सयामी जुळ्यांना आता आम्ही डॉक्टर बनवू - झाल्टे दांपत्य

  • राहुल रणसुभे
  • बीबीसी मराठी
प्रिन्स आणि लवसोबत झाल्टे दाम्पत्य.

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe

फोटो कॅप्शन,

प्रिन्स आणि लवसोबत त्यांचे आईवडील

मुंबईतल्या वाडिया रुग्णालयात सोमवारी झाल्टे दांपत्य लव्ह आणि प्रिन्स या जुळ्या मुलांसमवेत आले. त्यांच्या कडेवरची ही दोन्ही मुलं सारखं इकडे-तिकडे पाहात होती.

निरागस चेहऱ्यांच्या या मुलांनी रुग्णालयातल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. झाल्टे दांपत्याच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगत होता. पण, हा आनंद त्यांना सहजासहजी मिळालेला नाही.

चार वर्षांपूर्वी सागर झाल्टे आणि शीतल यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमामध्ये झालं.

दोघांचीही जात वेगवेगळी. मात्र तरीही त्यांनी घरच्यांच्या संमतीनं लग्न केलं. लग्नानंतर जसं प्रत्येक जोडपं अपत्यसुखाची स्वप्न पाहतात, तशीच त्यांनीही पाहिली. जवळपास अडीच तीन वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात तो क्षण आला.

याविषयी सागर सांगतात, "ज्यावेळेस आम्ही आई-बाबा होणार आहोत असं समजलं तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही त्यावेळी गुजरातमध्ये माझ्या सासुरवाडीत होतो. मुंबईत परतल्यावर आम्ही विक्रोळीच्या एका डॉक्टरकडे नियमित तपासणी करत होतो. त्यांच्याकडे आम्ही साडेसात महिने उपचार घेतले. पाचव्या महिन्यात करण्यात येणाऱ्या सर्व टेस्टस केल्या. सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट्स एकदम नॉर्मल असल्याचं सांगितलं."

"मुलीची पहिलं बाळंतपण आईच्या घरी होतं. त्याप्रमाणे मी शीतलला घेऊन गुजरातला सासुरवाडीला गेलो. तेव्हा तिथल्या डॉक्टरनं आम्हाला रिपोर्ट वाचून सांगितलं की, तुमचं मूल हे सयामी जुळं आहे. हे ऐकून आम्हाला मोठ्ठा धक्काच बसला. आतापर्यंत सर्व काही छान होतं. सर्व रिपोर्ट ठीक होते. तेव्हा हे एकदमच असं कसं झालं?" सागर पुढे सांगतात.

डॉक्टरांच्या या एका वाक्यानं सागर आणि शीतल यांच्या आयुष्यात वादळच आलं. आपली मुलं चिटकलेली आहेत असं कळल्यानंतर शीतल यांना मोठा धक्काच बसला.

फोटो स्रोत, Wadia Hospital

फोटो कॅप्शन,

सयामी जुळे प्रिन्स आणि लव

त्यावेळची परिस्थितीबद्दल सांगताना शीतल म्हणाल्या की, "तेव्हा मला खूप टेंशन आलं होतं. आतापर्यंत मी हे टीव्हीवर, डिस्कव्हरी चॅनलवर पाहात होते. मात्र आता हे माझ्यासोबत घडेल असं स्वप्नातसुध्दा वाटलं नव्हतं. पण काहीही असो परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं होतं."

2016 मध्ये सयामी जुळ्यांचा जन्म

झाल्टे दाम्पत्यानं लागलीच मुंबईतल्या त्यांच्या डॉक्टरांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला.

"त्या डॉक्टरांनी आमची माफी मागितली. मात्र त्यांच्या या एका चुकीमुळे आम्हाला काय यातना भोगाव्या लागणार होत्या याची त्यांना कल्पना नव्हती," असं सागर म्हणतात.

"या काळात मला माझ्या पत्नीनं सर्वात जास्त धीर दिला. परिस्थितीला समोरं जायचं आम्ही ठरवलं. आपलीच मुलं आहेत. त्यांच्यासाठी वाट्टेल ते करू. आमच्या पाठीशी कोणीही नव्हतं. आम्ही दोघंच इकडेतिकडे फिरत होतो. वाडिया हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली तेव्हासुध्दा आम्ही दोघंच होतो. आम्हाला कोणाचीही साथ नव्हती. त्यामुळे जे काही करायचं ते दोघांनीच करायचं असं आम्ही ठरवलं" झाल्टे दाम्पत्य त्यांचया भावना व्यक्त करतात.

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe

फोटो कॅप्शन,

प्रिन्स

"आम्ही वाडिया हॉस्पिटलमध्ये आलो. तिथल्या डॉक्टरांना भेटलो. त्यांनी आम्हाला अशा प्रकराच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रिध्दी-सिध्दीला भेटवलं. तेव्हा आम्हाला थोडा धीर आला. जोडलेल्या मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांना यशस्वीरित्या वेगळं केलं जाऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही सर्व काही डॉक्टरांवर सोडलं," शीतल सांगतात.

वाडिया हॉस्पिटलमध्येच 2016मध्ये शीतल झाल्टे यांनी सयामी जुळ्यांना जन्म दिला. दीड वर्षांनंतर या मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. हे दीड वर्ष या दांपत्यानं अगदी रात्रीचा दिवस केला

पाहा झाल्टे दांपत्याबरोबरील फेसबुक LIVE

याविषयी सागर सागंतात,"आम्ही हे दीड वर्ष अक्षरशः रडत काढलं. माझी पत्नी गृहिणी आहे. माझ्याकडेही चांगली नोकरी नाही. मी एका चायनीजच्या गाडीवर काम करतो. दिवसाला 200 रुपये कमावतो. त्यामुळे हा सर्व खर्च कसा करायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता. मुलं सयामी असल्यामुळे दोघांपैकी एकाला झोप आली तर दुसऱ्याला खेळावसं वाटायचं. तेव्हा त्याच्याशी खेळावं लागायचं. अन्यथा त्यालाही बळजबरी झोपावावं लागायचं. एक खेळायला लागला तर दुसरा रडायला लागायचा, असं सारखं काही ना काही होत असायचं. अशा परिस्थितीत आम्ही दीड वर्ष काढली."

तर त्या दीड वर्षाबद्दल सांगताना शीतल म्हणतात, "मला देवानंच तेवढी शक्ती दिली होती की, मी या दोघांना चांगल्याप्रकारे संभाळू शकले. मला यांचा मुळीच त्रास झाला नाही."

20 डॉक्टरांनी केली 12 तास शस्त्रक्रिया

त्यानंतर 12 डिसेंबर 2017 रोजी या मुलांवर 20 डॉक्टरांनी मिळून सलग 12 तास शस्त्रक्रिया केली.

या शस्त्रक्रियेदरम्यान काय परिस्थिती होती याबद्दल सांगताना शीतल म्हणाल्या, "ते बारा तास खूप त्रासदायक होते. दोन डॉक्टर असे होते जे आम्हाला आतली परिस्थिती बाहेर येऊन सांगायचे, त्यामुळे आम्हाला थोडा धीर यायचा. दुपारी साडेबारा दरम्यान प्रिन्स आणि लव वेगळे झाल्याची बातमी डॉक्टरांनी दिली. तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला."

फोटो स्रोत, BBC/Rahul Ransubhe

फोटो कॅप्शन,

लव

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

शस्त्रक्रियेनंतर सहा आठवड्यांनी या सयामी जुळ्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

"आज दीड महिन्यानंतर आमची दोन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे. हे सर्व काही या डॉक्टरांमुळेच शक्य होऊ शकलं. आज यांना वेगवेगळे घरी घेऊन जाताना आम्हाला आनंदाश्रू अनावर होत आहेत. आम्ही आता या दोघांना शाळेत घालणार. त्यासोबतच या दोघांपैकी एकाला आम्हाला पेडियाट्रीक सर्जन बनवायचं आहे. आणि ज्या वाडिया रुग्णालयामुळे त्यांना जीवनदान मिळालं आहे तिथंच त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य घालवावं," अशी इच्छा झाल्टे दांपत्य व्यक्त करतं.

"लव्ह आणि प्रिन्स यांचं यकृत, आतडे आणि मूत्राशय ही तीन इंद्रियं जोडली गेलेली होती. ती शस्त्रक्रिया करून वेगळी करण्यात रुग्णालयाला यश आलं आहे. ही दोन्ही बाळं आता आधार घेऊन उभं राहतात. लवकरच चालायलासुद्धा लागतील. प्रिन्स आणि लव यांच्यावर एका वर्षानंतर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार आहे. यानंतर हे दोघे शाळेत जाण्यासाठी तयार होतील," अशी माहिती वाडिया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)