ग्राऊंड रिपोर्ट : दिल्लीतही 'सैराट' घडतं तेव्हा...

honor killing, relationships. Image copyright Ankit Saxena/ Facebook
प्रतिमा मथळा पश्चिम दिल्लीतील रघुवीर नगरात अंकित सक्सेनाची हत्या करण्यात आली.

राजधानी दिल्लीत अंकित सक्सेना नावाच्या तरुणाची हत्या झाली. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणाच्या मुद्द्यावरून अंकितची हत्या झाल्याचं समोर येतं आहे. खळबळ उडवून देणाऱ्या या हत्याकांडानंतर घटनास्थळावर जाऊन केलेला ग्राऊंड रिपोर्ट.

14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन्स डेच्या सेलिब्रेशनच्या तयारीसाठी सज्ज लाल रंगाच्या फुलांनी सजलेली दुकानं, गाड्यांची वर्दळ, लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या आया, मंदिरातून ऐकू जाणारा कीर्तनाचा गजर... पश्चिम दिल्लीतल्या रघुवीर नगरचं हे चित्र. या परिसरात आल्यावर असं चित्र समोर येतं. पण आपण हळूहळू पुढे जातो तशा गोष्टी बदलू लागतात.

जागोजागी पोलिसांच्या फौजा, लोकांची गर्दी आणि माइक-कॅमरे यांच्यासह धावपळ करणारी मीडियाची माणसं दिसू लागतात.

तिथे अंकित राहत असे...

आणखी पुढे गेलं की, अंकित सक्सेना, दिवसाढवळ्या हत्या, ऑनर किलिंग, मुसलमान आणि जातीय हिंसा असे शब्द कानी पडू लागतात.

प्रतिमा मथळा अंकितच्या घराचा परिसर.

परिसरातल्या प्रत्येकाला अंकित सक्सेनाचं घर कुठे आहे ठाऊक आहे. तोच अंकित ज्याची दोन दिवसांपूर्वी चाकूने गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

तणावपूर्ण शांतता असलेल्या अनेक गल्ल्या पार करत आम्ही अंकितच्या घराजवळ पोहोचतो.

प्रतिमा मथळा अंकितचं प्रेम असलेल्या त्या मुलीचं घर. त्या घराला कुलूप आहे.

घराच्या आजूबाजूची दुकानं बंद आहेत. घराच्या बाहेर काही माणसं आपापसात बोलत असतात. अंकितच्या घरी जाण्यात काही अर्थ नाही असं ही माणसं सांगतात कारण अंकितच्या अस्थीविसर्जनासाठी त्याचे वडील हरिद्वारला गेले आहेत तर मानसिक धक्क्यामुळे आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडलं त्यादिवशी

पश्चिम दिल्लीतल्या रघुवीर नगरात 23वर्षीय फोटोग्राफर अंकित सक्सेनाची हत्या करण्यात आली. एका युवतीच्या नातेवाईकांबरोबर झालेल्या भांडणानंतर भर रस्त्यावर ही हत्या झाल्याचं सांगितलं जातं. पोलिसांच्या सांगण्यानुसार, अंकितचं अल्पसंख्याक समाजातील एका 20वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. हत्येच्या आधी अंकित मेट्रो स्टेशनबाहेर त्या मुलीचीच वाट पाहात होता. त्या मुलीच्या चार नातेवाईकांनी मिळून अंकितची हत्या केल्याचा आरोप होतो आहे.

प्रतिमा मथळा अंकितच्या घराच्या परिसरात चहूबाजूंनी मीडियाचं अस्तित्व जाणवतं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अंकित आणि युवतीच्या प्रेमसंबंधांना तिचे वडील, मामा आणि 16 वर्षांचा भाऊ यांचा विरोध होता. मुलीपासून दूर राहण्याचा सल्ला नातेवाईकांनी अंकितला दिला होता. याच मुद्यावरून अंकित आणि मुलीच्या नातेवाईकांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. या वादातूनच मुलीच्या वडिलांनी अंकितची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप होतो आहे. अंकित आणि ती मुलगी एकाच परिसरात राहत होते.

नातेवाईक आणि शेजाऱ्यांचं काय म्हणणं?

अंकितचे नातेवाईक आणि शेजारी मीडियावर नाराज आहेत.

एक शेजारी म्हणाले, "तुम्ही कृपया इथून निघून जा. आम्हाला कोणालाही भेटायचं नाही. अंकितच्या आईवडिलांनी आम्हाला कोणाशीही बोलू नका अशी विनंती केली आहे."

प्रतिमा मथळा अंकितच्या घरी जाणारा रस्ता

बाजूलाच राहणाऱ्या एका महिलेनं सांगितलं की, "आम्ही हिंदू-मुस्लीम असं कधीच म्हटलं नव्हतं. हे सगळं मीडियानं तयार केलं आहे. आमचा मीडियावरचा विश्वास उडाला आहे. वादाच्या आगीत तेल ओतण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र आमच्या परिसरातल्या मुलाचं नाव आम्ही बदनाम करणार नाही."

'वाद वाढवायचा नाहीये'

"आमच्या मोहल्ल्यात काल एक माणूस आला होता. तो म्हणाला, 'एक आवाज द्या. 100 माणसं तयार आहेत. मशिदीत जाऊ या'. आम्ही तात्काळ पोलिसांना बोलावलं. त्यानंतर तो पळून गेला."

तो माणूस कोण? असं विचारल्यावर उत्तर मिळालं - ''तो माणूस कोण आम्हाला ठाऊक नाही. त्याआधी मनोज तिवारी (दिल्ली भाजपचे अध्यक्ष) इथे आले होते. ते गेल्यानंतर अचानकच हा माणूस आला. आम्हाला कल्पनाच नाही. आम्हाला वाद वाढवायचा नाहीये''.

तिथल्या बायका सांगतात- ''अंकित हसतमुख मुलगा होता. नेहमी मिळूनमिसळून राहत असे. गुणी मुलगा होता. परिसरातल्या कोणालाही विचारा. सगळे जण हेच सांगतात''.

'ज्या दिवशी हे घडलं, त्यादिवशी दुपारी तो माझ्या घरी आला होता. माझी विचारपूसही केली होती', असं एका पोक्त वयाच्या व्यक्तीने सांगितलं.

'अंकितचे आईवडील अख्खी रात्र रडत होते. दुसरा दिवस उजाडला तेव्हाही त्यांच्या घरातून रडण्याचा भेसूर आवाज येतच होता', असं शेजाऱ्यांनी सांगितलं.

'आता आम्ही त्यांना इथे राहू देणार नाही. एकुलता एक मुलगा होता. तोच गेला. आईवडील कोणाकडे बघून जगणार? असं नातेवाईकांनी सांगितलं.

लहानपणीचा दोस्त

'अंकित आणि मी लहानपणापासून मित्र होतो. अंकित आणि ती मुलगी दोन वर्षांपासून रिलेनशिपमध्ये होते. मात्र एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते', असं अंकितच्या मित्रानं सांगितलं.

'अंकित राहतो त्याच ब्लॉकमध्ये गुलरेज राहत असे. तीन वर्षांपूर्वी गुलरेजचं कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं मात्र आक्षेप घ्यावा अशा गोष्टी करताना कधीही दिसले नव्हते', असं अंकितच्या मित्रांनी सांगितलं.

'दोघं अनेकदा मेट्रो स्टेशनवरच भेटत असत. फोनवर बराच वेळ बोलत असत. गुलरेजवर खूप प्रेम आहे, असं अंकित सांगत असे. तिच्याशीच लग्न करायचं आहे असंही सांगत', असं अंकितच्या मित्राने सांगितलं.

भविष्यात काय करायचं आहे याची अंकितला जाण होती. त्याला मॉडेलिंग करायचं होतं. त्यासाठी प्रयत्नही करत होता.

गुलरेजचंही अंकितवर खूप प्रेम होतं. धर्म आणि जात वेगळी असूनही गुलरेजला अंकितशी लग्न करायचं होतं.

'अंकित नेहमी म्हणायचा मुलगी माझ्या पसंतीची असेल. लग्न कोणत्याही पद्धतीने होऊ द्या. माझं लग्न होईल तेव्हा डीजे आणीन आणि सगळ्यांना नाचावं लागेल. लग्नाच्या वेळी जी गाणी म्हटली जातात ती गाणी म्हणायला तुम्ही या, असं त्यानं शेजारच्या एका काकूंना सांगितलं होतं', अशी आठवण अंकितच्या शेजाऱ्यांनी सांगितलं.

अंकितचे मित्र

अंकितच्या घरासमोर मोबाईलचं दुकान आहे. या दुकानाच्या समोर उभं राहून काढलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर आहे. या दुकानात अंकित नेहमी जात असे. दुकानात काम करणारा एक मुलगा अंकितचा जिगरी दोस्त होता.

प्रतिमा मथळा ती घटना या दुकानासमोरच घडली. तेव्हापासून हे दुकान बंद आहे.

तो मुलगा अंकितच्या 'आवारा बॉइज' युट्यूब चॅनेलसाठीही काम करत असे. दुकानाच्या मालकाशीही त्याची ओळख होती.

त्यांनी सांगितलं, "त्यादिवशी दुपारी अंकित लॅपटॉप घेऊन आला होता. जवळपास तासभर दुकानात होता. यूट्यूब चॅनेलसाठीचे काही व्हीडिओ एडिट करत होता. संध्याकाळी जेव्हा हे भांडण झालं, त्याच्या काही मिनिटं आधी माझ्याच दुकानासमोर उभं राहून फोनवर बोलत होता."

दुकानाच्या मालकाचा दावा

दुकानाच्या मालकानं आम्हाला सीसीटीव्हीचं फुटेजही दाखवलं. मात्र ते हे फुटेज कोणालाही देऊ शकत नाहीत कारण पोलिसांनी तसं करण्यावर बंदी घातली आहे, असं ते म्हणाले.

फुटेजमध्ये अंकित आठ वाजेपर्यंत दुकानाच्या बाहेर येरझाऱ्या घालत फोनवर बोलत असल्याचं स्पष्ट दिसतं.

प्रतिमा मथळा घटनास्थळासमोरची इमारत.

दुकान मालकाच्या म्हणण्यानुसार, मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती अशा बातम्या मीडियाने दिल्या होत्या. असं काहीच नव्हतं. ती त्या दिवशी संध्याकाळीच बाहेर पडली होती. तिला घरी यायला उशीर झाला होता. तेव्हाच आईवडील, भाऊ आणि मामाने अंकितला रस्त्यात अडवलं.

भांडण सुरू झालं

दुकान मालक म्हणाला, ' अंकित आणि गुलरेजच्या कुटुंबीयांचं भांडण सुरू झालं. त्यांनी त्याला पकडून मारायला सुरुवात केली तेव्हा कोणीतरी अंकितच्या घरी जाऊन हे सांगितलं. त्याचे आईवडील घटनास्थळी धावले. त्यांनी भांडणात पडून मुलीच्या कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मीही भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला."

"अंकित मला म्हणाला, काका तुम्ही पोलीस स्टेशनात जा. गुलरेज माझ्याबरोबर नाहीये. आम्ही पोलिसांना बोलवायला सांगितलं. थोडावेळ वातावरण निवळलं. दोन्ही बाजूची माणसं एकमेकांपासून दूर होऊन उभे राहिले. मी अंकितला घेऊन दुकानात आलो".

प्रतिमा मथळा घडलेल्या घटनेनं परिसरातले लोक दु:खी आहेत. मात्र त्यांना कोणत्याही धर्माबद्दल आक्षेप नाही.

त्यानंतर अंकित दुकानाच्या बाहेर फोनवर बोलत असल्याचं फुटेज आम्ही पाहिलं. थोड्या वेळानंतर अंकित दुकानासमोरून निघून गेल्याचंही आम्ही सीसीटीव्हीत पाहिलं.

यापुढच्या घटना दुकानाच्या मालकांनी पाहिलेल्या नाहीत. मात्र आजूबाजूच्या ओळखींच्या माणसांकडून त्यांना घटनाक्रम समजला. त्यांनी ऐकलेल्या गोष्टी आमच्यासमोर मांडल्या. गुलरेजच्या आईने तुझ्या आईला धक्का दिला आहे. त्या पडल्या आहेत असं अंकितला कोणीतरी सांगितलं. अंकित धावत तिकडे गेला. आईला उचलण्यासाठी पुढे झाला.

त्याचवेळी मुलीचे वडील, भाऊ आणि मामाने अंकितचे खांदे पकडले. मुलीच्या वडिलांनी खाटकांकडे असतो तसा सुरा अंकितच्या गळ्यावर चालवला. आरडाओरड होताच दुकानाचा मालक आणि आजूबाजूची माणसं तिकडे पोहोचले.

अंकितला वाचवलं?

दुकान मालकाच्या म्हणण्यानुसार अंकितला बेसावध ठेऊन मारण्यात आलं. त्याला मागच्या बाजूने मारण्यात आलं. समोरून हल्ला झाला असता तर अंकितने चार लोकांचाही सामना केला असता. हल्ला झाल्यावर एवढं रक्त वाहत होतं की विचारूच नका.

ते पुढे म्हणाले, "गुलरेजसाठी अंकितसारखा मुलगा शोधूनही सापडला नसता. तिचे आईवडीलही अंकितपेक्षा चांगला मुलगा शोधू शकले नसते. अंकितच्या जीवाला धोका आहे याची आम्हाला पुसटशी कल्पनादेखील नव्हती. नाहीतर आम्ही पोलिसांना बोलावलं असतं".

गुलरेजच्या कुटुंबीयांना अटक करण्यात आली असून, गुलरेजला नारी निकेतन केंद्रात पाठवण्यात आल्याचं पश्चिम दिल्लीचे डीसीपी विजय कुमार सिंह यांनी सांगितलं.

मुलीचं घर

गुलरेजचं घर अंकितच्या घरापासून फार दूर नाही. गल्लीच्या टोकाला तिसऱ्या माळ्यावर गुलरेजच्या घराबाहेर हिरवा झेंडा फडकताना दिसतो. घराला कुलूप दिसतं. तिथे आता कोणीच नाही असं शेजारी सांगतात.

प्रतिमा मथळा मुलीच्या घरासमोरही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो.

वरच्या मजल्यावरच्या एका मुलीने आपलं म्हणणं सांगितलं. "ही खूप चांगली माणसं होती. काही दिवसांपू्र्वीच आम्ही इथे राहायला आलो. सगळ्यांनी आमची खूप मदत केली. ते असं वागू शकतील यावर विश्वासच बसत नाही', असं ती मुलगी म्हणाली.

अंकित आणि गुलरेज यांचं प्रेमप्रकरण होतं. मात्र फारच कमी वेळा ते दोघं एकत्र दिसत. दोघंही संस्कारी मुलं होती.

दीर्घ श्वास घेऊन त्या म्हणाल्या, "जे झालं त्याने कोणाचाच फायदा झाला नाही. दोन्ही कुटुंबांचं कधीही भरून येणार नाही असं नुकसान झालं. त्यांचं लग्न झालं असतं तर.... आता गुलरेजचं कुटुंब इथे राहायला आलं तरी आम्ही त्यांना राहू देणार नाही. आमच्या मुलांना धोका होईल असं काही आम्ही वागू शकत नाही."

चालता चालता आमचं लक्ष घराच्या छपराकडे गेलं. तिथे हिरवा झेंडा फडकत होता. त्या घराच्या बाल्कनीत कपडे वाळत घालायच्या तारेपाशी तुळशीचं रोपटं होतं. त्या तारेवर 'असलमचा कुर्ता' आणि 'सोनमची ओढणी' एकत्र वाळत होते.

आम्हाला अंकितच्या नातेवाईकांचं बोलणं आठवलं. ते म्हणाले होते, "हा हिंदू-मुसलमान असा प्रश्न नाही. न्याय-अन्यायाचा मुद्दा आहे".

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)