#5मोठ्याबातम्या - भुजबळ छोडो आंदोलन करा! : राज ठाकरेंचा भुजबळ समर्थकांना सल्ला

राज ठाकरे Image copyright INDRANIL MUKHERJEE
प्रतिमा मथळा राज ठाकरे

पाहूयात आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. 'भुजबळ छोडो आंदोलन करा!'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत.

भुजबळ यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जामिनासाठी अनेक वेळा अर्ज करूनदेखील भुजबळांना जामीन मिळाला नाही, असं गाऱ्हाणं भुजबळ समर्थकांनी राज ठाकरेंकडे मांडलं.

"आता भुजबळ समर्थक जोडो आंदोलन नाही, भुजबळ छोडो आंदोलन करा," असा सल्ला राज ठाकरेंनी यावेळी दिल्याचे वृत्त लोकमतनं दिलं आहे.

राज ठाकरे आणि छगन भुजबळ हे कट्टर विरोधक समजले जातात तरी देखील राज ठाकरे यांनी भुजबळांना समर्थन कसं दिलं? यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे, असं लोकमतनं म्हटलं आहे.

2. 'बेरोजगार राहण्यापेक्षा भजे विकणं काय वाईट आहे?'

बेरोजगार राहण्यापेक्षा भजे विकणं जास्त चांगलं आहे, असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत केलं.

Image copyright Getty Images

"जर एखाद्याने तुमच्या ऑफिसबाहेर भज्यांचा स्टॉल लावला तरी तो सहज 200 रुपये कमवू शकतो," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं.

त्यांच्या या विधानावर चहुबाजूंनी टीका झाली. त्याचं प्रत्युत्तर देत अमित शहा यांनी राज्यसभेत 90 मिनिटांचं भाषण दिलं. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार शहा म्हणाले, "एका तरुणाने बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणं कधीही बरं. पकोडे विकण्यात लाज कसली बाळगायची? लाज तर त्यांना वाटायला पाहिजे ज्यांनी पकोडे विकणाऱ्याची तुलना भिकाऱ्यांशी केली."

शहांनी बेरोजगारीला काँग्रेसचं पूर्वीचं सरकार जबाबदार असल्याची टीकाही यावेळी केल्याचंही इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

3. 'मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा'

धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा मुख्यमंत्र्यांवर सामनातून टीका

'लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार, "धुळ्यातल्या दौडाईमध्ये झालेल्या रावल सहकारी बँक दरोडा प्रकरणातल्या आरोपींना मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत. मग ते 'मिस्टर क्लीन' कसे?" असा सवाल माजी खासदार पटोलेंनी उपस्थित केला आहे.

सरकारने संपादित केलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून धर्मा पाटील यांनी मंत्रालयात अनेक चकरा मारल्या. पण त्यातून काही निष्पन्न न झाल्यानं त्यांनी गेल्या महिन्यात मंत्रालयातच विषप्राशन केलं. काही दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला होता.

4. 'खाप पंचायतने विवाहात हस्तक्षेप करू नये'

दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने विवाह करत असतील, तर तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं खाप पंचायतीला सुनावलं आहे.

Image copyright Getty Images

'शक्ती वाहिनी' या स्वयंसेवी संस्थेनं या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले, "कुटुंबीय असो वा समाज, त्यांना दोघा सज्ञांनांच्या विवाहाशी काही देणंघेणं नसावं. खाप पंचायत किंवा कुटुंबाने या विवाहांविषयक निर्णयांमध्ये दखल देऊ नये."

5. खादी विकण्याचा अधिकार?

'खादी' विकण्याचं अधिकृत प्रमाणपत्र नसताना 'फॅबइंडिया'ने देशभरात खादीच्या कपड्यांची विक्री केली म्हणून 525 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आम्हाला द्यावी, अशी नोटीस खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाने फॅबइंडियाला पाठवली आहे.

ग्रामोद्योग आयोग ही संस्था केंद्र सरकारच्या लघुउद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्तरीत्या काम करते.

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, "चरख्याने सूत कातलेल्या वस्त्रापासून तयार करण्यात आलेल्या कपड्यांना खादी म्हणतात. पण 'फॅबइंडिया' आपल्या फॅक्टरींमध्ये तयार करण्यात आलेल्या मालासाठीही 'खादी' असा शब्द वापरत आहे. त्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे," असं स्पष्टीकरण आयोगानं दिलं आहे.

'फॅबइंडिया'ने हे आरोप फेटाळून लावले आहेत. "ग्रामोद्योग आयोगाने केलेले आरोप निराधार आहेत. आम्ही कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)