दृष्टिकोन : अंकित आणि अखलाक हत्याकांडांवर सारखी प्रतिक्रिया का नाही?

ankit Image copyright ANKIT SAXENA/FACEBOOK

दुभंगलेल्या समाजात दु:खद हत्यांवरही उलटसुलट चर्चा होते. हत्या ही हत्याच आहे. हत्यारा हत्याराच असतो, पण तेवढं पुरेसं नसतं.

दिल्लीत अंकित सक्सेनाची हत्या झाली. या हत्येबाबत अखलाक, जुनैद, पहलू खान किंवा अफराजुल यांच्या हत्येनंतर जशी प्रतिक्रिया उमटली, तशी का उमटली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रथमदर्शनी हा प्रश्न बरोबर वाटतो. मुसलमानांना मारल्यावर आरडाओरडा होतो, पण हिंदू व्यक्ती मारली गेली की ते 'सेक्यूलर', 'डावे', 'बुध्दिजीवी' लोक का बोलत नाहीत, असा प्रश्न विचारणाऱ्यांचा रोख असतो.

थोडक्यात, पीडित व्यक्ती मुसलमान असेल तर त्याची चर्चा कमी व्हावी. तर, पीडित व्यक्ती हिंदू असेल तर अखलाक प्रकरण हे व्यक्त होण्याचं प्रमाण मानलं जावं, अशी ही मागणी आहे.

मुसलमानांवर अत्याचार झाल्यावर जी मंडळी आवाज उठवतात, ती त्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर, 'दुटप्पी', 'पक्षपाती', 'हिंदू विरोधी', 'राष्ट्रविरोधी' असा शिक्का मारून त्यांच्या टीकेतली हवा काढून टाकायची हा त्यांचा उद्देश असतो.

मुसलमानांच्या हक्कांबाबत बोलणारे सगळे धुतल्या तांदळासारखे नाहीत. पण, 'हिंदू लोकभावनेचे स्वयंभू सोशल प्रवक्ते' जास्त डोकं चालवत नाहीत.

त्यांना प्रत्येकवेळी एकसारखीच प्रतिक्रिया हवी असते. जे त्यांच्याशी सहमत असतील ते निष्पक्ष आणि जे प्रश्न विचारतात ते पक्षपाती.

दुसरीकडे, 'सोशल जिहादीं'ची स्थिती वेगळी नाही. हिंदुंच्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची लोकसंख्या कमी असल्यानं त्यांचे कारनामे तेवढे दिसत नाहीत, बहुसंख्याक दंगेखोरांचे दिसतात. पण दोघांचं वागणं आणि स्वभाव थोड्याफार फरकानं एकसारखेच आहेत.

हा एक संवेदनशील मुद्दा आहे. त्याबाबत पहिली गोष्ट ही सांगायला हवी की, माणसाची हत्या ही माणुसकीची हत्या आहे. कोणत्या एका हत्येला दुसऱ्या हत्येपेक्षा कमीजास्त गंभीर ठरवण्याचा मुद्दा नाही. पण, प्रत्येक हत्येवर एकसारखीच प्रतिक्रिया येणं का शक्य नाही, हे सांगण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अखलाकच्या हत्येवरून देशातलं वातावरण तापलं होतं.

गुन्हा करण्यामागचा हेतू, गुन्हा करण्याची पद्धत आणि त्यानंतर घडणाऱ्या घटना यामुळे प्रत्येक घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात.

ऑनर किलिंग की हेट क्राइम?

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अंकितची हत्या होण्याचं कारण म्हणजे हिंदू मुलानं एका मुसलमान मुलीवर प्रेम करण्याचं धाडस दाखवलं होतं. सगोत्र तसंच उच्च-नीच जातींदरम्यान होणाऱ्या लग्नांनंतर हत्या याच धर्तीवर होतात.

हत्या राजधानी दिल्लीत होणं, गळा चिरून हत्या करणं आणि हत्येचा आरोप मुसलमानांवर असणं आणि ज्याची हत्या झाली तो हिंदू असणं - या तीन मुद्यांनी प्रतिक्रिया कशा आणि किती उमटतील हे ठरवलं.

दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या हरियाणातल्या एखाद्या गावात सगोत्र लग्नांच्या संदर्भात जिथं मारेकरी आणि मारले गेलेले असे दोन्ही हिंदूधर्मीय असतात. तिथं अंकित हत्याकांडानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांचा सूर तसा नसतो.

अनेकदा या हत्यांना पंचायतीची सहमती असते. अंकितच्या हत्येसंदर्भात अशी कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. या हत्येसाठी मुसलमानांना एकत्रितरीत्या जबाबदार धरलं जाऊ शकत नाही.

दोन्हीकडून आरोपप्रत्यारोप

अंकितच्या हत्येनंतर लोकांनी आपला राग सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला. जीव गमावणारा हिंदूधर्मीय असल्यानं अनेकजण दु:खी आणि नाराज होते. एका निरपराध तरुण मुलाची हत्या झाल्यानं अस्वस्थ होणाऱ्यांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मीय होते.

Image copyright Ajay Kumar
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक फोटो

काही मुसलमानांनी याला 'रिव्हर्स लव जिहाद'चं नाव दिलं. 'मुसलमान मुलीच्या अब्रूचे धिंडवडे' तसंच अंकित बजरंग दलाशी संलग्न असल्याचं सांगत हत्येचं समर्थन करायचा प्रयत्न झाला.

अखलाक किंवा पहलू खान यांच्या हत्येच्या वेळी गो-तस्करी आणि फ्रीजमध्ये गोमांस ठेवण्यात आल्याच्या गोष्टींचं उदाहरण देण्यात आलं होतं. ही एकसमान माणसं आहेत. फरक एवढाच की काही हिंदू घरात जन्माली आहेत, काही मुसलमान घरी जन्मली आहेत. त्यांच्यात वैचारिक अंतर काही नाही.

कोणत्याही मुद्यावर हिंदू आणि मुस्लीम असे दोन विचारतट समोरासमोर उभे राहिले की लोक तर्क, तथ्यांश आणि न्याय यांची साथ सोडून आपल्या धर्मीयांच्या बाजूने उभे राहतात. याचवेळी बुद्धी, विवेक, न्यायप्रियता आणि मानवी संवेदना यांची सत्वपरीक्षा असते.

अंकितला समर्थन देणारे मुसलमान आणि अखलाकला पाठिंबा देणारे हिंदू या दोन्ही गटांना सोशल जिहादींच्या शिवीगाळाला सामोरें जावं लागलं.

हिंदुत्व, बुद्धिजीवी आणि समजून घ्यायच्या गोष्टी

अंकितच्या प्रकरणी सेक्युलर आणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींकडून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांमधून एका गोष्टीची उणीव जाणवली. ती म्हणजे मुसलमानांप्रति सामूहिक द्वेषभावनेचा अभाव.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा हत्यांना धार्मिक वळण मिळणं धोकादायक आहे.

हिंदूंच्या बाजूने बोलणारी मंडळी हाच मूलभूत मुद्दा अधोरेखित करतात. तुम्ही हिंदुत्वावर टीका करता मग इस्लामची समीक्षा का नाही?

अंकितची हत्या सुनियोजित, संघटित इस्लामी संघटनेचं कारस्थान नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत मुसलमान समाजाचं देशाला योगदान या विचारांतून टीका करायला हवी होती. पण तसं घडलं नाही, का? कथित इस्लामिक स्टेट संघटनेच्या कारवायांसाठी देशातल्या मुसलमानांना जबाबदार धरणं चुकीचं आहे.

हिंदुत्वावर टीका म्हणजे हिंदूंवर टीका नाही. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय वापरावर टीका म्हणजे धर्मावर टीका नव्हे. त्याचप्रमाणे इस्लामच्या आडून समाजद्रोही काम करणाऱ्यांवर टीका म्हणजे इस्लामवर टीका नव्हे. इस्लाम आणि हिंदुत्व दोन्ही विचारसरणीची माणसं मंदिर-मशिदीची ढाल करून प्रत्युत्तर देतात.

अंकित निश्चितच बळी ठरला मात्र त्याकरता 80 टक्के हिंदूंना बळी ठरवण्याचा राजकारणी प्रयत्न दुर्लक्षून चालणार नाही.

हिंदूहिताच्या गोष्टी सांगणारे सत्तेत आहेत. ते सत्तेत असतानाही हिंदू असुरक्षित असतील तर त्यांनी मुसलमानांकडे नव्हे तर स्वत: आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

माध्यमं आणि बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी

गेल्या काही वर्षांत गोरक्षा आणि लव जिहादच्या नावावर तर अनेकदा टोपी-दाढी असल्यामुळे जमावानं मुस्लिमांना मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. याचं एक सूत्र आहे. यावर सरकारचं मौन नाही तर त्यांचं याला खुलं समर्थन आहे.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा भाजप सत्तेत असतानाही हिंदू असुरक्षित आहेत?

अखलाकच्या हत्येप्रकरणी एका आरोपीच्या मृत्यूनंतर त्याचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलं होतं. या आरोपीला श्रद्धांजली वाहण्याकरता केंद्रीय मंत्री महेश शर्मा उपस्थित होते.

मीडिया, बुद्धिजीवी आणि विवेकवादी मंडळींवर जबाबदारी आहे की दुर्लक्षित वर्गाचं म्हणणं ऐकणं, ज्यांचं ऐकायला कोणी उत्सुक नाही, ज्यांचं कोणी ऐकत नाही अशा व्यक्ती आणि समाजाची बाजू जगासमोर मांडणं कर्तव्य आहे. झुंडशाही करणाऱ्यांचे री ओढणारे अशी ओळख असू नये.

हिंसेचं कारण आणि त्याचं प्रमाण लक्षात घेणं आवश्यक आहे. दोन उदाहरणांद्वारे हे समजून घेता येऊ शकतं. माल्दामध्ये मुसलमान गट आणि पोलिसांदरम्यान झालेल्या चकमकींवर टीकेची अपेक्षा बुद्धिजीवींकडून केली जाते. पण हिंसक जाट आंदोलनाच्या वेळी सूचक मौन बाळगलं जातं. दोन्ही घटनांकडे समान दृष्टिकोनाच्या निकषातून पाहिलं जाऊ शकतं का?

याच धर्तीवर दिल्लीत पार्किंगवरून झालेल्या भांडणात हिंदू डेंटिस्टची मुसलमानांनी बेदम मारहाण करून हत्या केली होती. अखलाकच्या हत्येप्रमाणे यावर टीका व्हायला हवी अशी मागणी झाली होती. हे समजून घेणं गरजेचं आहे की भांडणात जीव गमावलेल्या दुख:द आणि निंदनीय हत्येसाठी जबाबदार व्यक्तीची ओळख हिंदू अशी नव्हती. याप्रकरणी धर्म हा मुद्दा नसल्याची कबुली पोलिसांनी दिली होती.

हा सम्यक विचार करण्यासारखा सखोल विचारांचा विषय आहे. पण जमावाला ताबडतोब निर्णय, झटपट न्याय आणि आपला विजय हवा असतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)