इंटरनेटवरच्या प्रसिद्धीसाठी त्यानं रणगाडा बनवला खरा, पण...

चीन Image copyright CCTV

चीनमध्ये एका व्यक्तीनं आपल्या जुन्या ट्रकचं रुपांतर रणगाड्यात केलं. पण त्याची ही करामत सोशल मीडियावर टाकणं त्याला चांगलंच महागात पडलं.

चीनच्या सीसीटीव्ही न्यूजनुसार दक्षिण गुआनशीच्या लेबिन नावाच्या शहरात राहणारे हुआंहंग यांना या कामाला दोन महिने लागले.

त्यांनी एका जुन्या ट्रकच्या आकारात बदल केला. एक बंदूक आणि रडार डिश लावली. आपल्या करामतीनं आणि अभियांत्रिकीच्या कौशल्यामुळे इंटरनेटवर प्रसिद्ध होण्याची त्यांना आशा होती.

सीसीटीव्हीच्या मते हुआंहंग यांनी या ट्रकला सेनेच्या रणगाड्यासारखा रंग देण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर आपल्या मित्राला दाखवण्याचा प्रयत्न केला.

पण मित्राबरोबर प्रशासनाचं लक्षसुद्धा या रणगाड्यावर गेलं.

सीसीटीव्हीनुसार हुआंहंग या गाडीला रस्त्यावर घेऊन जाणार होते, पण 22 जानेवारीला पोलिसांनी त्यांना थांबवलं.

परवाना रद्द

बातम्यांनुसार त्यांना 1750 युआन (17,805 रुपये) इतका दंड भरावा लागला. आणि त्यांचा परवाना रद्द झाला.

हुआंहंग यांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

रस्ता सुरक्षा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि लोकांसाठी धोकादायक ठरण्याच्या शक्यातेमुळे या वाहनाला जप्त करून नष्ट करण्यात येईल असं पोलिसांनी त्यांना सांगितलं.

Image copyright MIAOPAI

या घटनेनं सोशल मीडियावर लोक हैराण झाले आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं की, हुआंहंग यांच्या वाहनामुशे पोलीस घाबरले असतील.

आणखी एक व्यक्तीनं लिहिलं,"रस्ते हे रणगाड्यांसाठी नाहीत, हे कळणं तितकंसं कठीण नाही."

आणखी एकानं टीका करताना म्हटलं,"हा सुद्धा इतर ऑनलाईन सेलिब्रिटींसारखाच दिसत आहे."

(बीबीसी प्रतिनिधी केरी अलेन यांचा रिपोर्ट)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)