सोशल : तलाकच्या मुद्द्यावर बोलून 'पवार साहेब निवडणुकांसाठी पायाभरणी करत आहेत'

फेसबुक Image copyright Matthew Lewis/Getty Images

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्च्यादरम्यान पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी, कुराणच्या बाबतीत हस्तक्षेप करण्याचा राज्यकर्त्यांना अधिकार नाही, असं म्हटलं आहे.

"तलाक हा कुराण आणि पैगंबरांनी दिलेला मार्ग आणि संदेश आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही. सरकारने मुस्लीम नेते आणि धर्मगुरूंना विश्वासात घेऊन पुढचं पाऊल टाकायला हवं. त्यात जर कुणी हस्तक्षेप करत असेल तर त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही," असं पवार म्हणाले.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना शरद पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्या होत्या.

वाचकांच्या भरभरून प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या प्रातिनिधिक.

योगेंद्र शिंदे लिहितात, "साहेब, तुम्ही आता रिटायरमेंट घ्यावी. बस झालं तुमचं राजकारण. देशाला पुढे जाऊ द्या आता."

Image copyright Facebook

जितेंद्र जोशी यांनी मिश्किली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "बाकी काही नाही. साहेब इलेक्शनच्या तयारीला लागले म्हणायचे."

"कुराण असो वा बायबल अथवा भगवत गीता. जे संविधानानुसार असेल तेच होईल या देशात. आणि राज्यकर्त्यांनी तर बोलूच नये. तुम्ही स्वतःच संभ्रमात असता. हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि सगळे अधिकार न्यायव्यवस्थेला आहेत," असं मत व्यक्त केलं आहे प्रविण सरवदे यांनी.

Image copyright Facebook

"सत्तेपासून खूप दिवस लांब राहिल्याने केवळ निराशेतून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे," असं अमित कांडेकर यांना वाटतं.

Image copyright Facebook

"आणि यांना जाणता राजा म्हणतात. कदाचित राजकीय संधी कशी साधावी ह्याची जाण त्यांच्या इतकी कुणालाही नसेल म्हणून असेल," असं ट्वीट केलं आहे शशांक एच यांनी.

तर ओंकार कुलकर्णी म्हणतात, "शेवटी औरंगाबादमध्येच जाऊन बोलले ना? मुजरा!"

"साहेब, तुम्ही फक्त मुस्लीम मतदारांचा वापर करून घेतलात इतके वर्षं. तुमच्या काळात जेवढे निर्दोष मुस्लीम युवक बॉम्बस्फोटात जेलमध्ये गेले तेवढे सगळे बीजेपीच्या काळात निर्दोष सुटले," अशी प्रतिक्रिया दिली आहे अफरोज पठाण यांनी.

Image copyright Facebook

यतिराज पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. "उसाला दर, हमीभाव, शेतकऱ्याचे प्रश्न, कृषीमाल निर्यात एवढ्यापुरतंच तुमचं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवा. शेतकऱ्यांचे उपकार आहेत राष्ट्रवादीवर. न्याय द्या शेतकऱ्याला," असं ते म्हणतात.

Image copyright Facebook

"साहेंबाना मंदिर प्रवेशाबद्दल पण विचारा," असा टोमणा मारला आहे रविराज धर्माधिकारींनी.

Image copyright Facebook

दिपक सूर्यवंशी म्हणतात, "मागील चार वर्षं पवार साहेब गप्प राहिले. आणि आता पुढच्या वर्षी निवडणुका आहेत त्याची पायाभरणी करत आहेत."

Image copyright Facebook

डॅन कुमार लिहितात की, "3 वर्षं कारावास हे फक्त मुस्लीम पुरुषांना लागू करणं, हे न्याय्य वाटत नाही. करायचं असेल तर हा कायदा सगळ्या धर्मांना लागू करा."

Image copyright Facebook

"गरज पडली तर साहेब उद्या तालिबानचंही समर्थन करतील," असं मत व्यक्त केलं आहे विनायक दळवी यांनी.

Image copyright Facebook

तर दिपक भागवत म्हणतात की, "पवार यांचं हे विधान म्हणजे अप्रत्यक्षरीत्या संविधान मान्य नसल्याची कबुलीच."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)