#5मोठ्याबातम्या : मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

मिलिंद एकबोटे Image copyright FACEBOOK/MILIND EKBOTE
प्रतिमा मथळा मिलिंद एकबोटे

पाहूयात आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेगवेगळ्या वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावले असल्याचा दावा करत हा गुन्हाच रद्द करण्याची मागणी करणारी मिलिंद एकबोटे यांची याचिका मुंबई हायकोर्टानं शुक्रवारी फेटाळली.

भीमा कोरेगावमध्ये जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.

ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसंच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्याच्या सत्र न्यायालयानं 22 जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठानं यावर सुनावणी घेण्यास नकार देत, दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश एकबोटे यांना दिले होते.

त्यामुळे एकबोटे यांनी दुपारी दुसऱ्या खंडपीठापुढे आपली याचिका सादर केली. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

2. मंत्रालयात शेतकऱ्याचा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

Image copyright INDRANIL MUKHERJEE

धुळे जिल्ह्यातल्या धर्मा पाटील यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी मंत्रालयात विषप्राशन करून आपले जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यात मंत्रालयातल्या पोलिसांना शुक्रवारी यश आलं.

'सकाळ'च्या बातमीनुसार, मारुती सदाशिव धावरे (वय 28, रा. सांगवी, जि. सोलापूर) हे तरुण शेतकरी मंत्रालयात प्रवेश करताना त्यांची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा त्यांच्याकडे कीटकनाशक आढळल्यानं ते त्वरित ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.

शेतातला ऊस घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्यानं उभं पीक जाळावं लागतं. या संदर्भात सरकारी यंत्रणेकडे दाद मागूनही त्यांची समस्या न सुटल्यानं त्यांनी मंत्रालयात खेटे घातले; पण काहीच मार्ग न निघाल्यानं धावरेंनी अखेर धर्मा पाटील यांच्या मार्गानं जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी झडती घेऊन कीटकनाशक ताब्यात घेतल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला.

3. गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक

मोबाइल कंपन्यांच्या कॉल तपशिलाची खरेदी केल्याच्या गुन्ह्यात भारतातल्या पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शुक्रवारी मुंबईतून अटक केली.

'लोकसत्ता'नं दिलेल्या बातमीनुसार, विविध मोबाइल कंपन्यांकडून बेकायदा कॉल तपशिलाची नोंद (CDR) मिळवून त्याची विक्री करणाऱ्या टोळीकडून पंडित यांनी CDR विकत घेतल्याची बाब तपासात पुढे आली आहे. या वृत्ताला पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दुजोरा दिला आहे.

बेकायदा CDR मिळवून तो ग्राहकांना विकणाऱ्या चार खासगी गुप्तहेरांच्या टोळीला नुकतीच अटक झाली होती. त्यामध्ये मुकेश माधवन पांडियन, प्रशांत श्रीपाद पालेकर, जिगर विनोद मकवाना, आणि समरेश ननटून झा ऊर्फ प्रतीक मोहपाल या चौघांचा समावेश होता.

या चौघांकडून प्रशांत सोनावणे आणि संतोष पंडागळे या दोन खासगी गुप्तहेरांनी २० ते २५ CDR विकत घेतल्याची बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी या दोघांना अटक केली. त्यापाठोपाठ या प्रकरणामध्ये रजनी पंडित यांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे.

4. गुंतवणूकदारांचे ४.६ कोटी रुपये बुडाले

केंद्रीय अर्थसंकल्पात दर्घकालीन भांडवली गुंतवणुकीवर १० टक्के दीर्घकालीन भांडवली लाभ कर पुन्हा लागू करण्यात आला. त्यामुळे भयभीत झालेल्या गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा शुक्रवारीही सुरू ठेवला.

त्यामुळे दोन्ही निर्देशांक गडगडले. याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांचे तब्बल ४.६ कोटी रुपये बुडाले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स ८३९.९१ अंकांनी कोसळत ३५०६६.७५ या स्तरावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निर्देशांक निफ्टी २५६.३० अंक घसरत १०७६०.६० वर स्थिरावला.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, अनेक कंपन्यांच्या समभागांच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे BSEमध्ये सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल ४,५८,५८१.३८ कोटी रुपयांनी आक्रसत १,४८,५४,४५२ कोटींवर गेले.

यापूर्वी २४ ऑगस्ट २०१५ रोजी सेन्सेक्स १६२४.५१ अंकांनी पडला होता. त्यानंतर शुक्रवारीची ही सर्वांत मोठी पडझड ठरली. बाजार विश्लेषकांच्या मते, हे शेअर बाजारात आलेलं मोठे करेक्शन आहे. असं करेक्शन केव्हाना केव्हा तरी येणार याची विश्लेषकांची अटकळ होतीच. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प हे निमित्त ठरलं.

5. हक्काचं उत्पन्न गेलं, राखीव निधीचा वापर

Image copyright MCGM

मालमत्ता कर आणि विकास नियोजन खात्याच्या उत्पन्नात घट झाल्यानं मुंबई महापालिकेने यंदा आरोग्य सेवा, कारखाना परवाना अशा विविध सेवांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर पाणीपट्टीत दरवर्षी सात ते आठ टक्के वाढीचे अधिकार प्रशासनाकडे आहेत. मालमत्ता करात वाढ करण्यावर मर्यादा असल्यानं थेट करवाढ न करता महापालिकेनं मागच्या दाराने मुंबईच्या नागरिकांचा खिसा कापला आहे.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच राखीव निधीतून दोन हजार 700 कोटी रुपये विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहेत.

2018-19 या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी 2569 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी 27 हजार 258 कोटींचं बजेट सादर केलं. गेल्या वर्षी 25 हजार 141 कोटी रुपयांचं बजेट सादर करण्यात आलं होतं.

हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : #BollywoodSexism : 'बॉलीवुडमध्ये लैंगिक शोषण नक्कीच होत असणार'

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)