रामगोपाल वर्मांच्या 'पॉर्न' फिल्ममुळे आंध्र प्रदेशात एकच गदारोळ

मिआ मालकोव्हा Image copyright Ram Gopal Varma/Twitter
प्रतिमा मथळा मिया मालकोव्हा

'या जगातली आत्ताची आणि भविष्यातलीही सगळ्यांत मोठी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे सेक्स.'

सिगमंड फ्रॉईड या नावाजलेल्या मानसोपचार तज्ज्ञाच्या या वक्तव्याने God, Sex and Truth (GST) या चित्रपटाची सुरुवात होते.... आणि पडद्यावर अवतरते एक संपूर्ण नग्न स्त्री!

'रंगीला', 'सत्या' आणि 'सरकार'सारखे लोकांच्या पसंतीला उतरलेले चित्रपट देणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मांनी अमेरिकेतली पॉर्नस्टार मिया मालकोव्हाला घेऊन नुकतीच इंटरनेटवर केलेली फिल्म म्हणजे GST.

GST हे सध्या गाजत असलेलं नाव आणि नग्न पॉर्नस्टार या स्फोटक रसायनामुळे वाद निर्माण झाला नसता तरच नवल. संपूर्ण देशात नसलं तरी या चित्रपटामुळे आंध्र प्रदेशमध्ये वादाला तोंड फुटलं.

GST 26 जानेवारीला युट्यूबवर रिलीज झाला. त्याआधीपासून प्रमोशन सुरू झालं आणि तेलुगू चॅनल्सवर वादळ आलं! राम गोपाल वर्मा आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.

ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन (AIDWA) या संस्थेच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशमधल्या महिला हक्क संस्थांनी वर्मांच्या पुतळ्याचं विशाखापट्टणम इथे दहन केलं. विजयवाडाच्या भाजपच्या महिला आघाडीनेही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Image copyright Ram Gopal Varma/Twitter

सेक्स : क्रांती की भोग?

इंटरनेटवर आलेला, नग्नता दाखवणारा हा काही पहिला चित्रपट नाही आणि शेवटचाही नाही. मग याच चित्रपटावरून एवढा वाद का? वर्मा या चित्रपटाचं वर्णन 'क्रांती घडवणारा तात्त्विक ग्रंथ' असं करतात. 'देवाला अभिप्रेत असणारा सेक्सचा अर्थ' या चित्रपटात आपण उलगडून दाखवला आहे, असंही त्यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

हेन्री मिलर, सिगमंड फ्रॉईड, आयन रँड, फ्रेडरिक नित्शे अशांसारख्या तत्त्वज्ञांच्या विचारांची या चित्रपटात पखरण आहे. "सुंदर शरीराला केंद्रबिंदू बनवणारे अनेक चित्रपट आले, पण हा चित्रपट सुंदर मनाचा आहे," असंही वर्मा एका मुलाखतीत म्हणतात.

पण वाद झाला आहे तो वर्मांच्या एका वक्तव्यावरून - "वर्षानुवर्षं दडपलेल्या स्त्रीच्या लैंगिक आकाक्षांचा हा मुक्त आविष्कार आहे. एका अर्थाने तो स्त्रीला मुक्त करणारा अनुभव आहे." अशाच आशयाची वाक्य त्यांनी चित्रपटात मिया मालकोव्हाच्या तोंडीही घातली आहेत.

Image copyright ARUN SANKAR/GETTY IMAGES

अनेक महिलांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला आहे.

"स्त्रीच्या मुक्तपणाचा आविष्कार म्हणून वर्मा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. स्त्री सबलीकरणाच्या बाता मारत आहेत. आमचा आक्षेप या गोष्टीला आहे," हैदराबादमधल्या सामाजिक कार्यकर्त्या देवी म्हणतात.

"तुमचा कॅमेरा स्त्रीला एक भोगवस्तू म्हणून दाखवतो. तिच्या तोंडी काहीही संवाद असले तरी कॅमेरा तिच्या शरीराकडे पुरूषी नजरेनंच पाहातो. नाहीतर तिच्या तोंडी सबलीकरणाचे संवाद घालून मुक्तपणे तिचं योनी दर्शन घडवलं नसतं वर्मांनी."

Image copyright Ethan Miller/Getty Images
प्रतिमा मथळा मिया मालकोव्हा

"त्यांना विरोध करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी किती अपमानास्पद शब्द वापरले. एका पंचावन्न वर्षांच्या महिला कार्यकर्तीला ते जाहीर टीव्हीवर म्हणाले, 'तुम्ही इतक्या सुंदर आहात. पुढच्या सिनेमात मी मियाच्या ऐवजी त्या भूमिकेत तुम्हाला घेईन'. मला उद्देशून त्यांनी, 'तुम्ही काय कपडे घालून सेक्स करता का?' असं ट्वीट केलं."

"वर्मा महिला सबलीकरण करत नसून, पॉर्नला उत्तेजन देत आहेत. त्यांनी पॉर्नफिल्म बनवली आहे आणि स्त्रियांच्या लैंगिकतेचा आविष्कार म्हणून ते त्याचं समर्थन करत आहेत. विरोध पॉर्नफिल्म बनवण्याला नाहीये. खोटंनाटं बोलून त्याचं उदात्तीकरण करायला आहे. हे असलं काही म्हणजे 'महिलांचा उद्धार' नाही हे भारतीय महिलांना न समजण्या इतक्या त्या मूर्ख नाहीत," असंही देवी म्हणतात.

याविषयी रामगोपाल वर्मांशी संपर्क साधायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यास इथे देण्यात येईल.

पण ही फिल्म एक उत्तम कलाकृती असून ती पद्मावतहून जास्त लोकांच्या पसंतीला उतरतेय, असं ट्वीट त्यांनी केलंय.

या चित्रपटाला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मिया मालकोव्हा यांनी आभार मानले आहेत.

दुसऱ्या बाजूला चित्रपट समीक्षकांचंही या बाबतीत बरं मत नाही. 'The Adventures of an Intrepid Film Critic' या पुस्तकाच्या लेखिका आना MM वेट्टीकाड बीबीसी मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात, "हा जो 'क्रांती घडवणारा तात्त्विक ग्रंथ' आहे, त्याला पाहून मला इतकं हसू येतंय. मी यावर कुठलीही गंभीर प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. हे म्हणायला सुद्धा मला पाच सेकंद लागले आणि ही गोष्ट तेवढ्या लायकीचीही नाहीये."

मीडियाविरूद्धही राग

वर्मांविरूद्ध आंदोलन करणाऱ्या AIDWAच्या राज्य सचिव रमा देवी मीडियावरही नाराज आहेत. "मीडियामधून या चित्रपटाचं उदात्तीकरण होत आहे. वर्मांना स्टुडिओमध्ये बोलवून या चित्रपटावर चर्चा करण्याची अहमहमिका लागली होती. महिलांचे हक्क आणि त्यांचं शोषण यामधली सीमारेषा यावेळेस मीडियाला समजली नाही. पत्रकारांनी महिलांच्या शोषणाला समर्थन देऊ नये असं मला वाटतं," असंही मत त्या व्यक्त करतात.

या चित्रपटाची दखल तेलुगू मीडियाने जितकी घेतली तितकी इतर कोणत्याही मीडियाने घेतली नाही. या चित्रपटावर चर्चा घेण्याच्या नावाखाली तेलुगू मीडियाने तासनतास यातले सीन आणि ट्रेलर दाखवले. रामगोपाल वर्मांना अनेक वाहिन्यांनी चर्चेसाठी बोलवलं आणि त्या चर्चांमध्ये वर्मांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली.

Image copyright Twitter/Ram Gopal Varma

याबद्दल विश्लेषण करताना बीबीसी तेलुगूचे संपादक GS राम मोहन म्हणतात, "मुळात तेलुगू मीडियाला सनसनाटी गोष्टी आवडतात. काहीही करून लोकांना आकर्षित करून घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो."

ते पुढे म्हणतात, "राम गोपाल वर्मा आणि तेलुगू मीडियाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कमी पैशात आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याकडे वर्मांचा ओढा असतो. आणि तशी संधी त्यांना मीडिया देतं. वर्मा आणि तेलुगू मीडिया यांचं नातं एकमेकांना पूरक आहे. आणि त्यासाठी तेलुगू मीडियाला दोष देऊनही चालणार नाही."

19 मिनिट लांबीचा हा चित्रपट प्रदर्शित होऊनही कोणत्याही चित्रपटगृहात झळकला नाही हे विशेष. पण या चित्रपटाच्या ट्रेलरला यु़ट्यूबवर आत्तापर्यंत 61 लाखाहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत तर पूर्ण चित्रपटाला 5 लाखांहून अधिक हिट्स आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)