#HerChoice : लिव्ह-इन रिलेशनशीप तुटल्यानंतरही तिनं बाळाला जन्म दिला, पण...

स्त्री-पुरुष संवादाचं काल्पनिक चित्र

प्रेमात पडताना तो परकीय आहे, माझ्या देशातला नाही, माझ्या धर्माचा नाही, माझ्या जातीचाही नाही, हा कुठला विचार मी केला नव्हता. या गोष्टींनी तेव्हा काही फरक पडला नाही. पण, आमचं लिव्हइन रिलेशनशिपचं नातं तुटून एक महिनाही झाला नव्हता आणि मी त्याच्या बाळाची आई होणार होते.

माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना वाटलं होतं की, मी वेडी झाले आहे. कारण, मी कुमारी माता होणार होते. २१ वर्षांची कुमारी असूनही मी बाळाला जन्म देणार होते. मलाही असंच वाटत होतं की मी वेडी होईन.

खूप काहीतरी वाईट होईल असं वाटून मी मनातून घाबरुन गेले होते. पण, व्हायचं ते होऊन गेलं होतं.

मी १९ वर्षांची होते तेव्हा पहिल्यांदा मुस्तफाला भेटले होते. ईशान्य भारतातल्या एका छोट्या शहरातली मी माझं गाव सोडून देशातल्या दुसऱ्या कोपऱ्यातल्या एका मोठ्या शहरात कॉल सेंटरमध्ये नोकरी करायला आले होते.

मुस्तफा हा मूळचा आफ्रिकी वंशाचा होता. तो 'टॉल, डार्क, हँडसम' या प्रकारात मोडत होता. त्याच्या व्यक्तिमत्वात 'स्वॅग' होता. माझं तरुण हृदय त्याच्याकडे आकर्षिलं गेलं.


प्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.


एक-दीड वर्षांच्या मैत्रीनंतर आम्ही एकत्र राहण्यास सुरुवात केली. मी ख्रिश्चन आहे, तर तो मुसलमान होता. आमचं एकमेकांवर प्रेम होतं. पण, लग्नाचा विचार करण्याची दोघांमध्येही हिंमत नव्हती.

आम्ही स्वप्नांच्या त्या दुनियेत जगत होतो, जिथे पुढच्या आयुष्याबद्दल विचार करणं म्हणजे पाप केल्यासारखं वाटायचं. त्याचे अनेक मित्र नेहमी आमच्या घरी येत असत. मी पण त्यांच्यासोबत हसत-खेळत बोलायचे.

पण, माहीत नाही मुस्तफाच्या मनात त्या वेळी संशयानं घर केलं होतं. त्याला असं वाटायचं की, माझं त्याच्या मित्रांसोबत अफेअर आहे. आणि याच गोष्टीवरून आमच्यात वादाला सुरुवात झाली.

हळूहळू हे वाद विकोपाला गेले आणि आम्ही एकमेकांवर आरडा-ओरडा करूनच दिवस काढायला लागलो. शेवटी आमचं ब्रेक-अप झालंच.

मी फार उदास झाले, निराश झाले. तासनतास रडत राहिल्यानं त्याचा माझ्या कामावरही परिणाम होऊ लागला. माझी नोकरीसुद्धा सुटली. मी माझ्या घरी परतायचा निर्णय घेतला. माझं छोटं घर आणि तिथल्या अनुभवांपासून मला लांब जायचं होतं.

पण, माझं सगळं प्लॅनिंगच बिघडलं, जेव्हा माझी मासिक पाळी चुकली. जवळच्याच एका दुकानातून मी 'प्रेग्नन्सी टेस्टिंग किट' घेऊन आले आणि माझी भीती खरी ठरली. टेस्टचा निकाल 'पॉझिटिव्ह' आला होता.

पहिल्यांदा मी त्याच्या दबावानं गर्भपात केला होता. पण यावेळी...

मी मुस्तफाला फोन करून कॅफेमध्ये बोलावून घेतलं. समोरा-समोर बसल्यावर जेव्हा त्याला प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं, तेव्हा तो माझ्यावरच वैतागून म्हणाला की, मी काळजी का नाही घेतली म्हणून.

त्यानं मला अनेक कारणं सांगून हे मूलं पाडण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानं इतकंही म्हटलं की, "हे मूल माझंच आहे यावर मी विश्वास कसा ठेऊ?"

दुसऱ्यांदा आपल्याच बाळाची हत्या करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. असं नव्हतं की, याची मला भीती वाटत होती. माझे अश्रू उलट थांबतच नव्हते. माझं लग्न झालं नव्हतं आणि माझ्या जवळ चांगली नोकरीही नव्हती.

बाळाचा बाप तर त्याला स्वतःचं बाळ मानण्यासही तयार नव्हता. पण, असंही वाटत होतं की, देव मला नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची संधीही देतो आहे.

आतापर्यंत मी एका बेपर्वा युवतीचं जीवन जगत होते. सगळ्यांना शंका होती की, मी मूल झालं तरी बाळाचं पालन-पोषण करू शकणार नाही.

मला माहीत होतं की, माझा रस्ता खडतर आहे. पण, माझ्याकडे आता जबाबदार होण्यासाठी कारण होतं. माझ्या जन्माला न आलेल्या बाळाचं प्रेम मला त्याला जगात आणण्यासाठी प्रवृत्त करत होतं.

मी घाबरत-घाबरतच माझ्या कुटुंबाला याबाबत सांगितलं. त्यांना मुस्तफाबाबत पहिल्यापासूनच माहीत होतं. पण, मी गरोदर राहिल्याचं कळल्यावर त्यांना खूपच राग आला.

मी लग्नापूर्वी आई होणार आहे हे ऐकून ते एवढे नाराज झाले नाहीत. पण, ते मूल एका विदेशी आणि परधर्मीय तरुणाचं होतं हे ऐकून ते जास्त नाराज झाले होते.

मी त्यांना आश्वासन दिलं की, मी स्वतः सगळं सांभाळून घेईन. त्यांनी पण परत कधी मदतीसाठी विचारलं नाही. या कठीण काळात माझ्या एका मैत्रिणीनं मला खूप मदत केली.

तिचीच स्कूटी घेऊन मी डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी जात असे. आपला खर्च भागवण्यासाठी मी एका दुकानात सेल्स गर्ल्स म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

या काळात माझी समजूत काढण्याचा मुस्तफानं अनेकदा प्रयत्न केला, मात्र माझा निर्धार पक्का होता. डिलिव्हरीच्या दिवशी माझी मैत्रीण मला स्कूटीवर बसवूनच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.

एक तासाच्या सिझेरियन ऑपरेशननंतर माझ्या मुलाचा जन्म झाला. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या हातात माझा मुलगा होता आणि डॉक्टर माझ्याकडे बघून हसत उभी होती.

मी खूप आनंदून गेले होते. वाटत होतं की, सगळं ठीक होईल. संध्याकाळी मुस्तफासुद्धा हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यानं मुलाला हातात घेऊन आपल्या मित्राला फोन करून सांगितलं की, मी एका मुलाचा बाप झालो आहे.

मुस्तफाला एवढं खूष बघून मी चक्रावलेच होते. पण, कुटुंबाला याबद्दल सांगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती.

त्यानं पुन्हा आपलं नातं सुरू करू या, अशी इच्छा व्यक्त केली. त्याला मुलाला मुस्लीम नाव देण्याची इच्छा होती. पण, मी नकार दिला आणि त्याला ख्रिश्चन नाव दिलं.

मी मुस्तफावर विश्वास ठेऊ शकत नव्हते. काही दिवसांनी माझी आई आणि माझी चुलत बहीण देखील माझ्याकडे आल्या. त्यामुळे आता मी एकटी नव्हते.

पुढच्या वर्षी मुस्तफा परत माझ्या आयुष्यात कधीच न येण्यासाठी त्याच्या देशात परतला.

आता मी 30 वर्षांची आहे आणि माझा मुलगा ६ वर्षांचा आहे. हा काळ फार कठीण होता, पण मुलाला मोठं करता-करता मी अजून निडर झाले. मी लोकांना बिनदिक्कत सांगते की, माझं लग्न झालं नाही. पण, मला एक मुलगा आहे.

मुलाला पण सांगून ठेवलं आहे की, तुला कोणी बापाचं नाव विचारलं तर त्यांचं नाव मुस्तफा आहे असं सांग.

माझा मुलगा आता माझ्या आईच्या घरी राहतो आणि मी इथे करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आता पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये मी गाणी गाते आणि पैसे कमावते.

पैसे जमवून आपल्या मुलाचं भवितव्य मला सुरक्षित करायचं आहे. तो खूप गोड मुलगा आहे.

मुस्तफासोबत माझं नातं आता पूर्णपणे संपून गेलं आहे. तरीही अजून वाटतं की, ते नातं खूप खास होतं. कारण, या नात्यानं मला जीवन जगण्याची शिकवण दिली आहे.

मला पुन्हा प्रेमात पडायची इच्छा आहे. लग्नही करायचं आहे. पण, घाई नक्कीच नाहीये.

(उत्तर भारतात राहणाऱ्या एका स्त्रीच्या आयुष्यात घडलेला हा खरा प्रसंग आहे. तिनंच ही कहाणी बीबीसी रिपोर्टर सिंधुवासिनी यांना सांगितली. सिंधूवासिनी यांनी ही शब्दबद्ध केली असून याची निर्मिती दिव्या आर्य यांनी केली आहे. या स्त्रीचं नाव गुप्त ठेवण्यात आलं असून तिच्या विनंतीवरून पुरुषाचं नावही बदलण्यात आलं आहे.)

हे वाचलं का?

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)