पोटनिवडणुकीत धोबीपछाड : वसुंधरा राजेंच्या राजस्थानमध्ये भाजपचं काय चुकलं?

वसुंधरा राजे Image copyright PRAKASH SINGH
प्रतिमा मथळा वसुंधरा राजे

राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानं सत्ताधारी भाजप हैराण झाला आहे.

येत्या दहा महिन्यांत तिथे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

या निकालांमुळे आनंद झालेल्या काँग्रेसला राजस्थानमध्ये वनवास संपल्यासारखं वाटत आहे.

पोटनिवडणुकांमध्ये अलवर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसच्या डॉ. कर्ण सिंह यांनी भाजपाचे उमेदवार आणि राज्यातील मंत्री जसवंत यादव यांचा मोठ्या फरकानं पराभव केला आहे.

अजमेरमध्ये काँग्रेसच्या रघू शर्मा यांनी भाजपचे उमेदवार रामस्वरुप यांना पराभूत केलं आहे.

भाजपला विश्वास

भिलवाडा जिल्ह्यात मांडलगढ विधानसभा जागेवर काँग्रेसचे विवेक धाकड यांनी भाजपच्या शक्तीसिंह यांचा पराभव केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परिणामी म्हणाले की, ते निकालांचा अभ्यास करत आहेत. तसंच, आगामी विधानसभा निवडणुकांत ताज्या दमानं उतरतील.

Image copyright Twitter @SachinPilot

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, "भाजपनं शेवटच्या घटका मोजायला सुरुवात केली आहे."

राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांच्या मते, "भाजपबद्दल लोकांच्या मनात खूप राग आहे."

या निवडणुकांत भाजपला आपल्या नेतृत्वावर, बूथ लेवलचं व्यवस्थापन, जातींचं समीकरण, विकासकार्य आणि हिंदूत्वावर अतिशय विश्वास होता.

पण या गोष्टीमुळे भाजपाविरुद्ध उसळलेला जनक्षोभ थांबला नाही.

स्वाभाविक दावेदार

काँग्रेसनं निवडणुकांत नेतृत्वाचं एकीकरण आणि प्रस्थापितांविरुद्ध असंतोष या गोष्टींवर भर दिला. त्याचा त्यांना लाभ झाला.

दिल्लीतील नेत्यांनी, प्रदेशातल्या नेत्यांना एकजूट दाखवण्याचा आदेश दिला होता.

Image copyright Twitter @BJP4Rajasthan
प्रतिमा मथळा अजमेरमधील भाजप उमेदवार रामस्वरूप लांबा

म्हणून माजी मुख्यमंत्री गेहलोत, पायलट आणि माजी केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी तिन्ही जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते.

अलवरसाठी भंवर जितेंद्र सिंह आणि अजमेरसाठी सचिन पायलट यांना उमेदवार म्हणून पहिली पसंती होती.

पण या दोन्ही जागांवर जेव्हा वेगळी नावं आली. त्यावर, भाजपाचे प्रभारी अविनाश खन्ना यांनी, काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वानं उमेदवारांना वाऱ्यावर सोडलं आहे, अशा शब्दात टीका केली होती.

अलवरची निवडणूक

निवडणुकीची प्रक्रिया जशीजशी पुढे सरकली तसं भाजपच अडचणीत सापडली. या निवडणुकांत मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी नेतृत्व हातात घेतलं होतं.

राजेंनी या मतदारसंघाचे दौरे केले. त्या सामान्य लोकांना भेटल्या.

Image copyright Twitter @SachinPilot

मतदारांना आकर्षित करण्यासाठी वसुंधरा राजे यांनी जातिनिहाय गट तयार केले. वेळोवेळी या गटाची स्वतंत्रपणे भेट घेतली.

पण या प्रयोगाचा उपयोग झाला नाही.

गेल्या काही काळापासून गोरक्षणाच्या मुद्द्यावरून अलवर सतत चर्चेत आहे.

हा धार्मिक आधारावर ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे, भाजपला याचा लाभ होईल, असं काही विश्लेषकांना वाटत होतं.

धर्माच्या नावावर...

अलवरमध्ये मिळालेल्या मतांच्या संख्येच्या तुलनेत भाजपला बरंच नुकसान सहन करावं लागलं आहे.

अल्वरचे स्थानिक पत्रकार देवेंद्र भारद्वाज सांगतात, "सरकारनं कोणतीच विकासकामं केली नाहीत, उलट आधीच्या सरकारनं जी कामं केली ती थांबवली. त्यामुळे लोक नाराज होते."

Image copyright Twitter @BJP4Rajasthan
प्रतिमा मथळा मांडलगढ येथे भाजप उमेदवार शक्तीसिंह हांडा प्रचारादरम्यान

भारद्वाज पुढे सांगतात, "धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न लोकांनी हाणून पाडला."

भाजप सरकारनं सगळा माहौल आपल्या बाजूनं वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाडमैर येथे दौरा आयोजित केला. ऑईल रिफायनरीच्या स्थापनेसाठी 'कामाची सुरुवात'ही केली होती.

विधानसभा निवडणुकांवर परिणाम

या समारंभात मोदी यांनी राजे यांच्या कामभाराची स्तुती केली. पण जनतेनं त्याला महत्त्व दिलं नाही.

भाजपचे राज्य प्रवक्ता मुकेश चेलावत म्हणतात, "पराभवानं आम्हाला धक्का नक्कीच बसला आहे. पण विधानसभा निवडणुकांवर याचा काही परिणाम होणार नाही."

चेलावत सांगतात, "पराभव का झाला हे आता सांगणं कठीण आहे. आम्ही कारणं अजून शोधतो आहे."

Image copyright Twitter @BJP4Rajasthan

काँग्रेस नेता मुमताज मसीह म्हणतात, "हे निकाल म्हणजे मोदी सरकार आणि राज्यातलं भाजप सरकार यांच्याविरुद्धचा जनादेश आहे."

आतापर्यंत तिथं दमदार विरोधी पक्ष दिसत नव्हता. तसंच गेल्या चार वर्षांत सरकारला कोणत्या मोठ्या आंदोलनाचा सामना करावा लागला नाही.

केंद्राची चिंता

विश्लेषक म्हणतात, "बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि विकासकार्यात एक व्यवस्थेविरोधी मोठी वातावरणनिर्मिती केली. त्याबरोबर सरकारी उपक्रमांच्या खासगीकरणामुळे कर्मचारी निराश झाले."

Image copyright Twitter @BJP4Rajasthan

या निकालांमुळे सत्तारुढ भाजप आणि वसुंधरा राजे यांच्यासमोरची आव्हानं वाढली आहेत. केंद्राच्या चिंतेतही वाढ होईल. कारण राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत.

त्याचवेळी या यशामुळे विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये वर्चस्वाची लढाई बघायला मिळेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)