#5मोठ्याबातम्या : जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीवर आरोप निश्चित

सूरज पांचोली Image copyright STR/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा सूरज पांचोली

पाहूयात आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. सुरज पांचोलीवर आरोप निश्चित

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा खास मित्र अभिनेता सूरज पांचोली याच्यावर मंगळवारी जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप विशेष महिला न्यायालयानं निश्चित केला.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, सूरजनं हा आरोप अमान्य असल्याचं सांगितल्यानं 14 फेब्रुवारीपासून त्याच्याविरूद्धच्या खटल्याला सुरूवात होणार आहे.

खासगी न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेच्या वैद्यकीय अहवालाचा दाखला देत जियानं आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या करण्यात आली होती, असा आरोप तिची आई राबिया हिनं केला होता.

याशिवाय महाराष्ट्रातीलच दुसऱ्या एका प्रकरणात, पानसरे हत्याप्रकरणी डॉ. तावडे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला कोल्हापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करणे आणि दर शनिवारी SIT हजेरी लावणे आदी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

2. IPS अधिकाऱ्यावर गुन्हा

वाळू कंत्राटदारावर दोषारोपपत्र दाखल करताना मदत केल्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी नांदेडच्या इतवारा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक जी. विजयकृष्णन यांच्याविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

Image copyright NOAH SEELAM/GETTY IMAGES

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं मंगळवारी ही कारवाई केली. इतवारा उपविभागात असताना तिवसा येथील वाळू कंत्राटदाराला यादव यांनी संपर्क साधून पैशांची मागणी केली.

दोन लाखांपैकी एक लाख रुपये घेऊन आलेल्या वाळू कंत्राटदारानं यादव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती सन्नीसिंग इंदरसिंग बुंगई याच्याकडे देण्यास सांगितले.

कंत्राटदरानं अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली असल्यानं या विभागानं जी. विजयकृष्ण यादव यांच्यासह एकाविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

3. ग्रामीण मुलींना 5 रुपयांत 8 नॅपकीन्स

जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील विद्यार्थिनींना पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकीनचे पॅकेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Image copyright SAM PANTHAKY/GETTY IMAGES

लोकमतच्या वृत्तानुसार, 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुली सर्वसाधारणपणे वर्षांतील 50 ते 60 दिवस मासिक पाळीच्या काळात शाळांमध्ये अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. हे टाळण्यासाठी त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषद शाळांतील मुलींना महिन्यातून एकदा एक पॅकेट पाच रुपयांत दिले जाईल. त्यासाठी स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी धर्मा पाटील यांच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी बैठकीत खरमरीत टीका केली. "आधीच्यांनी शेण खाल्ले म्हणून लोकांनी आपल्याला सत्तेत बसवले. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये आपले सरकार धर्मा पाटील यांना का न्याय देऊ शकले नाही," असा सवाल त्यांनी केला.

4. श्रीमंत देशात भारत सहावा

जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दशकभरात देशातील संपत्तीत अडीचपटींहून अधिक वाढ झाली आहे.

Image copyright ROBERTO SCHMIDT/GETTY IMAGES

महाराष्ट्र टाइम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ नावाचा हा अहवाल आहे. त्यातील माहितीनुसार अमेरिका हा जगातील सर्वांत श्रीमंत देश असून त्यांच्याकडे 64,584 अब्ज डॉलर संपत्ती आहे. त्याखालोखाल चीनचा क्रमांक लागतो.

सन 2017 मध्ये भारताची आर्थिक आघाडीवरील कामगिरी सर्वांत चांगली होती, असं अहवालात नमूद केलं आहे. 2016 मधील भारतातील संपत्ती 6,584 अब्ज डॉलर होती. ती 2017 मध्ये 8,230 अब्ज डॉलर झाली.

वर्षभरात भारताच्या संपत्तीत 25 टक्के वाढ नोंदवली गेली. भारतात 20,730 कोट्यधीश आहेत. कोट्यधीशांच्या संख्येत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो.

5. 'मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघत नाही'

वयाच्या २१व्या वर्षी नगरसेवक झालो, तेव्हा आमदार, मुख्यमंत्री होऊ असं कधीच वाटलं नाही. मुख्यमंत्री झाल्यावर पंतप्रधानपदाची स्वप्नं बघत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानपदाबाबत मत व्यक्त केलं.

Image copyright Getty Images

"मुख्यमंत्री झाल्यावर मी पंतप्रधानपदाची स्वप्ने बघत नाही. कारण पंतप्रधान होण्याचं स्वप्न ज्यांनी-ज्यांनी पाहिलं ते कधीच पंतप्रधान होऊ शकले नाहीत, उलट त्यांचा राजकीय प्रवास वर जाण्याऐवजी खाली खालीच सुरू झाला. महाराष्ट्राच्या बाबतीत तर हे उदाहरण चपखल लागू असल्यानं, आहे ते ठीक आहे," अशी कोपरखळी कोणाचंही नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मारली.

मुख्यमंत्री झाल्यापासून आक्रमकतेच्या मूळ स्वभावाला मुरड घातल्याची कबुलीही त्यांनी दिली.

विरोधकांशी मुकाबला करताना राजकीय व्यक्तीनं नेहमी कासवाप्रमाणं वागावं असा एक कानमंत्रही मुख्यमंत्र्यांनी दिला.

"खाण्याची आपल्याला खूप आवड असून खाण्यासाठीच आपण जगतो. पोहे हा आपला आवडता खाद्यपदार्थ आहे," असं त्यांनी सांगितलं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)