सोशल : 'महिला राष्ट्रपती झाली, पंतप्रधान झाली पण संघप्रमुखपदाची संधी नाही!'

सरसंघचालक मोहन भागवत Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांना हक्क देऊ इच्छित नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

"तुम्ही संघामध्ये महिलांना कधी उच्च पदावर पाहिले आहे का? महात्मा गांधी यांची प्रतिमा पाहिल्यास तुम्हाला त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला महिला दिसतील. पण सरसंघचालक मोहन भागवत हे कधी एकटे दिसतात तर कधी त्यांच्याभोवती पुरुषांचा गराडा असतो. महिलांना नेतृत्वात कुठेही स्थान नाही," अशी टीका गांधींनी शिलाँगमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केली.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना विचारलं होतं की, राहुल गांधीच्या या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं.

अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

अक्षय कदम म्हणतात, "सरसंघचालक पद आरक्षित आहे."

Image copyright Facebook

"राष्ट्रपती, पंतप्रधान या पदांवर महिला विराजमान होऊन त्यांनी त्या पदाची शोभा त्यांनी वाढवलेली आहे. मात्र संघप्रमुखपदी त्यांना संधी मिळाली नाही," असं मत सुमित दांडगे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

नागेश तेंडोलकर लिहितात, "या विषयावर 'Bunch of Thoughts' या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे अणि कोणाला याबद्दल आक्षेप नसावा."

Image copyright Facebook

उमाकांत खरोसेकर म्हणतात, "महिलांची काही तक्रार नाही. काम निष्ठेनं चालतं ना. संघटना त्यांची आहे. राष्ट्रभक्ती, प्रेरणा, त्याग, समर्पण या भावनेतून काम चालतं."

Image copyright Facebook

"उद्या हे कोहलीला पण म्हणतील, कोहलीच्या टीम मध्ये महिलांना स्थान नाही म्हणून. राष्ट्रसेविका समिती बद्दल यांना काही माहीत नाही काय?" अशी प्रतिक्रिया दिली आहे गौरव पवार यांनी.

Image copyright Facebook

(खरंतर संघाची महिलांसाठी वेगळी संघटना आहे - राष्ट्र सेविका समिती. दिल्लीमध्ये या समितीच्या 100 शाखा आहेत. देशभरात एकूण 3500 हून अधिक शाखा आहेत.)

मयुरेश प्रभू हे त्यांच्या प्रतिक्रियेतून संघ आणि राहुल गांधींच्या काँग्रेसची तुलना करतात. "प्रत्येक संस्था, घर त्या त्या विचारसरणीवर चालतं. काँग्रेसमध्ये लोकशाही दाखवण्यासाठी काय-काय केलं जातं, पण सत्ता, रिमोट सगळं काही गांधी घराण्याच्या पायाशी वाहिलं जातं."

Image copyright Facebook

ते पुढे म्हणतात, "अनेक वर्षे निष्ठेने समाजसेवा, राष्ट्रसेवा करणाऱ्या स्वयंसेवकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन एक दिवस सरसंघचालक पदापर्यंत जाण्यासाठी योग्यतेचं केलं जातं. ते पद एकाच घरातील लोक नाही चालवत आहेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)