पैशाची गोष्ट: अशी गुंतवणूक फायद्याची!
- ऋजुता लुकतुके
- बीबीसी मराठी
पाहा व्हीडिओ : ELSSमधून म्युच्युअल फंडाचा परतावा आणि कर बचतही
मध्यमवर्गीयांनाही एव्हाना म्युच्युअल फंडाचं गुंतवणुकीसाठी महत्त्व पटलेलं आहे. अनेकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरूही केली असेल.
पण, म्युच्युअल फंडातून करही वाचवता येतो हे आपल्याला माहीत आहे का? अशा फंडांना म्हणतात ELSS किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम.
अशा फंडात केलेली दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त आहे.
म्युच्युअल फंडाचा फंडा
ELSS म्हणजे काय ते बघण्यापूर्वी थोडी म्युच्युअल फंडाची माहिती करुन घेणं फायद्याचं ठरेल. 'वख्त से पहले, किस्मत से जादा' पैसे मिळवण्याचं ठिकाण म्हणजे शेअर बाजार असं अनेकदा शेअर गुंतवणूकदार म्हणतात.
अर्थात प्रत्यक्ष शेअर बाजारात जोखीमही तितकीच मोठी. शेअरचा भाव कोसळला तर तुमचा पैसा बुडला. अशावेळी म्युच्युअल फंडाचा फंडा असा आहे की, त्यात. शेअर बाजारातली जोखीम कमी होते.
तुमचे पैसे तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवायचे आणि तो फंड चालवणारी संस्था गुंतवणुकदारांचा पैसा एकत्र करून शेअर बाजारात गुंतवते. अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.
म्हणजे तुमच्यासाठी जाणकार लोक शेअर बाजारात पैसा गुंतवतात आणि त्यातून आलेला नफा गुंतवणुकदारांना गुंतवणुकीच्या हिशोबात वाटतात.
शेअर बाजारातल्या गुंतवणुकीची जोखीम त्यामुळे थोडी कमी होते. आणि परतावा इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त मिळण्याची शक्यताच अधिक. आता ELSS म्हणजे काय समजून घेऊया.
ELSS म्हणजे काय?
ELSS किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम हे एक प्रकारचे म्युच्युअल फंडच आहेत. शिवाय त्यातून कर बचतीचा फायदा मिळतो. म्हणूनच त्यांना टॅक्स फंड असंही म्हणतात.
यात केलेली दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त असते. पण, इथं गुंतवलेल्या पैशासाठी तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. या काळात तुम्हाला पैसा काढून घेता येत नाही.
मागच्या ३ ते ४ वर्षांचे ELSS फंडांनी दिलेली पैसे पाहिले तर त्यांची उपयुक्तता तुमच्या लक्षात येईल.
कर वाचवण्यासाठी 80C अंतर्गत करायच्या गुंतवणुकीमध्ये पीपीएफ, पीएफ, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट या सगळ्यांमध्ये ELSSने सर्वाधिक परतावा दिला आहे. मग खरंच यात गुंतवणूक करायची का? आणि कशी?
फोटो स्रोत, 1998 EyeWire, Inc.
काय आहेत ELSSचे फायदे?
का करायची गुंतवणूक?
गुंतवणूकतज्ज्ञ जयंत विद्वांस यांनी ELSSमधल्या गुंतवणुकीचे फायदे नेमकेपणाने सांगितले.
बीबीसीशी बोलताना त्यांनी पीपीएफ, पेन्शन योजना आणि बँकेतल्या मुदत ठेवी यांच्या परताव्यातली तफावत मांडली. 'सध्या पीपीएफचा व्याजदर ७.७५% मुदत ठेवींवरचा व्याजदर जास्तीत जास्त पावणे सात टक्के आहे.
त्यापेक्षा ईएलएसएसमधून मिळणार परतावा मागची काही वर्षं दहा टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. शिवाय लॉक-इन कालावधी फक्त ३ वर्षांचा आहे.
पीपीएफमध्ये हा कालावधी सात वर्षांचा तर पेन्शन फंडात तो ६० वर्षांचे होईपर्यंतचा आहे. ३ वर्षांत पैसे हातात मिळणं आणि परतावा महागाई दरापेक्षा जास्त हा सगळ्यात मोठा फायदा असल्याचं विद्वांस सांगतात.
कशी करायची गुंतवणूक?
जवळजवळ प्रत्येक वित्तीय संस्थांचे ELSS फंड आहेत. गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्याने यातला एक किंवा काही फंड निवडू शकता.
त्यात कितीही पैसे गुंतवू शकता. पण, कर बचतीचा फायदा दीड लाखांवरच मिळेल.
इथंही एकगठ्ठा गुंतवणूक किंवा दर महिन्याला काही ठरावीक रक्कम म्हणजे SIPचा पर्याय इतर म्युच्युअल फंडांसारखाच तुमच्याकडे उपलब्ध आहे.
SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान, जिथे दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ठरावीक रक्कम तुम्ही निवडलेल्या ELSSमध्ये वळती होते.
SIPची रक्कम दर महिन्याला पाचशे रुपयांपासून असू शकते.
फोटो स्रोत, Google
ELSSमध्ये गुंतवणूक
दीर्घ कालीन भांडवली नफा आणि ELSSमध्ये गुंतवणूक
नवीन बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्युच्युअल फंडात दीर्घ कालीन भांडवली नफ्यावर दहा टक्क्यांच्या कराची तरतूद केली आहे.
म्हणजे तुमचा नफा एका वर्षापेक्षा जास्त काळात एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नफ्यावर दहा टक्के कर बसेल.
त्यामुळे ELSS वर मिळणारा परतावा इथून पुढे करमुक्त राहणार नाही. पण, त्यामुळे फारसं घाबरून जाण्याची गरज नाही, असं विद्वांस यांनी म्हटलं आहे.
'नवीन गुंतवणूक करताना काही पथ्य पाळली तर हा करही वाचू शकेल. शक्यतो फंडांचा डिव्हिडंड हा पर्याय न निवडता ग्रोथ पर्याय निवडावा.
आणि एकगठ्ठा रक्कम काढण्याचं टाळावं,' असं विद्वांस यांनी सांगितलं.
शिवाय भांडवली नफ्यावर कर भरूनही मिळणारा परतावा आकर्षक असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तर सीए जयंत आपटे यांनीही ELSS मधली गुंतवणूक सुरू ठेवावी असाच सल्ला दिला आहे.
दीर्घ कालीन भांडवली नफा म्हणजे काय हे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. 'नवीन तरतूदीनुसार, एका वर्षांपेक्षा जास्त काळ पैसे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीममध्ये राहिले तर मिळणारा नफा दीर्घकालीन होईल.
फोटो स्रोत, Getty Images
SIPच्या माध्यमातून करु शकता गुंतवणूक
आणि मग नफा एका लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावर दहा टक्के कर भरावा लागेल. ELSSला तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असल्याने हा नफाही या करासाठी लागू होईल.' आपटे यांनी स्पष्ट केलं.
पण, त्याचबरोबर हा नवीन बदल ३१ जानेवारी २०१८ नंतरच्या भांडवलासाठी लागू होईल हा दिलासाही त्यांनी दिला आहे.
'भांडवली नफ्यावरच्या करामुळे सुरुवातीच्या काही काळासाठी ELSSचं आकर्षण कमी होईल. कारण, अनेकांना तीन वर्षांनंतर पैसे काढून घेण्याची सवय असते.
पण, या सवयीला थोडी मुरड घातली आणि एकगठ्ठा पैसे काढण्यापेक्षा हळूहळू काढले तर या करापासूनही वाचता येईल.' आपटे यांनी सांगितलं.
शिवाय घर खरेदीसारख्या मोठ्या खर्चासाठी पैशाची गरज असल्यास आयकर कायद्याच्या ५४ कलमा अंतर्गत करातून सूट मिळणार आहे, याकडेही आपटे यांनी लक्ष वेधलं.
थोडक्यात ELSSमधून परतावा थोडा कमी होणार असला तरी इतर बचतीच्या मानाने अजूनही इथं फायदाच असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
पैशाची गोष्टमध्ये पुढच्या आठवड्यात नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत. अधिक माहितीसाठी लिंकमधला व्हीडिओ जरुर पाहा.
DISCLAIMER - म्युच्युअल फंडातली गुंतवणूक शेअर बाजारात होत असल्याने त्यात जोखीमही असते. गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)