धर्मा पाटील यांच्यानंतर आता मंत्रालय परिसरात आणखी एक मृत्यू

मंत्रालय मृत्यू

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच हर्षल रावते हा 44 वर्षीय युवक मंत्रालयाच्या परिसरात मृत्यू पावला आहे. मंत्रालय इमारतीखाली जखमी अवस्थेत सापडल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून हर्षलनं उडी मारल्याचं समोर येत आहे, पण याला अद्याप पोलिसांचा दुजोरा मिळू शकलेला नाही.

हर्षल मुंबईतल्या चेंबूर येथे वास्तव्यास असल्याचं त्याच्या ओळखपत्रांवरून लक्षात येतं. तो पैठणच्या कारागृहात शिक्षा भोगत असल्याचंही ओळखपत्रावरून समजलं. दरम्यान हर्षल पडला की, त्यानं उडी मारली याविषयी निश्चित काहीही कळू शकलं नाही.

हर्षल रावते मेव्हणीच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत होता. त्याला कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या खुल्या कारागृहात 4 वर्षांपासून शिक्षा भोगत होता आणि सध्या पॅरोलवर होता, अशी माहिती औरंगाबादचे वार्ताहर अमेय पाठक यांनी दिली. पॅरोल संपून कारागृहात हजर व्हायचा त्याचा दिवस होता, अशीही माहिती मिळाल्याचं पाठक यांनी सांगितलं.

दरम्यान या घटनेचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. घटनेनंतर धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील आदी नेते मंत्रालयात पोहोचले.

जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं प्रकरण अद्याप ताजं आहे.

भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचं 'आत्महत्यालय' बनलं आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी केली होती.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)