काबुलमध्ये लष्करी तळावर अतिरेकी हल्ला

अफगाण सैनिक Image copyright Reuters

काबुलमधल्या लष्करी तळावर अतिरेकी हल्ला झाला आहे.

या हल्ल्यात 2 अफगाण सैनिकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही सुरू असलेल्या या हल्ल्यात 10 जण जखमी झाल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं आहे.

पाच अतिरेक्यांनी हा हल्ला केला आहे. त्यातल्या तिघांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 100 जणांचा मृत्यू झाला.

इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्या हल्ल्याच्या प्रमाणात गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे.

काबुलच्या पश्चिम भागत रात्री साडे बाराच्या सुमारास हा हल्ला झाला.

मोठ्या शस्त्रसाठा आणि रॉकेट लाँचरसह अतिरेकी आल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, एका अतिरेक्याला अटक करण्यात आली असून अणखीन एकाची सुरक्षा दलासोबत चकमत सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

सुरक्षा दलानं हा संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला असल्याचं टोलो वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

एकाही अतिरेक्याला पहिल्या गेटमधून पुढे जाता आलेलं नाही, अशी माहिती राष्ट्राध्यांच्या प्रवक्त्यांनी दिली असल्याचं टोलोनं म्हटलंय.

अफगाफीस्तानचं हे लष्करी तळ गेल्या काही दिवसांपासून सतत अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहे.

हे लष्करी तळ मार्शल फाहिम डिफेंस युनिव्हर्सिटीच्या अगदी जवळ आहे. जिथं तालिबानी अतिरेक्यांनी आधीही हल्ला केला होता.

ऑक्टोबर 2017मध्ये झालेल्या या हल्ल्यात 15 सैनिकांचा मृत्यू झाला होता.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)