#5मोठ्याबातम्या : मंत्रालयातील आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची मानसोपचार तज्ज्ञांना भीती

हर्षल रावतेचे ओळखपत्र

लोकसत्तामधल्या वृत्तानुसार, शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर हर्षल रावते या गुन्हेगारानंही मंत्रालयात आत्महत्या केल्यानंतर मंत्रालयातलं आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्तामधल्या या वृत्तासह यासह आजच्या इतर पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे.

१. 'मंत्रालयातील आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती'

प्रथम आत्महत्येचा विचार मनात घोळत असतो, त्यानंतर आत्महत्या कशा प्रकारे करायची यावर विचार सुरू होतो. या टप्प्यावरूनही योग्य मानसिक मदत केल्यास आत्महत्येचा प्रसंग टाळता येऊ शकतो, परंतु आता कोणताच मार्ग शिल्लक नाही, अशी स्थिती येते आणि एका नेमक्या क्षणी व्यक्ती आत्महत्या करते.

मंत्रालयात हर्षल रावेत या तरुणानं उडी मारून आत्महत्या केली. गेल्या महिन्यात ८० वर्षांच्या धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर या आत्महत्येचे जे उदात्तीकरण झाले.

त्यांच्या अंत्ययात्रेला मंत्र्यांपासून वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी लावलेली उपस्थिती यातून आत्महत्येच्या अंतिम निर्णयाच्या स्थितीला आलेल्यांची पावले आपोआप मंत्रालयाकडे वळू लागल्याचे दिसते.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE / Getty Images

यालाच इंग्रजीत 'कॉपी कॅट' म्हणतात, असं केईएमच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितलं. असंच मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव आणि डॉ. मनोज भाटवडेकर यांनीही व्यक्त केलं, असं लोकसत्तामधल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

2. सिंचन घोटाळा : अजित पवारांची भूमिका स्पष्ट करा - उच्च न्यायालय

लोकसत्ता मधल्याच आणखी एका वृत्तानुसार, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या चार सिंचन प्रकल्पांमधल्या गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री अजित पवार आणि माजी आमदार संदीप बाजोरिया हे आरोपी आहेत किंवा नाहीत, या संदर्भात राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत.

फोटो स्रोत, Facebook

विविध सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल आनंदराव जगताप यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली होती.

3. तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अवमान याचिका

महाराष्ट्र टाइम्समधल्या वृत्तानुसार, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल झाली आहे.

फोटो स्रोत, Facebook

कोपरखैरणे येथील एका इमारतीवर उभारण्यात आलेला मोबाइल टॉवर न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानादेखील नवी मुंबई महापालिकेनं पाडला होता.

त्यामुळे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह विभाग अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर येत्या १२ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. तुकाराम मुंढे यांची २०१६पासून तिसऱ्यांदा बदली झाली आहे.

4. 'अयोध्या प्रकरण जागेचा वाद समजून हाताळणार'

हिंदुस्तान टाइम्समधल्या वृत्तानुसार, राम-जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वादाकडे इथून पुढे जागेचा वाद म्हणून पाहिलं जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपक मिश्र यांनी या प्रकरणीच्या सुनावणीवेळी स्पष्ट केलं.

या प्रकरणात दोन्ही पक्षांच्या मिळून ३२ जणांनी एकमेकांविरोधात अपिल दाखल केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

आमच्या पुढील प्रकरण हे टायटल सूट म्हणजेच मालमत्तेच्या वादासंदर्भात एकापेक्षा अनेकांनी दाखल केलेलं प्रकरण आहे. त्यामुळे याकडे जागेचा वाद म्हणूनच पाहिले जाईल.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार असल्याचे मिश्र यांनी स्पष्ट केले.

5. मोदी यांचा पॅलेस्टाईन दौरा

द इंडियन मधल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारपासून पॅलेस्टाईन दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात मोदी पॅलेस्टाईनमधल्या रामल्लाह शहरात १०० खाटांचं अद्ययावत हॉस्पिटल आणि शाळा उभारण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

ही भेट राजकीय नसून मानवतावादी भूमिकेतून असल्याचमही स्पष्ट करण्यात आलं आहे. या भेटीत शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या क्षेत्रांशी निगडीत करार होण्याची शक्यता आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)