असल्फा : घरंच नव्हे जगणं झालं रंगीबेरंगी

  • राहुल रणसुभे
  • बीबीसी मराठी
व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ - रंगीबेरंगी झोपडपट्टी पाहिलीये का कधी?

मुंबईत घाटकोपरजवळच्या असल्फा वस्तीतल्या डोंगराचं सध्या रुप पालटलं आहे. या डोंगराच्या माथ्यापर्यंत असलेली सर्व घरे नव्या नवरीप्रमाणे नटली आहेत. विविध रंगांनी रंगवलेली ही घरं जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतात.

कोणीही या परिसरात आल्यावर या झोपडपट्टीला भेट दिल्याशिवाय, घरांचे फोटो काढल्याशिवाय राहात नाही. याचं श्रेय 'चल रंग दे' या एनजीओला जातं.

या प्रकल्पाबद्दल माहिती देताना, 'चल रंग दे'च्या संस्थापक देदिप्या रेड्डी म्हणाल्या की, "या सर्व उपक्रमाचा उद्देश लोकांचा झोपडपट्टीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलणं, त्यांची मानसिकता बदलणं हा होता. येथील घरांवर काढलेली सर्व चित्रे ही एकतर येथील लोकांविषयी अथवा मुंबई विषयी काही तरी सांगतात."

त्या म्हणतात, "सुरूवातीला आम्ही इथे आलो, तेव्हा खूप घाबरलो होते. काय होईल याची काहीच कल्पना नव्हती. तसंच येथील लोक सुध्दा घाबरलेले होते. आम्ही कोण आहोत आणि हे सर्व काय करत आहोत, का करत आहोत असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात घर करून होते. आम्ही त्यांना आमचा उद्देश सांगितल्यावर त्यांनी आम्हाला मदत केली."

एवढी सुंदर वस्ती झाल्यानंतर येथील लोकांचेही विचार आता बदलले आहेत. लोक आता स्वतःहून वस्ती स्वच्छ ठेवण्यात पुढाकार घेत आहेत.

याबद्दल सांगताना येथील रहिवासी प्रियंका फाळके म्हणाल्या, "आता जे पेंटींग केलं आहे ते आम्ही तसंच ठेवू. हे कायमस्वरूपी असंच रहावं, जसं आज आहे पुढेही तसंच रहावं. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू."

तर, येथील लहान मुलांनीही हे सर्व असंच टिकवण्याचा निश्चय केला आहे. या उपक्रमानंतर झालेल्या बदलाबद्दल सांगताना येथील रहिवासी अक्षता म्हणाली की, "पूर्वी खूप लोक पान खाऊन इकडे तिकडे थुंकायचे. आम्हाला खूप लाज वाटायची. पण आता इथे रंग लावल्यानं कोणीच थुंकायची हिंमत करत नाही. हे खूप छान वाटतं आणि आम्ही हे टिकवून ठेवू."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)