Fake accounts: फेसबुकवर ‘एंजल प्रिया'ची फ्रेंड रिक्वेस्ट येते तेव्हा...

  • अनघा पाठक
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

आपल्या मित्राच्या अकाऊंटमध्ये एका 'सुबक ठेंगणीं'चा फोटो पाहून तुषार पाटील (नाव बदललं आहे) यांनी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली खरी, पण तिचं अकाऊंट निघालं फेसबुकच्या 20 कोटी बनावट खात्यांपैकी एक!

अशा प्रकारच्या फेक अकाऊंटना आता भारतात एक नावच पडलं आहे - 'एंजल प्रिया'! सगळ्यांत आधी या नावाच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना वेड्यात काढल्याचं लक्षात आल्यानं अशाप्रकारच्या बनवेगिरीच्या अकाऊंट्स त्याच नावानं ओळखलं जातं.

मित्रांना मूर्ख बनवण्यापासून, अशा अकाऊंटच्या जाळ्यात ओढून मुलांचं आर्थिक शोषण करण्यापर्यंत कुठल्याही गोष्टीसाठी अशा प्रकारची अकाऊंट उघडली जातात.

'एंजल प्रिया' किंवा तत्सम नावाच्या अकाऊंटसचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, हौशी तरुणांनी या विषयावर चक्क शॉर्टफिल्म बनवून युट्यूबवर टाकल्या आहेत.

फेसबुकवर एकूण 20 कोटी खाती बनावट असण्याची शक्यता आहे, असं 2017 साली आलेल्या फेसबुकच्या वार्षिक अहवालातून समोर आलं होतं.

जगभरात फेसबुकवर अनेक जणांनी खोटी अकाउंट उघडली आहेत. त्यापैकी बहुतांश अकाउंट भारत, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्ससारख्या विकसनशील देशात आहेत.

2016च्या अखेरीस फेसबुकवर 1.86 अब्ज अॅक्टिव्ह युजर्स होते. सध्या फेसबुकचे अॅक्टिव्ह युजर्स 2.13 अब्ज आहेत. त्यापैकी 10 टक्के युजर्स हे फेक (बनावट) असू शकतात, असं फेसबुकनं त्यांच्याच अहवालात म्हटलं आहे.

इंटरनेट आणि फेसबुकपूर्व काळात असं फोन कॉल्सवर व्हायचं. काही लोक आवाज बदलून तर काही तंत्राचा वापर करून पुढच्या व्यक्तीला फसवायचे. 2019 मध्ये येऊ घातलेल्या "Game Changer" या आत्मचरित्रात पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदी याने अशाच एका किश्श्याचा खुलासा केला आहे.

फोटो कॅप्शन,

शाहीद आफ्रिदीचं आत्मचरित्र बाजारात येत आहे

"90च्या दशकात आपण एका व्यकतीशी बराच वेळ फोनवर बोलायचो. तिचा आवाज खूपच मधुर होता. तेव्हा मोबाईल फोन जेमतेम आले होते. मी तिचा आवाज ऐकायला खूप पैसा खर्च केला," असं आफ्रिदीने सांगितलंय.

"अनेक महिने बोलल्यानंतर आम्ही एके दिवशी भेटायचं ठरवलं. नियोजित ठिकाणी भेटलो तेव्हा माझ्यापुढे एक पुरुष हातात काही गुलाब घेऊन उभा होता. तेव्हा मला माझ्या जीवनातला सर्वांत मोठा धक्का बसला होता," असं त्याने पुढे लिहिलंय. आपल्यासाठी हा अत्यंत लाजीरवाणा अनुभव होता, असंही ते सांगतो.

मग आलं फेसबुक आणि...

त्या अनुभवाविषयी बोलताना तुषार सांगतात, "मला ती मुलगी चांगली वाटली म्हणून मीच तिला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. हळूहळू आमचं चॅटिंग सुरू झालं. ती पुण्याला असते शिकायला, असं तिनं मला सांगितलं."

"बऱ्याचदा बोलायचो आम्ही. गप्पांचे विषय तेच... जेवण झालं का? काय करतेय? पुण्याला आलो की भेटू, वगैरेवगैरे," तुषार थोडं अवघडत सांगतात.

कधीच संशय आला नाही की हे अकाऊंट फेक असेल किंवा या अकाऊंटच्याआड कोणीतरी दुसरीच व्यक्ती तुमच्याशी चॅट करत आहे, असं त्यांना विचारल्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं.

ते म्हणाले, "सुरुवातीला थोडं वाटलं. पण जसं जसं चॅट करायला लागलो, तसा तसा माझा विश्वास वाढला. जवळपास दीड वर्षं बोलत होतो आम्ही."

अकाऊंट फेक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं ते बऱ्याच काळानं. त्याबद्द्ल ते म्हणाले, "खरंतर माझ्या मित्राचा मित्रच मला त्या फेक अकाऊंटवरून वेड्यात काढत होता. एकदा मी पुण्याला गेलो होतो तेव्हा तो मला आमच्या कॉमन मित्राच्या घरी भेटला. आधी आमची ओळख नव्हती. पण माझं नाव ऐकल्या ऐकल्या तो ओरडला आणि म्हणाला, अरे तू? मग मला समजलं की गेल्या दीड वर्षांपासून मला त्या 'सुबक ठेंगणीच्या' नावाखाली हा मुलगा मामा बनवत होता."

"खूप राग आला तेव्हा. लाजही वाटली. सगळे मित्र हसत होते. पण काही करू शकत नव्हतो मी. आता तो माझा मित्र आहे."

"पण मी एक मोठा धडा शिकलो. फेसबुकवर फक्त ओळखीच्या म्हणजे ज्यांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे, अशाच लोकांना अॅड करायचं. नशीब चांगलं म्हणून मी फक्त मित्रांच्या 'प्रँक'चा बळी ठरलो. माझी इतर कुठलीही फसवणूक झाली नाही."

हे फेक अकाऊंट कोण बनवतं?

तुषार पाटीलांना ज्यांनी मूर्ख बनवलं, त्या गोपालशी आम्ही बोललो. एका फार्मास्युटिकल कंपनीत रिसर्च असोसिएट असणाऱ्या गोपाल यांना जुन्या आठवणींमुळे हसू फुटलं.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

"तुषार काही एकटाच नव्हता, मी अनेकांना फसवलं. आणखीही अनेक होते. कितीतरी मुलांना या फेक अकाऊंट आणि चॅटिंगव्दारे मी अक्षरशः बोटांवर नाचवलं. अजूनही हसू येतं मला... कसले कसले उद्योग केलेत!" गोपाल म्हणाले.

हे सगळं का?

"माझ्या भाचीला काही मुलं फेसबुकवर त्रास देत होती, ती मुलं कोण ते पाहायला मी 'प्राजक्ता देशमुख' या नावानं फेक अकाऊंट तयार केलं. त्या मुलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवल्या. पण नंतर नंतर मलाच फ्रेण्ड रिक्वेस्ट यायला लागल्या. एकजात सगळ्या मुलांच्या. बरेचसे तर माझे मित्र होते. मग म्हटलं, चला आता यांची फिरकी घ्यायची," असं ठरवल्याचं गोपाल सांगतात.

ते म्हणतात, "बरं त्या मुलांनीही काही खातरजमा केली नाही. अकाऊंटवर प्रोफाईल फोटो सेलेना गोमेझचा होता. ही प्राजक्ता देशमुख काळी का गोरी, हे सुद्धा पाहिली नव्हती या पोरांनी आणि लागले प्रेमात पडायला. एका मुलानं तर चॅटिंग करायला लागल्यानंतर तीनच दिवसात मला I Love You म्हटलं. अशी पोरं असतील तर कोण वेड्यात नाही काढणार त्यांना?"

कुणाला संशय नाही आला?

"फक्त दोघांनी पकडलं मला. एक माझा पुतण्या आणि दुसरा माझा मित्र. बाकी कधीच नाही आणि तशी शक्यताही नव्हती. मी तयारीच एवढीच जबरदस्त करायचो. माझ्याही मैत्रिणी होत्या, त्यांच्याशी मी 'मी म्हणूनच' चॅट करायचो. त्या काय बोलतात, कसं बोलतात याचं निरीक्षण करायचो," असं गोपाल म्हणाले.

"माझी भाची होती, तिचं बोलणं बघायचं. मुलगा असूनही इतरांशी मुलगी म्हणून बोलणं चॅलेंजिंग होतंच, पण त्याहीपेक्षा जास्त चॅलेंजिंग होतं ते इतक्या जणांशी चॅट करताना कोणाला काय सांगितलं, ते लक्षात ठेवणं," हे सांगताना गोपाल खळखळून हसतात.

"मी समोरच्याचं जे कामाचं क्षेत्र असेल त्याच्या बरोबर विरुद्ध गोष्ट आणि शहर सांगायचो. मुलगी म्हणून बोलत असलो तरी होतो तर मुलगाच. त्यामुळे वागण्याबोलण्यात एक बेफिकिरी होती. मला काही कुणाच्या भावनांची पडलेली नव्हती. मी विचार करून बोलायचो नाही. खरंतर अशानं लोक लांब जायला पाहिजेत. झालं भलतंच, मुलं आपली धडाधड प्रेमात पडायची," अशा शब्दात गोपाल यांनी त्यांची 'मोडस ऑपरेंडी' बीबीसीला सांगितली.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

"माझ्या डोक्याला हा चांगला चाळा होता. मी सतत विचार करायचो, 'आता कोणाला काय उत्तर देऊ? कोणाला कसं फसवू?' पकडलं जायचं नाही, हा मुख्य हेतू. नंतर कामामुळे, जॉबमुळे चॅटिंग कमी झालं."

मग 'प्राजक्ता देशमुख'च काय झालं?

"ती आहे अजूनही फेसबुकवर," गोपाल हसतात. "आता परवाच ऑफिसच्या एका सहकाऱ्यासोबत चॅट करत होतो. तो थोडा जास्त सिरियस व्हायला लागला मग सांगून टाकलं बाबा मीच आहे तो. आता तर माझ्या ऑफिसमध्ये माझं टोपणनाव प्राजक्ता देशमुख पडलं आहे."

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

पोलिसांचं म्हणणं काय?

दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे प्रमुख अनेश रॉय यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आमच्याकडे खोट्या अकाऊंटच्या तक्रारी येतात. काही वेळेस या अकाऊंटवरून बदनामी करणारा मजकूरही प्रसिद्ध केला जातो."

"आमच्या तपासात अनेकदा असं लक्षात आलं आहे की असे अकाऊंट ओळखीतल्या माणसाकडूनच बनवले जातात," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तज्ज्ञ काय म्हणतात?

मुळात सोशल मीडियावर लोक फेक अकाऊंट का तयार करतात याचं उत्तर देताना बीबीसीचे डि़जीटल एडिटर तृषार बारोट म्हणतात, "सोशल मीडियावर लोकांना वेगवेगळ्या भूमिका जगायला आवडतं. ज्या गोष्टी ते स्वतःच्या आयुष्यात उघडपणे करू शकत नाहीत, त्या गोष्टी ते सोशल मीडियावर बनावट नावानं करतात."

"ट्रोलिंग हे याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्षात चांगले असणारे लोक सोशल मीडियावर इतरांना ट्रोल करतात. पण त्यांना स्वतःच्या प्रतिमेचीही काळजी असते."

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल तुम्ही सोशल मीडियावर कसे वागता, याकडे तुम्हाला नोकरी देणाऱ्या कंपन्या, कर्ज देणाऱ्या बँका आणि सरकारचंही बारीक लक्ष असतं. त्यामुळे खऱ्या अकाऊंटवरून काय करावं आणि काय नाही यावर मर्यादा येतात. म्हणूनच फेक अकाऊंट तयार करायचं प्रमाण वाढलं आहे," असंही बारोट यांनी सांगितलं.

(अभिजीत कांबळे यांनी दिलेल्या अधिक माहितीस. ही बातमी सर्वप्रथम 14 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)