#5मोठ्याबातम्या : राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

प्रातिनिधिक छायाचित्र Image copyright MANJUNATH KIRAN/GETTY IMAGES

पाहूयात आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

केंद्र सरकारनं लागू केलेल्या दिनांकापासून राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल.

'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्षें करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितलं.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. सातव्या वेतन आयोगाबाबत बक्षी समितीचं काम सुरू असून आजच समितीने पोर्टल सुरू केले आहे.

गुणवत्तापूर्ण कामासाठी वेतन आयोग महत्त्वाचा आहे. वेतन त्रुटी राहू नये याची दक्षता घ्यावी, असे सांगतानाच वेतन आयोगासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

2. मला मुख्यमंत्रीपद न देण्याचा राजकीय कट होता- सुशीलकुमार शिंदे

''2004 साली माझ्या नेतृत्वात निवडणुका जिंकूनही मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. मला राज्यपाल करण्यात आलं. तो एक नियोजित राजकीय कट होता,'' असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

Image copyright STR/GETTY IMAGES

'एबीपी माझा'नं दिलेल्या वृत्तानुसार, सोलापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. भूतकाळातील, वर्तमानकाळातील आणि भविष्यकाळातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी मार्मिक भाष्य केलं.

''2004 साली माझ्या नेतृत्वात निवडणुका जिंकूनही मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. हायकमांडला तो कट असल्याचं जेव्हा कळलं, तेव्हा एका रात्रीत केंद्रीय उर्जामंत्री करून सक्रीय राजकारणात आणलं. दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि माझ्यात यामुळे कसलेच वाद झाले नाहीत,'' असंही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं.

''राजकारणातून संपवण्यासाठी घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न झाला. पण अडकलो नाही. कोणत्याही वादविवादापासून नेहमी लांब राहतो. आदर्श प्रकरणातूनही सुटलो,'' असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

3. मंत्रालय की आत्महत्यालय - राज ठाकरे

भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचं 'आत्महत्यालय' बनलं आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

Image copyright INDRANIL MUKHERJEE/GETTYIMAGES

'लोकसत्ता'ने याबाबत वृत्त दिलं आहे. आज शेतकरी आपल्या शेतात आत्महत्या करत आहेत आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्येसाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजप सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचं प्रकरण काँग्रेसच्या काळातलं असल्याचं सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. गेले तीन वर्षे भाजप सत्तेत आहे. मग धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यायला भाजप सरकारमधील मंत्र्यांना कोणी रोखलं होतं, असा सवाल राज यांनी केला.

4. पुण्यातून अमेरिकेच्या 11000 नागरिकांना फसवले

करविषयक नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगत अमेरिकेच्या 11000 नागरिकांना फसवणाऱ्या पुण्यातील कोरेगाव पार्कस्थित बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली. तीनजणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आणखी चार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसेस आणि फेडरल ट्रेड कमिशन यांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे आणि सायबर क्राइम सेल विभागाला साहाय्य करणाची ग्वाही दिली आहे. अमेरिकेच्या नागरिकांना कर उल्लंघनाचा धाक दाखवून प्रत्येकी 500 ते 1,000 डॉलर्स उकळण्यात आले. अमेरिकेच्या नागरिकांकडून नाव, पत्ता, इमेल आयडी अशी माहिती घेण्यात आली.

देशात अन्य दोन ठिकाणीही अशा स्वरुपाची कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली आहे.

5. झुलनचा सर्वाधिक बळींचा विक्रम

भारताची वेगवान महिला गोलदांज झुलन गोस्वामी ही महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनशे बळी मिळवणारी पहिली गोलंदाज ठरली आहे.

Image copyright ADRIAN DENNIS/GETTY IMAGES

'लोकसत्ता'च्या वृत्तानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झुलनने या विश्वविक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दोनशे बळी मिळवण्याचा मानही भारताच्या नावावर आहे. पुरूषांच्या क्रिकेटमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी हा विक्रम केला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामवीर लाऊरा वोल्हारर्टला बाद करत झुलनने दोनशे बळींचा टप्पा पूर्ण केला.

मे 2017मध्ये झुलनने महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा विश्वविक्रम पूर्ण केला होता. झुलनला 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)