#HerChoice : 'हो! मी परपुरुषांबरोबर फेसबुकवर चॅट करते, मग?'

सोशल मीडिया, फेसबुक, नातेसंबंध, महिला.
प्रतिमा मथळा माझा नवरा सतत कामात गढलेला असे. त्याला भावभावना आहेत की नाहीत असं वाटत असे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांशी बोलणं म्हणजे फ्लर्ट करणं असा अर्थ होतो का?

मी माझं फेसबुक अकाऊंट उघडलं, तेव्हा त्याच्याकडून एक मेसेज आला होता.

त्याचा मेसेज म्हटल्यावर मला धक्काच बसला. त्याने मला का मेसेज केला?

माझा नवरा घरी नव्हता. मी एकटीच होते. तरीही अस्वस्थपणे मी आजूबाजूला पाहिलं.

तो वेडगळपणा होता. मी स्वत:लाच हसले आणि मेसेज उघडला.

हाय! मला तुझ्याशी मैत्री करायची आहे.

मी हसले. मेसेजकडे क्षणभर टक लावून पाहिलं. मेसेजला रिप्लाय द्यावा की दुर्लक्ष करावं हे मला कळेना.

अगदीच अनोळखी माणसाला मी रिप्लाय करावा? माझ्या नवऱ्याला हे कळलं तर काय होईल? त्याची प्रतिक्रिया काय असेल?

नवऱ्याच्या विचारानं मला राग आला.

त्याच्या उदासीनतेमुळे अनोळखी व्यक्तीकडून आलेलं एक हाय सुद्धा मला त्रस्त करू शकतं.

परिस्थिती वेगळी असती तर मी त्या मेसेजकडे दुर्लक्षच केलं असतं. पण मी रागानं धुमसत होते. आणि या रागातच मी हाय असा रिप्लाय दिला.


प्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.


त्याचं नाव आकाश होतं. मी त्याला ओळखत नव्हते पण फार विचार न करता फेसबुकवर त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली.

का कुणास ठाऊक पण मी एअरहोस्टेस आहे असं त्याला वाटत होतं.

खरं काय हे मी त्याला सांगू शकत होते, पण एअरहोस्टेस असण्याच्या कल्पनेने मी सुखावले.

लहानपणापासून मी सुंदर आहे, असं मला सांगण्यात आलं. उजळ वर्ण, बदामाच्या आकाराचे डोळे, नाकीडोळी नीट आणि कमनीय बांधा- मी आकर्षक दिसते हे नक्की.

पण पालकांना माझ्या लग्नाची घाई झाली होती. म्हणूनच त्यांना आवडलेल्या पहिल्याच मुलाशी त्यांनी माझं लग्न लावून दिलं.

या माणसाला माझ्या भावभावनांमध्ये काहीच रस नव्हता. माझ्याशी प्रेमळपणे वागण्यातही त्याला स्वारस्य नव्हतं.

नवऱ्याबद्दल माझ्या मनात काही कल्पना होत्या. माझ्याकडे प्रेमळ नजरेनं पाहणारा, मला सुखद धक्का देणारा, सरप्राइजेस देणारा, कधीतरी माझ्यासाठी चहा तयार करणारा असं काहीसं माझ्या डोक्यात होतं.

पण माझा नवरा एखाद्या यंत्राप्रमाणे होता. सकाळी उठल्यावर कामावर जाणं, रात्री उशिरा परतणं, घरी आल्यावर जेवणं आणि झोपणे असं त्याचं रुटिन असतं.

तो कामानिमित्तानं बिझी असतो हे मला समजत नव्हतं असं नाही. पण आपल्या बायकोला छान म्हणायला किती वेळ लागतो? तिला मिठी मारायला काय वेळ लागतो? किंवा तिच्या चेहऱ्याकडे प्रेमळपणे बघता येत नाही?

माझ्या नवऱ्याला कोणत्याही भावना नाहीत किंवा बायकोचं कौतुक करावं लागलं तर त्याचा अहंकार दुखावत असावा.

आम्ही शरीरसुखाचा अर्थात आनंद घेतो पण त्यात प्रेमभावना नसते. आम्ही फोरप्लेही करत नाही.

त्याला कशाचंच कौतुक नाही. मी कितीही चांगला स्वयंपाक केला किंवा कितीही चांगलं घर सजवलं तरी काहीही फरक पडत नाही.

आकाशनं मला पुन्हा पिंग केलं तेव्हा मी माझ्याच विचारात हरवले होते.

त्याला माझे फोटो पाहायचे होते.

प्रतिमा मथळा सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंगनं माझ्यासाठी नवं विश्व खुलं केलं.

इंटरनेट विश्व माझ्यासाठी नवं होतं. माझं फेसबुक अकाऊंट नवऱ्यानंच सुरू करून दिलं होतं. फ्रेंड रिक्वेस्ट कशी अॅक्स्पेट करायची तसंच मेसेजला रिप्लाय कसा करायचा हे त्यानंच मला शिकवलं.

पण माझ्या फेसबुक प्रोफाइलवर एकही फोटो नव्हता. फोटो अपलोड करायला मला भीती वाटत होती, कारण फोटो मॉर्फ करून पॉर्न साइटवर टाकले जातात असं मी ऐकलं होतं.

पण आकाश फोटोबाबत फारच आग्रही होता.

मी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मी एअरहोस्टेस नाही हेही त्याला सांगितलं.

फोटोच्या विचारापासून दूर होण्याऐवजी तो फोटोबाबत आणखी हट्टी झाला.

पण जरी त्याला फोटो द्यायचा झाला तरी तरी माझ्याकडे स्वत:चा असा नीट फोटो नव्हता.

आकाशचं लग्न झालं होतं. त्याला तीन वर्षांचा मुलगाही होता.

तो एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. कामाच्या निमित्तानं तो परदेशवाऱ्याही करत असे. तो सातत्यानं पार्ट्यांना जात असे.

चारचौघात मुली कसं सिगारेट आणि दारु पितात हे आकाश मला सांगत असे.

हे सगळं माझ्यासाठी अगदीच सर्वस्वी नवीन होतं.

त्याची बायको कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते. तिची नोकरी उत्तम पगाराची आहे. ती कामात एवढी व्यग्र असते की आम्हाला दोघांना एकत्र वेळ मिळत नाही असं आकाश मला सांगत असे.

तो एकदा मला म्हणाला, "एकदा मी कशाबद्दल तरी नाराज होतो. ते सांगण्यासाठी मी तिला फोन केला. पण ती मीटिंगमध्ये बिझी होती."

त्याचं बोलणं मी पूर्णपणे समजू शकते.

आम्ही दररोज एकमेकांशी बोलायचो. त्याच्याशी बोलताना मजा यायची. त्याच्याशी बोलण्यासाठी मी एवढी आतूर असायचे की सगळी कामं आटोपून दुपारी त्याची वाट बघायचे.

एकेदिवशी आकाशनं मला वेबकॅम सुरू करायला सांगितलं.

मी एकदम बावरले आणि ऑफलाइन गेले.

त्यादिवशी मी आंघोळही केली नव्हती. त्यानं मला तसंच पाहिलं असतं तर!

माझ्या फोटोसाठी तो दररोज विचारणा करत असे.

त्याला काय उत्तरं द्यायची, काय सांगायचं हेही मला कळत नसे. मग आम्ही ज्या वेळेला गप्पा मारायचो त्यावेळेला ऑनलाइन जाणंच मी बंद केलं.

असेच काही दिवस गेले आणि त्यानं मला ब्लॉक केलं.

हे अपरिहार्य होतं, पण तरी मला खूप वाईट वाटलं.

आमच्यात कोणतंही नातं नव्हतं. तरी त्यानं फेसबुकवर ब्लॉक केल्यानंतर मला एकदम रितं झाल्यासारखं वाटलं.

आकाशपेक्षा जास्त मी स्वत:वरच रागावले होते. मी कोणावर तरी अवलंबून आहे यामुळे अस्वस्थ वाटलं.

माझं स्वत:चं असं करिअर का नाही? माझं स्वत:चं असं जग का नाही? मी नोकरी किंवा व्यवसाय करत असते तर मी मला हवं तसं जगू शकले असते.

या प्रकरणानंतर मी काही आठवडे फेसबुकपासून दूरच होते.

लॉगइन आणि ऑनलाइन नसले तरी डोक्यातून त्याचा विचार जात नव्हता. आम्ही एकमेकांशी ज्या गप्पा मारायचो त्याची मला सातत्यानं आठवण व्हायची.

आम्ही बोलायचो तेव्हा वेळ कसा निघून जात असे कळतही नसे. दिवसभर माझ्या चेहऱ्यावर हसू राहत असे.

आमच्या गप्पांच्या व्हर्च्युअल नात्याचा सर्वाधिक फायदा माझ्या नवऱ्याला झाला होता.

कुठलेही विशेष प्रयत्न न करता मी आनंदी असे. मी आणि माझ्या नवऱ्याच्या नात्यामधली रिक्ततेची पोकळी आकाशनं भरून काढली.

मी काहीही चुकीचं केलं नाही. मी माझ्या नवऱ्याला फसवलं नाही, दुसऱ्या पुरुषासोबत शय्यासोबत केली नाही. मी केवळ बोलत असे.

आकाश आणि माझ्या बोलण्यादरम्यान स्वतंत्र विचारांची, स्वप्नांची मुलगी म्हणून माझा विचार होत असे. साचेबद्ध बायकोच्या प्रतिमेतून मी बाहेर येत असे.

आकाशशी संपर्क करावा की नाही अशा द्विधा मनस्थितीत मी होते.

त्यानंतर एकेदिवशी, फेसबुकवर मला एक प्रोफाइल दिसलं. तो माणूस सुरेख दिसणारा होता. माझ्या मनात काय तरंग उमटले ठाऊक नाही, पण मी माझ्याही नकळत त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

त्याचा रिप्लाय आला, 'तुझं लग्न झालं आहे. तू मला फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवलीस?

मी म्हणाले, 'म्हणजे? लग्न झालेल्या मुलींना मित्र असू शकत नाहीत का?'

एवढंच बोलणं झालं. पुन्हा एक नवी सुरुवात झाली. आम्ही अजूनही संपर्कात असतो.

तो एकमेव नव्हता. त्यानंतर मी आणखी एक प्रोफाइल पाहिलं. त्या प्रोफाइलमधल्या माणसानं सेलिब्रेटींबरोबर काही फोटो अपलोड केले होते.

त्याचं आयुष्य समजून घेणं अनोखं असेल असं वाटलं. म्हणून मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानं ती अॅक्सेप्ट केली.

आयुष्य आता उत्साही आणि मजेशीर झालं होतं. त्यानंतर मी गरोदर असल्याचं समजलं.

लेकीच्या आगमनानंतर माझं आयुष्यच बदललं. मला दुसरं काही करायला सवड मिळेनाशी झाली.

ती आता तीन वर्षांची झाली आहे. पण माझं आयुष्य तिच्याभोवतीच केंद्रीत असतं.

अनेकदा कोणाशी तरी बोलावं असं मला वाटतं. मी माझा मोबाइल उचलते, पण तेवढ्यात ती धावत येते. माझा मोबाइल ताब्यात घेते. जेणेकरून तिला कार्टून व्हीडिओ पाहता येईल.

हे उबग आणणारं असतं. मी पूर्वी जशी स्त्री होते, तशी पुन्हा होऊ शकेन का, हे सांगता येत नाही.

कोणाची तरी बायको किंवा कोणाची तरी आई एवढीच माझी ओळख असणार का?

म्हणूनच मी ठरवलं आहे की माझ्या लेकीबरोबर असं काही घडायला नको.

स्वतंत्र स्वावलंबी व्यक्ती म्हणून तिला घडवण्याचा माझा प्रयत्न असेल. जेणेकरून तिच्या आयुष्याविषयी ती स्वत:च निर्णय घेऊ शकेल.

(उत्तर भारतात राहणाऱ्या एका महिलेची ही सत्यकहाणी. तिनं आपली कहाणी बीबीसी प्रतिनिधी प्रग्या मानव यांना कथन केली. दिव्या आर्य यांची ही निर्मिती आहे. महिलेच्या विनंतीनुसार तिचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)