#5 मोठ्या बातम्या- मराठवाड्यात एकाच दिवशी 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

noose Image copyright allanswart

पाहूयात आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. मराठवाड्यात एकाच दिवशी 8 शेतकऱ्यांच्या आत्मत्या

मराठवाड्यातील आठ शेतकऱ्यांनी मंगळवारी आत्महत्या केल्या. यामध्ये औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील प्रत्येकी तीन तर बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.

'दिव्य मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. कर्जबाजारीपण आणि नापिकीला कंटाळून पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवले. तर अन्य तिघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथील राम सोपान सोनावणे यांच्यासह कन्नड तालुक्यातील आडगाव येथील अनिल केरुजी सोनवणे यांनी आत्महत्या केली. केज तालुक्यातील होळ येथील आबासाहेब गोविंदराव शिंदे यांनी कीटकनाशक घेऊन जीवन संपवलं. दुसऱ्या घटनेत परळी तालुक्यातील सिरसाळा एकनाथ गंगाराम चव्हाण यांनी विष घेऊन जीवनयात्रा संपवली. जाफराबाद तालुक्यातील साहेबराव एकनाथ मिचके यांनी पोलीस ठाण्यातच विष घेतलं. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बुटखेडा तांड्यावरील आसाराम पवार यांनी विहिरीत उडी घेतली. बाबर पोखरी येथील दिलीप दत्तू पवार या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेतला.

2. विरोधकांच्या बैठकीत भाजपचे मंत्री

भाजप सरकारच्या विरोधात रणनीती निश्चित करणे आणि आघाडीबाबत प्राथमिक चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत भाजपचे मंत्री गिरीश बापट अवतरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

'लोकसत्ता'ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू होती. तेवढ्यात अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीश बापट तिथे अवतरले.

दरम्यान मुलाच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण द्याचं होतं. सर्व विरोधी नेते एकत्र उपस्थित असल्यानं आपण बैठकीच्या आलो. त्याचा वेगळा अर्थ काढू नका असं गिरीश बापट यांनी सांगितलं.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा सूर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत होता. नागपूरमधील हल्लाबोल आंदोलन तसंच मुंबईतील संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानण्यात येते.

3. राफेल करार हा घोटाळा-राहुल गांधी

राफेल विमान खरेदीचं डील स्वत: पंतप्रधानांनी बदललं. राफेल विमानांसाठी फ्रान्ससोबतचा करार हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधी यांनी राफेल करार हा घोटाळा असल्याचं म्हटलं आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'नं यासंदर्भात बातमी दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारनं राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास नकार दिला. या नकारानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा हल्ला चढवला. राफेलची किंमत संसदेला सांगणे, हा काय राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे का? असा सवाल राहुल यांनी केला.

समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अगरवाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल खरेदी व्यवहाराचा तपशील उघड करण्यास नकार दिला.

2008मध्ये झालेल्या कराराच्या कलमानुसार व्यवहाराचा तपशील गोपनीय ठेवावा लागणार आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं.

4. डॉक्टरांच्या चुकीमुळे 40 जणांना एचआयव्हीचा धोका

उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटनेत उनाव जिल्ह्यातील भोंदू डॉक्टरने एकच सुई सगळ्यांना वापरल्याने किमान चाळीसजणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या का वाढत आहे, याची चौकशी आरोग्य खात्याने केली असता त्यात ही बाब उघड झाली. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

उनावच्या बांगरमाव भागात एचआयव्हीचे 40 रुग्ण सापडले. नोव्हेंबर 2017 आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ही लागण झाली का याचा शोध घेण्यात येत आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

5. इचलकरंजीत कुमारी मातांच्या बाळांची विक्री

इचलकरंजीत कुमारी आणि अल्पवयीन मातांची बेकायदेशीर प्रसूती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इचलकरंजीतील जवाहरनगरमध्ये असलेल्या डॉ. अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर केंद्रीय पथकाने धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला.

'एबीपी माझा'ने यासंदर्भातील बातमी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये देशातील विविध भागातील मुलींची लाखो रुपयांना विक्री झाल्याचं स्पष्ट झाल्याने शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. अरुण पाटील यांना अटक केली आहे. हॉस्पिटलमध्ये कुमारी माता, अल्पवयीन माता अशा अडचणीत आलेल्या महिलांची प्रसूती करण्याचा उद्योग सुरू होता.

प्रसूती झाल्यानंतर त्या मातेला भरघोस पैसा द्यायचं आणि त्या मुलाचं संगोपन करायचं. वेळ मिळताच त्या मुलाची राज्याबाहेर विक्री करायची असं हे रॅकेट होतं.

प्रकरणाची माहिती केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर कोल्हापूर जिल्हा महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि बालकल्याण समिती सदस्यांनी हॉस्पिटलवर धाड टाकली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)