U19 क्रिकेट वर्ल्डकप भारताकडे : कोण आहेत विजयाचे शिल्पकार?

U19 Image copyright Getty Images

एकापाठोपाठ एक... सामने जिंकत भारतीय युवा (19 वर्षांखालील) संघाने U19 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. या आधी 2000, 2008 आणि 2012 मध्ये भारतानं हा वर्ल्डकप जिंकला आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या निमित्तानं युवा क्रिकेटपटूंनी जागतिक स्तरावर छाप उमटवली आहे.


दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर भारतीय युवा संघानं न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या ICC U19 विश्वचषकावर नाव कोरलं. अंतिम लढतीत भारतानं ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी मात केली. शतकी खेळी साकारणारा मनजोत कालरा या विजयाचा शिल्पकार ठरला.

अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोनाथन मर्लोच्या 76 रन्सच्या बळावर ऑस्ट्रेलियानं 216 रन्सची मजल मारली. भारतातर्फे इशान पोरेल, शिवा सिंग, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरा यांनी 71 धावांची सलामी दिली. पृथ्वी 29 धावा करून बाद झाला. कालरानं सूत्रधाराची भूमिका निभावत नाबाद 101 धावांची खेळी केली. त्यानं 8 चौकार आणि 3 षटकारांसह मॅरेथॉन खेळी सजवली. त्याला शुभमन गिलनं 31 धावांची आणि हार्वीक देसाईनं नाबाद 47 धावांची चांगली साथ दिली.

Image copyright Hagen Hopkins/Getty Images
प्रतिमा मथळा युवा विश्वचषकात पापुआ न्यू गिनीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सेल्फी घेताना भारतीय क्रिकेट संघ.

पृथ्वी शॉ

भारतीय युवा संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळणाऱ्या पृथ्वी शॉ यानं स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं आहे. क्रिकेटसाठी पालघर-चर्चगेट असा चार तासांहून अधिक प्रवास करणारा पृथ्वी 2013 मध्ये शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी खेळीसह पहिल्यांदा चर्चेत आला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पृथ्वी शॉच्या यशस्वी नेतृत्वाच्या बळावर भारतीय संघाने युवा विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे.

प्रतिष्ठेच्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्ड संघाचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीनं सेंट फ्रान्सिस डी असीसी संघाविरुद्ध 546 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.

15 वर्षीय पृथ्वीनं 85 चौकार आणि 5 षटकारांच्या साह्यानं ही विक्रमी खेळी सजवली. आंतरशालेय क्रिकेटमध्ये पाचशेपेक्षा अधिक धावांची खेळी करणारा पृथ्वी पहिला खेळाडू ठरला. पाच वर्षांनंतर पृथ्वीनं दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यातच विक्रम रचला.

लखनौमध्ये खेळताना पृथ्वीनं 154 धावांची खेळी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर दुलीप ट्रॉफी करंडकाच्या पदार्पणाच्या लढतीत शतक झळकावणारा पृथ्वी पहिलाच खेळाडू ठरला.

17व्या वर्षी या स्पर्धेत शतक झळकवणारा तो दुसरा सगळ्यांत तरुण खेळाडू ठरला. असा विक्रम सचिनच्या नावावर आहे. स्थानिक क्रिकेटमधील अत्यंत मानाची स्पर्धा असलेल्या रणजी स्पर्धेच्या पदार्पणात पृथ्वीनं दमदार शतकी खेळी साकारली.

मुंबईचं प्रतिनिधित्व करताना पृथ्वीच्या नावावर तीन शतकं आणि दोन अर्धशतकं आहेत. या सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर पृथ्वीकडे भारतीय युवा संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. मोहम्मद कैफ (2000), विराट कोहली (2008), उन्मुक्त चंद (2012) यांच्याप्रमाणे विश्वचषक विजयी कर्णधार होण्याची संधी पृथ्वीकडे आहे.

उज्वल प्रतिभेमुळे सचिन तेंडुलकरशी सातत्यानं तुलना होणाऱ्या पृथ्वी शॉ याला इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेसाठीच्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघानं 1.2 कोटी रुपये देऊन ताफ्यात सामील केलं.

शुभमन गिल

पंजाब राज्यातल्या फजिल्का जिल्ह्यातल्या जलालाबादजवळच्या चाक खेरेवाला गावच्या शुभमन गिलचं नाव आता देशवासियांच्या मुखी आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्या वर्षापासूनच शुभमननं क्रिकेटची धुळाक्षरं गिरवायला सुरुवात केली.

Image copyright Twitter/ICC
प्रतिमा मथळा शुभमन गिलने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचं शतक झळकावलं होतं.

शुभमनची प्रतिभा लक्षात घेऊन त्याच्या कुटुंबीयांनी चंदीगढ शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मोहाली स्टेडियमसमोरची अकादमी शुभमनचं दुसरं घर झालं. मैदानावर चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमननं आठवीपर्यंत 90 टक्के मिळवत अभ्यास आणि खेळ यांचा सुरेख मिलाफ साधला.

माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी शुभमनची प्रतिभा हेरली. फिटनेस, सामन्यातली परिस्थिती समजून फलंदाजीत करावे लागणारे बदल, संयम, खेळपट्टीचा नूर ओळखणं ही सगळी कौशल्यं घावरी यांनी शुभमनकडून घोटून घेतली.

स्वत: गोलंदाज असलेल्या घावरी यांनी शुभमनला त्याच्या वयापेक्षा अधिक गोलंदाजांचा सामना करायला लावला.

स्थानिक क्रिकेटमध्ये वयोगट स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीच्या बळावर शुभमनला पंजाब रणजी संघात समाविष्ट करण्यात आलं. युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्याबरोबरीनं खेळण्याचा अनुभव उपयुक्त ठरल्याचं शुभमननं सांगितलं.

विश्वचषकात शुभमनच्या 102 धावांच्या जोरावर भारतीय संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

'पंजाब दा पुत्तर'च्या या खेळाची दखल घेत IPL स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स संघानं शुभमनला 1.8 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.

कमलेश नागरकोट्टी

भन्नाट वेगानं गोलंदाजी करणाऱ्या कमलेश नागरकोट्टीनं जगभरातल्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. कमलेशची गोलंदाजी पाहून मी थक्क झालो आहे, त्याचा हेवा वाटतो अशा शब्दांत वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

Image copyright Harry Trump/Getty Images
प्रतिमा मथळा भन्नाट वेग आणि अचूकतेनं कमलेश नागरकोटीनं सगळ्यांना प्रभावित केलं आहे.

5 फूट 8 इंच उंची, हडकुळ्या मात्र काटक शरीरयष्टीच्या कमलेशनं विश्वचषकात ताशी 145 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकण्याची किमया केली आहे. नागरकोटी कुटुंबीय मूळचं उत्तराखंडचं मात्र मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी राजस्थानमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या 14-16 आणि 19 वर्षांखालील संघाचा कमलेश अविभाज्य घटक आहे.

गेल्यावर्षी कमलेशनं विजय हजारे चषक स्पर्धेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करताना पदार्पणाच्या लढतीतच गुजरातविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती.

सुरेंद्र सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान गोलंदाजीतील बारकावे शिकणाऱ्या कमलेशनं आपल्या वेग आणि अचूकतेनं सर्वांना प्रभावित केलं आहे.

IPL मधील कोलकाता नाइट रायडर्स संघानं तब्बल 3.8 कोटी रुपये मोजून कमलेशला आपल्या संघात सामील केलं आहे. विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम लढतीपर्यंत नेण्यात कमलेशची भूमिका मोलाची आहे.

अनुकूल रॉय

बिहारमधल्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या भिऱ्हा गावच्या डावखुऱ्या फिरकीपटू अनुकूलनं क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं.

तांत्रिक आणि न्यायालयीन लढाईमुळे बिहार राज्यातल्या क्रिकेटचं नुकसान झालं आहे. गेल्या अठरा वर्षांपासून बिहार संघाला रणजी स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आलं आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा विश्वचषकात सलामीच्या लढतीत अनुकूल रॉयने चमकदार कामगिरी केली होती.

मात्र याचा जराही परिणाम होऊ न देता अनुकूलनं प्रत्येक टप्प्यावर चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या युवा संघाचा माजी कर्णधार इशान किशनकडून प्रेरणा घेत संघाच्या विजयात योगदान देण्याचं काम अनुकूल नेटानं करतो आहे.

अमिकर दयाल यांच्या अकादमीत क्रिकेटचे बारकावे घोटून घेणाऱ्या अनुकूलची कामगिरी छोट्या गावातल्या-शहरातल्या क्रीडापटूंसाठी आदर्श वस्तुपाठ ठरली आहे.

शिवम मावी

सुरेश रैना, प्रवीण कुमार, भुवनेश्वर कुमार यांच्या धर्तीवर उत्तर प्रदेशचं राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक वेगवान गोलंदाज शिवम मावीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.

Image copyright Twitter/ICC
प्रतिमा मथळा वेगवान गोलंदाज शिवम मावीचं नाव विश्वचषकात चर्चेत आहे.

नोएडातल्या वाँडरर्स क्रिकेट क्लबमधल्या प्रशिक्षक फुलचंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवमनं वेगवान गोलंदाजीतले बारकावे आत्मसात केले आहेत. मेरठजवळच्या सिना गावात राहणाऱ्या मावी कुटुंबीयांनी चांगल्या शिक्षणासाठी नोएडात राहायला येण्याचा निर्णय घेतला.

वयोगट स्पर्धांमध्ये आपल्या वेगानं फलंदाजांना त्रस्त करून सोडणाऱ्या शिवमच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. तीन महिने त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. मात्र यातून सावरत शिवमनं दमदार पुनरागमन केलं.

विश्वचषकादरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने शिवमच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. अत्यंत सुरेख अॅक्शनसह गोलंदाजी करणाऱ्या शिवमसाठी न्यूझीलंडमधील खेळपट्या अगदीच पोषक ठरल्या. स्पर्धेतील त्याचा इकॉनॉमी रेट फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)