तोवर बसमध्ये पाणी जाऊन ती बुडाल्यानं आत राहिलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यातील बरेच जण झोपेतच होते. पहाटे 3 वाजता क्रेनच्या साहाय्यानं ही मिनी बस बाहेर काढण्यात आली. त्यात 12 जणांचे मृतदेह सापडले. सकाळी सातच्या दरम्यान केलेल्या शोधकार्यात नऊ महिन्याच्या बाळाचा मृतदेह हाती आला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)