#5मोठ्याबातम्या : जम्मू काश्मीरच्या राजौरीत चकमकीत भारताचे 4 जवान ठार

भारतीय लष्कर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय लष्कर ( संग्रहित छायाचित्र)

पाहूयात आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. भारताचे चार जवान ठार

पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आल्याचं वृत्त 'NDTV'नं दिलं आहे.

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या भीमबेर आणि मंझाकोट सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यातले एक अधिकारी आणि तीन सैनिक ठार झाले आहेत. या भागात अजूनही गोळीबार सुरू असल्याचं 'NDTV'नं या वृत्तात म्हटलं आहे.

"पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबारी आणि मॉर्टरनं हल्ला करण्यात आला. भारतीय सेनेनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर त्या चकमकीत भारताचे चार जण शहीद झाले," असं लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

2. मुंबई विमानतळावर विक्रमी उड्डाणं

20 जानेवारी रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्वतःचाच जुना विक्रम मोडत नवा विक्रम रचला आहे.

जगातल्या सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विमानतळावर 24 तासांमध्ये 980 विमानांनी टेक ऑफ आणि लॅंडिंग केलं आहे.

Image copyright PUNIT PARANJPE/getty
प्रतिमा मथळा मुंबई विमानतळ

या आधीचा विक्रम 6 डिसेंबर रोजीचा होता, जेव्हा 974 विमानांनी ये-जा केली होती, असं वृत्त 'द हिंदू'नं दिलं आहे.

लंडनमधल्या गॅटविक विमानतळाची तासाला 55 विमानांचं लॅंडिंग किंवा टेक-ऑफ करण्याची क्षमता आहे. तर मुंबईच्या विमानतळावर ताशी 52 विमानं झेपावू किंवा लँड करू शकतात.

3. 'सरकारच्या धोरणांवरील विश्वास उडाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ'

"शेतकऱ्यांचा सरकारच्या धोरणांवरील विश्वास उडाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे," असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केल्याचे वृत्त 'लोकसत्ता'ने दिलं आहे.

"जनावरांना जेवढी किंमत आहे तेवढी शेतकऱ्यांच्या आत्महत्येला नाही," असं ते यावेळी म्हणाले. परभणीतील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते वैजनाथराव रसाळ यांच्या मरणोत्तर कार्यगौरव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

4. भाजपवर दबाण आणा : TDP खासदारांना सूचना

"सत्ताधारी भारतीय जनता पक्षासोबत चर्चा करण्याची वेळ आणि संयम दोन्ही आता संपले आहेत. आता संसदेत गदारोळ करा, त्यांच्यावर दबाव आणा," असं सत्ताधारी भाजपचे जुना सहकारी असलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या (TDP) खासदारांना सांगण्यात आलं आहे.

"आंध्र प्रदेशच्या प्रश्नांवर केंद्र सरकार लक्ष का देत नाही आहे. महसूल, पोलवरम प्रकल्प, राजधानी अमरावतीसाठी आणखी निधी, यांसारख्या प्रश्नांवर भाजप सरकार काहीच का करत नाही आहे?" असं TDPच्या मुख्य समितीचे सदस्य आणि दिल्लीतले पक्षाचे प्रतिनिधी कंभमपती राममोहन राव यांनी सांगितल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

"युतीचं काय ते नंतर पाहून घेऊ," असंही ते म्हणाले.

या आधी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते, "मी युतीचा धर्म पाळतोय, त्यामुळं शांत बसलो आहे. युतीतल्या भागीदाराला असं कोण वागवतं. माझ्या सहकाऱ्यांना देखील मी भाजपविरोधात न बोलण्याचे आदेश दिले आहेत. पण जर भाजपला माझी गरज नसेल तर मी निघून जातो."

5. फेसबुकवर 20 कोटी खाती बनावट

फेसबुकवर एकूण 20 कोटी खाती बनावट असण्याची शक्यता आहे, असं फेसबुकच्या वार्षिक अहवालातून समोर आल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'नं दिलं आहे.

Image copyright Mark Zuckerburg/Facebook
प्रतिमा मथळा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग

जगभरात फेसबुकवर अनेक जणांनी खोटे अकाउंट उघडले आहेत. त्यातले बहुतांश अकाउंट भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारख्या विकसनशील देशात आहेत.

2016च्या अखेरीस फेसबुकवर 1.86 अब्ज अॅक्टिव्ह युजर्स होते. सध्या फेसबुकचे अॅक्टिव्ह युजर्स 2.13 अब्ज आहेत त्यापैकी 10 टक्के युजर्स हे फेक (बनावट), असू शकतात असं फेसबुकनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)