चेतन भगत यांच्यासारखं इंग्रजी लिखाण परदेशात समजण्यासारखं नाही : शशी थरूर

शशी थरूर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काँग्रेस नेते आणि लेखक शशी थरूर

कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवलं तरी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आणि शशी थरूर यांच्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकेल? इंग्रजीमधले प्रथितयश लेखक आणि राजकारणी थरूर आपल्या अभिजात इंग्रजीमुळे अनेकदा अडचणीत सापडले आहेत.

कधी 'फरागो' आणि 'इंटरलोक्युटर' सारखे दुर्बोध शब्दांच्या वापरामुळे तर कधी 'कॅटल क्लास' च्या हेटाळणी करणाऱ्या शब्दांमुळे ते कायम चर्चेत असतात. बीबीसी हिंदीशी बोलताना शशी थरूर अगदी लहान मुलांसारखं निरागस होऊन म्हणाले, "मी कधी शब्दकोश बघून शब्दांचा वापर करत नाही. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी सगळ्यांत सशक्त शब्दांचा वापर करतो. एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नसेल तर त्याने नक्कीच डिक्शनरीचा वापर करावा."

शशी थरूर यांनी भलेही तीस वर्षांपर्यंत संयुक्त राष्ट्रात मोठ्या पदावर आणि पश्चिमात्य संस्कृतीत त्यांनी काम केलं आहे, तरी कोणती भाषा कधी बोलायला हवी. याची त्यांना चांगली जाण आहे.

भारतीय संदर्भ

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हवल सारख्या उच्चभ्रू महोत्सवाच्या गोंगाटात शशी थरूर यांची मुलाखत मिळणं हा एक मणिकांचन योग होता. थोड्या वेळासाठी का होईना पण ते मुलाखत द्यायला तयार झाले.

ते म्हणाले, "भारतातले संदर्भ वेगवेगळे आहेत. एखाद्या गावातली कथा लिहायची असेल तर इंग्रजीत लिहून उपयोग नाही. जर एखाद्या IAS ऑफिसरला आपली कथा सांगायची असेल तर उपमन्यू चॅटर्जीच्या 'इंग्लिश ऑगस्ट' सारखी कादंबरी इंग्लिशमध्येच लिहायला हवी. कारण तो विचार इंग्रजीत आहे. जर मी एखाद्या ऑटोरिक्षावाल्याशी इंग्रजीत बोललो तर तो मला थोबाडीत मारेल."

Image copyright @ShashiTharoor
प्रतिमा मथळा शशी थरूर आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

ज्या काळात इंग्रजीत कथा आणि कादंबऱ्या लिहिणाऱ्या भारतीय लेखकांची चर्चा होते आणि त्यांचं अनुकरण करून अध्यापक, पत्रकार, NGO किंवा कॉम्प्युटर प्रोग्रामर इंग्रजीत कादंबरी लिहून लाखो डॉलर अॅडवान्स मिळवण्याचं आणि सेलिब्रिटी बनण्याचं स्वप्न बघतात, त्याच वेळी थरूर भारतीय भाषांमध्ये लिहिलं जाणारं साहित्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय भाषांत...

लंडनहून प्रकाशित होणाऱ्या 'लिट्रो' या मासिकाच्या ताज्या अंकात 'ट्रांसलेटिंग इंडिया'चे अतिथी संपादक म्हणून शशी थरूर यांनी भारतीय भाषांत लिहिल्या जाणाऱ्या 11 लेखकांच्या कथा निवडल्या. ते सांगतात की जगभरात जे 20-25 नामवंत भारतीय लेखक आहेत त्यांच्यापैकी सात-आठ लोकांचा या यादीत समावेश आहे.

'लिट्रो'च्या या अंकात बंगाली लेखिका संगीता बंडोपाध्याय, तामिळचे पेरुमाल मुरुगन, मल्याळम लेखिका के. आर. मीरा, मल्याळम लेखक बेन्यामिन, हिंदीच्या मनीषा कुलश्रेष्ठ, कन्नडचे विवेक शानभाग, मल्याळम लेखक पॉल झकारिया आणि मानसी, आणि त्याबरोबरच इंग्रजीत सुष्मिता भट्टाचार्य आणि अनिता गोवियास यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.

मासिकाच्या संपादकीय लेखात थरूर यांनी भारतीय भाषांमध्ये लिहिलेल्या साहित्याताला आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देणं सोपं नाही, या गोष्टीचा स्वीकार केला आहे.

अनुवादाच्या समस्या

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "भारतीय भाषेतल्या लेखकांना जितकी मान्यता मिळायला हवी तितकी मिळत नाही, कारण अज्ञानामुळे लोक त्यांना ओळखत नाही आणि त्यांच्या लेखनाचा चांगला अनुवाद होत नाही."

Image copyright @ShashiTharoor

अनुवादाच्या आणखी एका समस्येकडे लक्ष वेधताना शशी थरूर म्हणाले, "प्रत्येक शब्दामागे एक सांस्कृतिक विचार आहे. तो डिक्शनरीमध्ये बघून समजत नाही. जसं हिंदीत 'तुम' आणि 'आप' या शब्दात फरक सांगणं कठीण आहे आणि प्रत्येक शब्दामागे फुटनोट लिहिली तर ती कोणी वाचणार नाही. जेव्हा त्यांचा भारतीय भाषांमध्ये अनुवाद होतो तेव्हा अनेक गोष्टी हरवून जातात, म्हणून आमचं साहित्य समजून घेण्यासाठी परदेशी लोकांना सुद्धा त्रास होतो."

पण भारतात इंग्रजीला अकारण महत्त्व दिलं जातं या 'लिट्रो'च्या संपादक एरिक अकोटो यांच्या मताला थरूर यांनी दुजोरा दिला नाही.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये एरिक सुद्धा हजर होते. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "'क्वीन्स इंग्लिश'मध्ये आम्हाला कोणताही रस नाही. या मासिकाद्वारे आम्ही भारतातल्या आवाजाला आंतरराष्ट्रीय मंचावर आणू इच्छितो."

श्रेष्ठ लेखन म्हणजे काय?

एरिक मानतात की भारतात इंग्रजीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. ते म्हणाले, "भारतात इंग्रजीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळालं आहे. काही मुठभर लोक आले आणि आपली भाषा सोडून गेले पण भारतीय भाषा मागच्या दोन हजार वर्षांपासून इथे आहे."

पण शशी थरूर मानतात की भारतातल्या इंग्रजी लेखनाला कमी लेखलं जाऊ शकत नाही, कारण या लेखनाचं परीक्षण करणाऱ्यांना श्रेष्ठ लेखन काय असतं, हे माहिती आहे.

ते म्हणतात, "हिंदुस्तानी भाषांमधल्या अनेक लेखकांना चांगलं इंग्रजी येतं. पण त्यांनी आपल्या भाषेत लिहिण्याचा निश्चय केला आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना जगभरात इंग्रजी आणि अन्य भाषात लिहिल्या जाणाऱ्या साहित्याची जाण नाही. कमीत कमी साठ ते सत्तर टक्के लोक आधुनिक साहित्य वाचतात. पण त्यांना असं वाटतं की त्यांची भाषा माहीत असलेले लोक त्यांचे विचार आपल्या भाषेत वाचावेत आणि समजून घ्यावेत."

14 वर्षांनंतर मल्याळम शिकले

उदाहरणादाखल, हे हिंदी लेखक निर्मल वर्मा आणि कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांचा उल्लेख करतात किंवा ओ. वी. विजयन ज्यांनी इंग्रजीत पत्रकारिता केली आहे आणि इंग्रजीत व्यंगचित्रं काढली आहेत. विजयन यांनी 14 वर्षांनंतर मल्याळम शिकले आणि आपलं पूर्ण साहित्य त्या भाषेत लिहिलं.

शशी थरूर इंग्रजीला एक भारतीय भाषा मानतात. गंमत म्हणून नाही तर गंभीर होऊन ते सांगतात की, "चेतन भगत ज्या पद्धतीने इंग्रजी लिहितात ते परदेशात कोणालाच समजण्यासारखं नाही किंवा दिल्ली विद्यापीठात जसं इंग्रजी बोलतात ते ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजमध्ये कोणालाच समजणार नाही."

शशी थरूर यांना सरळ प्रश्न विचारा किंवा कडक प्रश्न विचारला तरी ते चेहऱ्यावरचं हास्य आणि आपल्या डोळ्यातली पारदर्शकता कुठेही हरवू देत नाही.

"You coward Shashi Tharoor, where are you hiding?" अशा कर्कश स्वरात जेव्हा टीव्हीवरचे अँकर प्रश्न विचारतात तेव्हा कसं वाटतं?

प्रश्न ऐकून शशी थरूर मनमुराद हसतात आणि मग म्हणतात, "बेमुर्वतखोर लोक जे बोलतात ते उत्तर देण्याच्या लायकीचं नाही. मी का उत्तर देऊ? या देशात असा कोणताच मुद्दा किंवा समस्या अशी नाही ज्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. लोकांना समजायला हवं की त्यांनी व्यवस्थित बोलायला हवं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)