सोशल - 'चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, तर तुम्ही भजी तळून राष्ट्रपती बना'

amit shah Image copyright Getty Images

बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणं जास्त चांगलं आहे, असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत केलं.

"एका तरुणानं बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणं कधीही बरं. पकोडे विकण्यात लाज कसली बाळगायची? लाज तर त्यांना वाटायला पाहिजे ज्यांनी पकोडे विकणाऱ्याची तुलना भिकाऱ्यांशी केली," असं शाह म्हणाले होते.

दरम्यान, अमित शाह यांच्या या विधानावरून विरोधी पक्षानं त्यांना चांगलच फटकारलं आहे.

याच विषयावर बीबीसी मराठीनं सोशल मीडियावर वाचकांना त्यांची मतं विचारली होती.

त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. त्यात काहींनी अमित शाह यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तर काहींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

"स्वत:च्या मुलाला 16% फायदा करून दिला आणि युवा वर्गाला काय तर भजी तळायला सांगतायेत. वाह रे, डिजीटल इंडिया!," असं मत संतोष पळशीकर यांनी व्यक्त केलं आहे.

तर विनायक यांनी, "अमित शाहांचं बोलणं अगदी बरोबर असून मेहनत करण्यात लाज कसली. बाहेरून येऊन माणसं लाखो रुपये कमवतात. आपल्या माणसांनी जर विकलं तर काय बिघडतं?"

सुरेंद्र नरवणे म्हणतात, "जर योग्य काम करून कोणाला फायदा होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही. फक्त डोळ्याला पट्टी लावून बसलेले विरोधक अमित शाहांवर टीका करत आहेत."

Image copyright Facebook

तर बाबा आकडे यांनी सरकारवर जोरदार टीका करत, सरकारला इशाराही दिला आहे. "जेव्हा देशातले मोठे नेते अशी वक्तव्य करतात तेव्हा सरकार नेमकं काय करत आहे हा प्रश्न पडतो." तसंच, "अजून काय पाहिजे चहा-पकोड्यांचा आनंद घ्या, नंतर निवडणुका झाल्या की बघूच," असंही म्हटलं आहे.

स्वप्नील सोनावणे यांनी, "मेहनत करून कमवण्यात काहीच कमीपणा नाही. पण देशात एवढे बेरोजगार आहेत की, सगळीकडे पकोडे तळणारेच दिसतील. असो, मुळात अशिक्षित राहून बेरोजगार राहणं ही वेगळी गोष्ट आहे. पण देशात सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढली आहे. सरकारनं त्यासाठी योग्य ते पाउल उचलायला हवे. पकोडे तळा असं सांगून सरकार थट्टा करत", असं मत मांडलं आहे.

Image copyright Facebook

"केंद्र सरकार उच्चशिक्षित डिग्रीवाल्यांसाठी भजी बेचो अभियाना अंतर्गत देशात वर्षभरात लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणार," असं म्हणत रवींद्र गावडे यांनी अमित शाह यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

Image copyright Facebook

"बरोबर आहे त्यांचं. चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, तर तुम्ही भजी तळून राष्ट्रपती बना," असं रणजीत साळवे यांनी म्हटलं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)