येमेन संकटः एडनमध्ये सरकारी इमारतींवर फुटीरतावाद्यांचा ताबा

एडनवर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

एडनवर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला आहे.

दक्षिण येमेनच्या एडन शहरात फुटीरतावाद्यांनी सरकारी इमारतींचा ताबा घेतला आहे. इथं राष्ट्रपती अबेदरब्बू मंसूर हादी यांच्या सैन्यात आणि फुटीरतावाद्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.

फुटीरतावाद्यांनी सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पंतप्रधान अहमद बिन दागर यांनी केला आहे. आतापर्यंतच्या संघर्षामध्ये किमान दहा लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.

येमेन सरकारनं सध्या एडनमध्ये तात्पुरता लष्करी तळ तयार केला आहे. कारण येमेनची राजधानी सना सध्या हौदी बंडखोरांच्या ताब्यात आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून युद्धा थांबवण्यात आलं असून सैन्याला शस्त्रसंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

येमेनच्या शेजारील अरबी देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी विनंती सरकारनं केली आहे.

येमेनमधल्या नागरिकांना आधीपासूनच हालाखीच्या परिस्थितींचा सामना करावा लागत असून त्यांना मदतीची गरज आहे. त्यात पुन्हा नव्यानं निर्माण झालेल्या युद्धसदृष्य परिस्थितीमुळे जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.

एडनमध्ये नेमकं काय सुरू आहे?

1990 मध्ये दक्षिण आणि उत्तर येमेनच्या विलीनीकरणानंतर सध्याच्या येमेनची स्थापना झाली. पण अद्यापही दक्षिण येमेनमधल्या फुटीरतावाद्यांच्या भावना शांत झालेल्या नाहीत.

फुटीरतावादी आतापर्यंत हौदी बंडखोरांच्याविरोधात सरकारचं समर्थन करत होतं. पण काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि भेदभावाचा आरोप केला. ज्यामुळे तणावात आणखी भर पडली आहे.

फोटो स्रोत, AFP

पंतप्रधान दागर यांना हटवण्यासाठी फुटीरतावाद्यांनी राष्ट्रपती हादी यांना काही दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत संपताच रविवारी युद्धाला सुरूवात झाली.

या दक्षिणी फुटीरतावाद्यांना संयुक्त अरब अमिरातचं (UAE) समर्थन मिळालेलं आहे. हौदी बंडखोरांच्याविरोधात लढणाऱ्या सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये त्यांचा सहभाग आहे.

UAE नं तातडीनं पावलं उचलावीत अशी विनंती पंतप्रधान दागर यांनी केली आहे. या यंघर्षामुळे हौदी बंडखोरांनाच फायदा होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सौदी अरेबियामध्ये वास्तव्याला असणारे राष्ट्रपती हादी यांनी संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलं आहे. त्या त्यांच्या सरकारनं आपल्या समर्थक तुकड्यांना परत फिरण्याचे आदेश दिले आहेत.

ज्यावेळी एडनमध्ये संघर्ष सुरू झाला होता, त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या सौदी अरेबिया आणि UAEच्या सैन्यानं त्यात हस्तक्षेप केला नाही, असं काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

इतर भागात काय आहे परिस्थिती?

राजधानी सनाबरोबरच उत्तर आणि पश्चिम भागावर हौदी बंडखोरांचं नियंत्रण आहे. 2014 मध्ये बंडखोरांनी राजधानीवर ताबा मिळवला होता. त्यानंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीनं सरकारला समर्थन दिलं होतं.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : येमेनमधला संघर्ष निर्माण करतंय मानवी संकट

कित्येक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आणि आघाडीनं केल्या गेलेल्या नाकाबंदीमुळे येमेनमध्ये निर्माण झालेली परिस्थिती ही सध्याच्या काळातलं सर्वांत वाईट मानव निर्मित संकट असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

येमेनमधल्या तीन चतुर्थांश जनतेला मदतीची गरज आहे. यातले तर अनेकजण फक्त अन्न मिळत नसल्यानं भूकबळीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)