ऑपरेशन कॅक्टस- मालदीवमध्ये का गेलं भारतीय सैन्य?

  • रेहान फजल
  • बीबीसी हिंदी प्रतिनिधी

3 नोव्हेंबर 1988 रोजी मालदीवचे राष्ट्रपती मौमून अब्दूल गयूम भारत दौऱ्यावर येणार होते. त्यांना आणण्यासाठी एक भारतीय विमान दिल्लीहून मालदीवची राजधानी मालेला उडलं होतं. हे विमान अर्ध्या रस्त्यात होतं तेव्हाच राजीव गांधींना एका निवडणुकीच्या कामासाठी दिल्लीच्या बाहेर जावं लागलं होतं.

राजीव गांधी यांनी गयूम यांच्याशी बातचीत केली आणि ते नंतर पुन्हा कधीतरी भारतात येतील असं ठरवलं होतं. पण गयूम यांच्याविरुद्ध बंडखोरीची योजना तयार करणारे मालदीवचे व्यापारी अब्दुल्ला लुथूफी आणि त्यांचे सहकारी सिक्का अहमद इस्माईल मानिक यांनी निर्णय घेतला की बंडखोरी स्थगित केली जाणार नाही.

बंडखोरीची सुरुवात गयूम मालेमध्ये नसतील तेव्हा करावी अशी त्यांची योजना होती. त्यांनी श्रीलंकेतली कट्टरवादी संघटना PLOT (People's liberation of Tamil elam) च्या भाडोत्री लढवय्यांना पर्यटकांच्या वेशात स्पीड बोट्सच्या सहाय्यानं आधीच मालेमध्ये आणलं होतं.

त्यावेळी ए. के. बॅनर्जी मालदीवचे भारतातील उच्चायुक्त होते. ते गयूम यांच्या नियोजित भारत दौऱ्यासाठी आधीच भारतात आले होते.

भारतातून सैन्य पाठवण्याची अपील

ए. के. बॅनर्जी सांगतात, "मी दिल्लीत माझ्या घरी छान पांघरूण घेऊन झोपलो होतो, तेव्हाच माझा फोन वाजला."

त्यांनी पुढे सांगितलं, "मालेमध्ये माझ्या सचिवांनी सांगितलं की तिथं बंडखोरी झाली आहे आणि रस्त्यावर गोळीबार करणारे लोक इकडेतिकडे फिरत आहेत. राष्ट्रपती गयूम एका सुरक्षित ठिकाणी लपलेत आणि त्यांना वाचवण्यासाठी आपलं सैन्य तातडीनं पाठवावं."

फोटो कॅप्शन,

मौमून अब्दूल गयूम

तिकडे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम बघितलेल्या कुलदीप सहदेव यांनासुद्धा भारतीय वकिलातीतून फोन आला. त्यांनी लगेच याची सूचना पंतप्रधान कार्यालयाचे संयुक्त सचिव रोनेन सेन यांना दिली. त्यांनी साऊथ ब्लॉकमध्ये ऑपरेशन रूममध्ये होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीसाठी बोलावून घेतलं. कलकत्त्याहून येताच पंतप्रधान राजीव गांधी या बैठकीत भाग घेणार होते.

NSG पाठवण्याची शिफारस

इंडियन एक्स्प्रेसचे सहसंपादक सुशांत सिंह आपल्या 'Mission overseas - daring operations by the Indian military' या पुस्तकात लिहितात, "राजीव गांधी हे रोनेन सेन आणि कुलदीप सहदेव यांच्याबरोबर मिलिट्री ऑपरेशन रुममध्ये आले. गृह राज्यमंत्री पी.चिदंबरम यांनी तिथं नॅशनल सिक्युरिटी गार्डस (NSG) पाठवण्याची शिफारस केली. पण लष्करानं त्याचा स्वीकार केला नाही."

त्यांनी पुढे सांगितलं, "रॉ (RAW) चे प्रमुख आनंद स्वरूप वर्मा यांनी मालेच्या हुलहुले विमानतळावर शेकडो बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. रोनेन सेन यांनी वर्मा यांना शांत राहण्यास सांगितलं कारण मागेत पुढे काय घडत होतं यांची ताजी माहिती त्यांच्याकडे होती."

फोन क्रेडिलवर का ठेवला नव्हता?

सुशांत सिंह पुढे लिहितात, "मालदीवचे परराष्ट्र सचिव जकी यांनी 7 RCR ला थेट फोन केला होता. सेन यांनी हा फोन उचलला होता. जकी यांनी सांगितलं की, त्यांच्या घरासमोरच्या टेलिफोन एक्सचेंजचा बंडखोरांनी ताबा घेतला आहे. सेन यांनी सल्ला दिला की त्यांनी फोन ठेवू नये. कारण त्यांनी फोन ठेवताच टेलिफोन एक्सचेंजच्या स्वीच बोर्डचा दिवा बंद होईल आणि बंडखोरांना कळेल की ते कोणाशीतरी फोनवर बोलत होते. हा फोन पुढच्या 18 तासांत पूर्ण अभियान संपेपर्यंत क्रेडिलवर ठेवला नाही."

आग्र्याच्या पॅरा ब्रिगेडच्या सैनिकांना मालेला पॅराशूटच्या मदतीनं उतरवलं जाईल अशी योजना होती. पण या योजनेत एक समस्या होती. त्यांना एक ड्रॉपिंग झोनची गरज होती जेणेकरून त्यांचे पॅराशूट जमिनीवर उतरतील ना की पाण्यावर.

ब्रिगेडिअरला मालदीवचं नाव सुद्धा माहीत नव्हतं

त्यांना सुरक्षित उतरवण्यासाठी 12 फुटबॉल मैदानांएवढ्या परिसराची गरज होती. पण हे मालेमध्ये शक्य नव्हतं. सैनिकांनी पॅराशूट समुद्रात उतरवलं असतं तर पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना पॅराशूट उघडणं अशक्य झालं असतं आणि समुद्रात ते कुठेतरी वाहून जाण्याची शक्यता होती.

त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय झाला. बैठकीत उपस्थित असलेल्या लोकांना हुलहुले विमानतळाची लांबी किती आहे हे सुद्धा ठाऊक नव्हतं. ते विमानतळ एका भारतीय कंपनीनं तयार केलं होतं हे उल्लेखनीय.

मालेपर्यंत उडणाऱ्या विमानांच्या वैमानिकांशी संपर्क साधण्याचा आदेश राजीव गांधी यांनी रोनेन सेन यांना दिला.

फोटो कॅप्शन,

माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद

बैठकीनंतर उपलष्कर प्रमुख ले. जनरल रोडरिग्स यांनी ब्रिगेडिअर फारुक बुल बलसारा यांना फोन केला आणि पॅराट्रुप्स तयार ठेवण्याचा आदेश दिला.

बलसारा यांनी याआधी मालदीवचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं. त्यांच्या एका इंटेलिजन्स ऑफिसरनं लायब्ररीतून एक अटलास आणला. तेव्हा त्यांना कळलं की मालदीव हा 1200 बेटांचा समूह आहे आणि भारताच्या दक्षिण किनाऱ्यापासून 700 किमी अग्नेयला वसलं आहे.

भारतीय लष्कराची तयारी नव्हती

बलसारा यांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांना आगऱ्याच्या पर्यटक केंद्रात जाऊन मालदीवची होती नव्हती तितकी सगळी माहिती गोळा करायला सांगितलं.

त्याचदरम्यान ब्रिगेडिअर व्ही. पी. मलिक ( जे नंतर लष्करप्रमुख झाले) मालदीवमधले भारताचे उच्चायुक्त ए. के. बॅनर्जी यांना घेऊन लष्कराचं एक विमान आग्र्याला पोहोचलं.

फोटो कॅप्शन,

हुलहुले विमानतळ

ए. के. बॅनर्जी सांगतात, "जेव्हा मी ऑपरेशन रुममध्ये पोहोचलो तेव्हा टेबलावर हुलहुले विमानतळाच्या ऐवजी गान विमानतळाचा नकाशा पसरला होता. ते मालेहून 300 किमी दूर होतं. मी ते पाहताच हा नकाशा चुकीचा आहे असं ओरडलो. इतक्या मोठ्या अभियानासाठी भारतीय लष्कराची तयारी नव्हती हे दिसतच होतं."

सुशांत सिंह सांगतात, "बलसारा यांची योजना होती की हुलहुले विमानतळावर बंडखोरांनी कब्जा मिळवला नसेल तर तिथं विमानं उतरवू. जर असं नाही झालं तर पॅराशूटनं आपल्या सैनिकांना विमानतळावर कब्जा मिळवण्यासाठी खाली उतरवू. तेव्हा ब्रिगेडिअर मलिक यांनी आपण उच्चायुक्त बॅनर्जी यांना या मिशनवर का घेऊन जाऊ नये अशी विचारणा केली. कारण त्यांना मालेची पूर्ण माहिती आहे जी कामाला येईल."

बॅनर्जी यांनी मालदीवला जाण्यासाठी दोन अटी ठेवल्या

बॅनर्जी यांना जेव्हा हे सांगण्यात आलं तेव्हा ते जाण्यासाठी तयार झाले नाही. बॅनर्जी सांगतात, "मी सोबत जाण्यासाठी दोन अटी ठेवल्या. पहिली अशी की परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल. दुसरी अशी की मला एक सेफ्टी रेझर (दाढीचं ब्लेड) पुरवावं. कारण मी माझ्या दिवसाची सुरुवात दाढी केल्याशिवाय होत नाही. पहिली अट पूर्ण झाली. पण दुसऱ्या अटीची पूर्तता करण्यासाठी भररात्री त्यांनी कॅन्टीन उघडलं आणि त्यातून एक शेविंग कीट, टूथ ब्रश आणि टॉवेल काढला."

परराष्ट्र मंत्रालयाचा एक अधिकारी अशा सैनिकी अभियानासाठी भारतीय सैन्याबरोबर भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती. ज्या क्षणी छत्रीधारी सैनिकांनी भरलेल्या विमानानं आगऱ्याच्या खेरिया रनवेववरून उड्डाण सुरू केलं तेव्हा त्यात बसलेल्या 6 पॅरा सैनिकांनी 'छत्री माता की जय' अशा घोषणा दिल्या.

विमान हवेत झेपावलं तितक्यात ब्रिगेडिअर बलसारा झोपायला गेले. कोणत्याही मोठ्या अभियानाच्या सुरुवातीला चांगली झोप घेणं गरजेचं आहे, असं त्यांनी आपल्या पॅरा कमांडोच्या सुरुवातीच्या दिवसात शिकले होते.

बीबीसीनं दिली होती ब्रेकिंग

त्याच विमानात असलेले विनोद भाटिया सांगतात, "जसं आम्ही भारताच्या सीमेच्या बाहेर निघालो तितक्यात ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानानं आम्हाला पाहिलं. मग आम्हाला कुठे जात आहे असं त्यांनी विचारलं. आम्ही सुद्धा लपवलं नाही. म्हणूनच बीबीसीनं त्यांच्या सात वाजताच्या बुलेटिनमध्ये सांगितलं की, मालदीवच्या राष्ट्रपतींना वाचवण्यासाठी भारतानं सैन्य कारवाई सुरू केली आहे.

जेव्हा भारताचं विमान तिथं उतरलं तेव्हा विमानतळावर गुडूप अंधार होता. ज्या क्षणी IL76 हे विमान थांबलं तेव्हा काही मिनिटांतच 150 भारतीय सैनिक आणि अनेक जीप्स बाहेर आल्या. थोड्यावेळातच दुसरं विमान उतरलं आणि घाईघाईतच ATC, जेट्टी आणि रनवेच्या उत्तर आणि दक्षिण भागांवर नियंत्रण मिळवलं.

ATC मधूनच ब्रिगेडिअर बलसारा यांनी राष्ट्रपती गयूम यांच्याशी त्यांच्या गुप्त ठिकाणी रेडिओवरून संपर्क प्रस्थापित केला.

'मिस्टर प्रेसिडेंट, आम्ही पोहोचलो आहोत'

सुशांत सिंह सांगतात, "गयूम यांनी बलसारांना यांना सांगितलं की, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तिथं पोहोचायला हवं. कारण बंडखोरांनी त्यांच्या सेफ हाऊसला घेरलं आहे आणि जवळच्या घरातून फायरिंगचा आवाज ऐकू येत आहे. बलसारा म्हणाले की मिस्टर प्रेसिडेंट आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि तुम्हाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू."

जेव्हा भारतीय सैनिक सेफ हाऊसजवळ पोहोचले, तेव्हा तिथं प्रचंड गोळीबार सुरू होता. बलसारा यांनी राष्ट्रपती गयूम यांना आपल्या घराबाहेर गार्डस तैनात करण्यासाठी सांगितलं. त्यामुळे त्यांच्यापर्यंत थेट पोहोचण्यास मदत होईल. पण मालदीवच्या नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसच्या लेफ्टनंटपर्यंत गयूम यांचा संदेश पोहोचलाच नाही.

गयूम यांच्या संरक्षण दलांनं भारतीय सैनिकांना पुढे जाण्यापासून रोखलं. बलसारा गोळीबाराचा आदेश देणार होते तेवढ्यात भारतीय सैन्याला पुढे जाण्यासाठी जागा देण्यात आली. जेव्हा भारतीय सैनिक राष्ट्रपती गयूम यांच्याकडे पोहोचले तेव्हा पहाटेचे 2 वाजून 10 मिनिटं झाली होती. त्यांनी राष्ट्रपतींना आग्रह केला की त्यांच्याबरोबर हुलहुले विमानतळावर चलावं. पण त्यांनी तिथं जाण्यास नकार दिला. त्यांनी नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसच्या मुख्यालयात जाण्याचा आग्रह धरला.

राजीव गांधी यांच्याशी 4 वाजता बातचीत

3 वाजून 15 मिनिटांनी जेव्हा बलसारा आणि ए. के. बॅनर्जी मुख्यालयात पोहोचले तेव्हा भवनाच्या चारी बाजुला शवांचा खच पडला होता. भवनावर शेकडो गोळ्यांच्या खुणा होत्या. बंडखोरांनी नियंत्रण मिळवण्याचे केलेले प्रयत्न जागोजागी दिसत होते.

फोटो कॅप्शन,

राजीव गांधी

बॅनर्जी सांगतात,"गयूम अतिशय हादरलेले दिसत होते, पण तरी ते स्थिर होते. आम्हाला पाहून ते खूश झाले. त्यांनी आमचे आभार मानले आणि राजीव गांधी यांच्याशी बातचीत करायची आहे असं ते म्हणाले."

ठिक चार वाजता सॅटेलाईट फोननं राजीव गांधी यांच्याशी संपर्क साधला.

राजीव गांधी तेव्हा आपल्या कॉम्प्युटरवर बसले होते आणि एका हातानं टाईप करत होते. असं ते नेहमीच करायचे. राष्ट्रपती गयूम यांच्याशी बातचीत करताना राजीव झोपायला गेले.

जेव्हा रोनेन सेन राजीव यांच्या ऑफिसमधून निघाले तेव्हा त्यांनी संरक्षण मंत्र्यांचं माझ्यातर्फे अभिनंदन करा असं सांगितलं. पण हसत म्हणाले, "जाऊ द्या ते झोपले असतील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)