नवी दिल्ली ऑटो एक्स्पो 2018 : इलेक्ट्रिक कारचा बोलबाला

  • गुलशनकुमार वनकर
  • बीबीसी मराठी
दिल्ली ऑटो एक्सपो

नवी दिल्लीत भरलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये जगभरातल्या सर्व नामांकित गाड्यांची अद्ययावत रूपं सादर करण्यात आली आहेत.

भारतात एकाच छताखाली सर्व महत्त्वाच्या गाड्या पाहायच्या असतील तर ' नवी दिल्ली ऑटो एक्स्पो 2018' या जत्रेला नक्कीच भेट द्यायला हवी.

आणि सेल्फी स्टिक न्यायला अजिबात विसरू नका.

हो पण जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर काळजी करू नका. बीबीसी मराठीनं तुमचं काम सोपं केलं आहे.

जगभरातल्या एकापेक्षा एक भारी कॉन्सेप्ट कारचा हा नजराणा खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

1. रेनॉ

फ्रान्सच्या रेनॉ कंपनीनं भारी कॉन्सेप्ट सादर करत सर्वांची मनं जिंकली. त्यात ट्रेझॉर नावाची एक महाकाय गाडी, सफेद पण पिवळसर चकाकणारी कॉन्सेप्ट कारसह झोई नावाची स्पोर्ट्स कॉन्सेप्ट कार सादर केली आहे.

फोटो कॅप्शन,

रेनॉ ट्रेझॉर

रेनॉचे डिझाईन प्रमुख लॉरेन्स वॅन डेन अॅकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ट्रेझॉरचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गाडीला दार नसून संपूर्ण छप्परच वरच्या बाजूला उघडतं. ते बघताना अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटतं.

फोटो कॅप्शन,

रेनॉची आणखी एक कॉन्सेप्ट कार

दुसऱ्या एका कॉन्सेप्ट कारची रंगसंगती जितकी आकर्षक आहे, तितकेच त्यावरचे लाईट्स सुद्धा चित्तवेधक आहेत, जे चाकांपासून हेडलाईट्सपर्यंत गाडीचा खोडकर मूड स्पष्ट दर्शवतात.

2. मर्सिडीज बेन्झ EQ कॉन्सेप्ट

मर्सिडीज बेन्झनं तीन लक्झरी गाड्या ऑटो एक्सपोमध्ये लाँच केल्या, पण त्यांनी सादर केलेल्या EQ कॉन्सेप्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. थेट जर्मनीहून एका बंद पेटीत आलेल्या या गाडीबद्दल बोलताना कंपनीच्या एक वरिष्ठ अधिकारी म्हणाल्या, "E म्हणजे इलेक्ट्रिक आणि Q म्हणजे बुद्धिमत्ता. ही इलेक्ट्रिक गाडी एकदम स्मार्ट असणार आहे."

फोटो कॅप्शन,

मर्सि़डीज बेन्झ EQ

3. महिंद्रा इलेक्ट्रिक

-

भारतात सर्वांत प्रथम इलेक्ट्रिक गाड्या आणण्याचा मान महिंद्राला जातो. यंदा त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर इलेक्ट्रिक वाहनांचा संपूर्ण पोर्टफोलियो सादर केला. एका छोट्याशा तीन चाकी पॉडपासून ते 20-आसनी इलेक्ट्रिक बसपर्यंत सर्वकाही महिंद्राच्या पॅव्हिलियनमध्ये आहे.

तसंच त्यांनी त्यांच्या सध्या बाजारात मिळणाऱ्या KUV100 चा इलेक्ट्रिक अवतारही सादर केला.

4. सुझुकी

सुझुकीनंही नवी दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक गाड्या सादर करून संधीचं सोनं केलं. त्यांनी नारिंगी SUV - Concept FutureS कार सादर करून त्यांच्या भविष्यात येणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची एक झलक दिली. सुझुकीनुसार Concept FutureS द्वारे ते SUV ची सगळी वैशिष्ट्यं एका कॉम्पॅक्ट बांधणीत बसवून भविष्यातल्या गाड्यांसाठी एक नवा मार्ग तयार करत आहेत.

फोटो कॅप्शन,

सुझुकीचं Concept FutureS

या एक्स्पोमधली दुसरी एक गाडी e-Survivor Concept सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली. दिसायला ही गाडी एखाद्या जीपसारखीच आहे, पण ती इतकी अद्ययावत आणि भन्नाट दिसते की असं वाटतं जणू मंगळ ग्रहावरून आली आहे.

फोटो कॅप्शन,

सुझुकी e-Survivor Concept

मारूती सुझुकीची जिप्सी गाडी आजही लोकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. ही गाडी म्हणजे भारतात जिप्सीचं नवं रूप असेल, असं म्हटलं जात आहे. पण ते कितपत खरं आहे, हे अजून मारूती सुझुकीनंही स्पष्ट करण्यास नकार दिला.

5. होंडा

जपानची होंडा कंपनी रोबोंपासून जनरेटर आणि फ्युचरिस्टिक गाड्या असं बरंच काही बनवते.

यंदा त्यांनी तीन नवीन गाड्या लोकांसमोर सादर केल्या असल्या तरी त्यांच्या पॅव्हिलियनमध्ये बघ्यांची गर्दी दुसरीकडेच आहे. त्यांनी एका कोपऱ्यात दोन भारी कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक वाहनं ठेवली आहेत. त्यांच्यासमोर उभं राहिलं की "Hello!" म्हणत तुमचं स्वागत करते.

तुम्ही दचकता, क्षणभर आश्चर्यानं तिच्याकडे बघता तेव्हा ती आपले डोळे मिटते आणि सांगते, "Now 80% Charging."

फोटो कॅप्शन,

होंडाची कॉन्सेप्ट कार

ही आहे Sports EV Concept. एखाद्या ऐंशीच्या दशकातल्या गाडीसारखी हिची बांधणी आहे. पण तिचं तंत्रज्ञान अगदी 2080 मधलं आहे का असा प्रश्न पडतो. होंडा सांगतं की, आर्टिफिशल इंटिलिजन्स वापरून ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार तुमच्याशी अधिकाधिक संवाद साधण्याचा प्रयत्न करेल.

होंडानं NeuV Concept ही आणखी एक भन्नाट कार आली आहे. हे चार-आसनी पॉड भविष्यातल्या स्वयंचलित वाहनांचं स्वप्न दाखवतं.

होंडानुसार हे पॉड आर्टिफिशल इंटिलिजन्स वापरून तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून तुम्हाला बरं वाटतं आहे का, कसला तणाव तर नाही ना असे काळजी घेईल. तुमच्या लाईफस्टाईलबद्दल आणि आवडीनिवडीबद्दल सातत्यानं जाणून ही गाडी तुमचं जीवन सुलभ करण्यास प्रयत्न करेल."

6. टाटा मोटर्स

भारताच्या टाटा मोटर्सनं ऑटो एक्सपोमध्ये एक नव्हे तर दोन भारी कॉन्सेप्ट गाड्या सादर केल्या - H5X and 45X. या दोन्ही गाड्यांवरून पडदा उठवल्यानंतर लोकांनी एकसुरात 'व्वा! व्वा!' अशी दाद दिली.

फोटो कॅप्शन,

टाटाची कॉन्सेप्ट 45X

त्यापैकी H5X ही टाटा सफारीसारखी पण थोडी जास्त प्रिमियम कॅटेगरी असणारी पाच-आसनी SUV आहे, तर 45X ही मारुती बलेनो किंवा हुदाई Elite i20 सारखी एक प्रिमियम हॅचबॅक आहे.

या गाड्या काही बदलांसह पुढच्या दोन-तीन वर्षांत बाजारात येतील, असं टाटानं या ऑटो एक्स्पोमध्ये सांगितलं.

7. हुंदाई

कोरियामधील हुंदाईनं आपल्या प्रिमियम हॅचबॅक Elite i20 चं नवं रूप या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केलं. सोबतच त्यांनी एक Ioniq (आयोनिक) ही कॉन्सेप्ट गाडी सादर केली.

फोटो कॅप्शन,

हुंदाई Ioniq Hybrid

खूप मोठी, लांबच लांब दिसणारी ही गाडी हायब्रिड, प्लग-इन हायब्रिड आणि इलेक्ट्रिक अशा तीनही रूपात उपलब्ध होणारी जगातली पहिली गाडी आहे, असा दावा हुंदाईनं केला आहे.

8. किया मोटर्स

हुंदाईची सहयोगी कंपनी असलेल्या किया मोटर्सनंही भारतात पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात SUV सेगमेंटची सातत्यानं होणारी वाढ बघता कियानंही एक कॉन्सेप्ट SUV ऑटो एक्सपोमध्ये SP Concept ही कार सादर केली.

फोटो स्रोत, KIA MOTORS

फोटो कॅप्शन,

किया मोटर्सची SP Concept

2019च्या उत्तरार्धात गाड्यांच्या चाहत्यांसाठी आम्ही बाजारात काय आणू, याची झलक दाखवण्यासाठी ही गाडी या एक्सपोमध्ये उतरवल्याचं किया मोटर्सचं म्हणणं आहे.

किया मोटर्स अनेक युरोपीय देशांमध्ये आपल्या छोट्या गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

या कॉन्सेप्ट वाहनांपैकी अनेक गाड्या इलेक्ट्रिक आहेत. भविष्यात सगळ्या कंपन्या या गाड्या प्रत्यक्षात रस्त्यावर उतरवण्यावर भर देतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)