#Her Choice : मी अविवाहित आहे; चारित्र्यहीन नाही...

  • अर्चना सिंग
  • बीबीसी प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

आपल्या समाजात अविवाहित मुलीला ओझं मानलं जातं.

विचारांनी स्वतंत्र आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पण अविवाहित स्त्रीची ही कहाणी. पण अविवाहित स्त्रीकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन निकोप आहे का?

माझा लहान भाऊ लग्नाळू आहे. वर्तमानपत्रातल्या मॅट्रिमोनिअल जाहिरातींमध्ये भावी वहिनीचा शोध घेण्यासाठी भावाबद्दलच्या एका वर्णनाकडे माझं लक्ष गेलं.

आमच्या एका नातेवाईकांनी वर्णनातल्या एका वाक्याला लाल रंगाने अधोरेखित करून दाखवलं- मुलाला अविवाहित बहीण आहे.

"मोठी बहीण अविवाहित असणे, हे भावाच्या लग्नासाठी अडचणीचं ठरू शकतं," असं ते म्हणाले. त्यांच्या या शब्दांनी हृदयात कोणीतरी भाला खुपसावा इतक्या वेदना झाल्या.

मन कळवळलं पण मी डोळ्यातून ओघळू पाहणाऱ्या अश्रूंना रोखलं.

मी रागाने आतल्या आत धुमसत होते. इतका अविचारी आणि मागास विचार माणसं कसा करू शकतात?

माझा श्वास जड झाला. कोणीतरी मला पकडून ठेवलं आहे, तोंडात बोळा भरलाय, हात करकचून बांधलेत असं वाटू लागलं.

अविवाहित राहण्याच्या निर्णयाने भावाच्या लग्नात मी विघ्न का ठरावं? हे मला जगाला ओरडून सांगावंसं वाटत होतं.

मात्र आजूबाजूची परिस्थिती बघता मी शांत राहणंच योग्य समजलं.

त्या वाक्याला माझा भाऊ आणि वडील विरोध करतील असं मला वाटलं. पण बाकी नातेवाईकांप्रमाणे त्यांनीही माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं.

माझ्या आईने मला नेहमीच समजून घेतलं आहे. तिने हे संभाषण थांबवलं.

पण आपला मुलगा लग्नाला तयार झाला आहे हे आईला आनंदी होण्यासाठी पुरेसं होतं. एक वेळ अशी होती जेव्हा माझ्या पालकांनी माझ्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं.

प्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.

भावंडांमध्ये मी मोठी होते. माझ्या लग्नाची चर्चा आधी रंगणं साहजिक होतं.

पण मी लग्न केलं नाही. लेकीचं लग्न करून देणं, तिला सुखी पाहणं हे कोणत्याही आईवडिलांचं स्वप्न असतं. मी त्यांना या आनंदापासून दूर ठेवलं होतं. यामुळेच आईवडील आणि माझ्यात नेहमी एकप्रकाराचा तणाव राहत असे.

याच तणावाची व्याप्ती वाढून नातेवाईक तसंच मित्रमैत्रिणी यांच्यात आणि माझ्यात खटके उडत असत. काही गोष्टींची अपेक्षा केली होती. पण काही गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या होत्या.

शाळेतल्या एका जुन्या मित्राने फोन केला आणि म्हणाला, तुला लग्न करायचं नाहीये हे मला ठाऊक आहे. पण तुझ्याही काही गरजा असतील. त्या तुला पूर्ण करून घ्यायच्या असतील तर मी मदत करू शकतो'.

अगदी सहज मी हे सगळं सोडू शकतो असंही त्याने स्पष्ट केलं. अट एकच की त्याची बायको आणि मुलांना याविषयी काहीही कळायला नको.

मला धक्का बसला.

हो, मला माझ्या गरजांची माहितीच नव्हती. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला एखादा जोडीदार हवा होता.

पण ते सगळे त्या एखाद्यासाठी मी उपलब्ध आहे, असं समजतात. हे मला मान्य नाही.

त्यातही शाळेतला मित्र अशा स्वरूपाचं बोलू शकतो, प्रस्ताव देऊ शकतो याचा मी विचारसुद्धा केला नव्हता.

त्याच्या या प्रपोजलचा मला राग आला नाही. पण त्यामागचा त्याचा विचार मात्र माझं मन दुखावणारा होता.

फोटो कॅप्शन,

अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांना समाजात वावरताना अनेकदा त्रासाला सामोरं जावं लागतं.

आणि या सगळ्याला तो मदत किंवा सेवा, म्हणत होता हे आणखी भयंकर होतं. त्याच्या वागण्याने एकदम खचल्यासारखं वाटलं.

आमच्या मैत्रीतलं सच्चेपण हरवलं आहे. मैत्री आती पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्याला भेटण्याचा विचारही मला भीतीदायक वाटतो. त्याच्याशी बोलूही नये, असं आता वाटतं.

मी सिंगल (अविवाहित) आहे असं लोकांना कळलं की माझ्याविषयीचं लोकांचं मत बदलतं. त्यांच्या वागण्यात कमालीची तफावत जाणवते. माझ्याशी बोलताना त्यांच्या आवाजातही बदल झालेला मला कळतो. 'सिंगल' आहे समजताच कॉफी आणि लंचसाठी बोलावणी सुरू होतात.

कॉफी आणि लंचसाठी बोलावणं यात काही वावगं नाही. या सगळ्याला मी आता सरावले आहे. मी काय करायचं ठरवते आणि नाही म्हणते.

मी 37 वर्षांची आहे. आणि लग्न न करता एकटं राहण्याच्या निर्णयाचा मला जराही पश्चाताप नाही. 25 वर्षांची असताना मी लग्न न करण्याविषयी आईला स्पष्टपणे सांगितलं होतं.

मी तेव्हा नुकतीच कमवायला लागली होते. मला स्वप्नं दिसत होती. त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा होता. नवी क्षितिजं खुणावत होती.

फोटो कॅप्शन,

'लग्न म्हणजे बंधनात अडकल्यासारखं वाटतं'

माझी भूमिका आईला समजली होती. पण अन्य लोकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर ती हतबल व्हायची.

लेकीचं लग्न कधी करताय, लेकीसाठी मनाजोगता जोडीदार मिळाला नाही तर आम्हाला सांगा. आम्ही मदत करू, असे प्रश्न विचारले जात असतं.

माझं करिअर बहरू लागल्यावर जोडीदारासाठीचा शोध तीव्र होऊ लागला.

माझ्या पालकांना सगळेजण माझ्या लग्नाविषयी विचारत होते. पण मला लग्न करायचं नव्हतं. निव्वळ सुरक्षित वाटावं यासाठी तर मला अजिबात लग्न करायचं नव्हतं.

माझ्या पालकांना कशाकशाचा सामना करावा लागत असेल याची मला कल्पना होती. माझं लग्नाचं वय उलटून जात होतं आणि तरीही मी पालकांकडेच राहत होते, यामुळे पालकांची काय स्थिती होत असेल, हे मला समजत होतं.

मी आयुष्यात सेटल्ड व्हावं म्हणजेच मी लग्न करावं, असं माझ्या बाबांना वाटत होतं. म्हणून मी एक-दोन नाही तर 15 मुलं पाहिली.

त्यांची काळजी मला समजत होती, म्हणून मी मुलांना भेटत होते. पण मी कोणाचीही निवड केली नाही.

या पाहण्याच्या कार्यक्रमांमुळे एका अर्थी लग्न न करण्याचा माझा निर्णय पक्का होत गेला.

आईबाबांना माझं म्हणणं हळूहळू कळू लागलं. पण बाकीच्यांना मी काय म्हणतेय, हे लक्षातच येत नसे.

माझं वागणं त्यांना नखरे वाटत असत. मी खूप मानी आहे. माझे विचार स्वतंत्र आहेत. आईवडिलांच्या इच्छाआकांक्षांची मला पर्वा नाही, असे शेरे मला ऐकायला लागत.

मूर्ख, संस्कृतीहीन आणि गोंधळलेली असा शिक्का माझ्यावर बसत असे. हे असं टोचून बोलून त्यांना काय आनंद मिळतो असा प्रश्न मला पडतो.

आणि सगळं बोलून झाल्यावर ते माझ्या चारित्र्याविषयी चर्चा करत.

पण माझी विवेकबुद्धी जागृत आहे. दोनजणांचं अफेअर किंवा लिव्ह इन रिलेशनशिप असण्यात काहीच गैर नाही.

जग पुढे सरकलं आहे. या गोष्टी आता लोकांनी स्वीकारल्या आहेत.

मला आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टी मी केव्हाही करू शकते. स्त्रिया स्वत:ला आता पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवत नाहीत.

मला मुक्त व्हायचं आहे. लग्न म्हणजे मला एखाद्या बंधनात अडकल्यासारखं वाटतं.

आकाशात मुक्त संचार करणारा पक्षी व्हायचं आहे. मला वाटतंय तसं जगायचं आहे.

अख्खा दिवस घरात बसून राहावसं वाटलं तर तसं करता यायला हवं. अख्खी रात्री जागवायची असेल तर तसंही वागण्याची मुभा असावी. क्लब, देऊळ किंवा उद्यान- जिथे जावंसं वाटेल तिथे जाता यायला हवं.

घरातली कामं करावी किंवा करू नयेत. स्वयंपाक करावासा वाटला तर केला, नाहीतर नाही.

सकाळी उठल्यावर सासूबाईंना चहा करून द्यायची काळजी नसावी. नवऱ्यासाठी नाश्ता करण्याची धावपळ नसावी. मुलांना तयार करून शाळेत पाठवायचं काम नसावं.

मला एकटं राहायला आवडतं. मला माझं स्वातंत्र्य आवडतं. आणि हे समोरच्याला समजेउमगेपर्यंत कितीही वेळा सांगायला मी तयार आहे.

मुलं-नवरा आणि मोठं कुटुंब असणाऱ्या अनेक स्त्रियांना मी पाहते. एवढा पसारा असूनही त्यांना एकटं वाटतं.

पण मला एकटं वाटत नाही. माझे कुटुंबीय आहेत, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आहे. आनंद देणारी नाती मी जपते.

अविवाहित मुलीला आपल्या समाजात एक ओझं समजलं जातं. पण मी कोणावरही ओझं नाही.

मी जगभर फिरते. मी माझ्यासाठी पैसा कमावते आणि तो कसा खर्च करायचा याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे.

चांगलं काम करून मी नाव कमावलं आहे आणि त्याविषयी प्रशंसा करणारे लेखही प्रसिद्ध झाले आहेत.

अविवाहित राहणारी मुलगी म्हणून माझी हेटाळणी करणारी वर्तमानपत्रं आता माझं वर्णन एकटी, स्वतंत्र स्त्री म्हणून माझं वर्णन करतात.

माझ्या पालकांना माझा अभिमान वाटतो. एक यशस्वी माणूस म्हणून त्यांचे आप्तेष्ट त्यांच्या मुलामुलींना माझं उदाहरण देतात.

अन्य कोण माझ्याबद्दल काय विचार करत आहेत याने शेवटी काही फरक पडत नाही.

मी माझ्यासाठी जगते आहे आणि जगाला माझी दखल घ्यायला लावली आहे.

(उत्तर-पश्चिम भारतात राहणाऱ्या एका महिलेची ही सत्य कहाणी आहे. बीबीसी प्रतिनिधी अर्चना सिंग यांनी त्यांच्यांशी संवाद साधला. दिव्या आर्य यांची ही निर्मित्ती आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव महिलेचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)