#5मोठ्या बातम्या : मंत्रालय की स्मशान- सामनाच्या संपादकीयातून भाजप सरकारवर टीका

वृद्ध शेतकरी धर्मा पाटील

महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू स्मशान झाले आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात तरुणांसाठी 'सेल्फी पॉइंट' निर्माण केले आहेत; पण मंत्रालय सध्या 'सुसाईड पॉइंट' म्हणजे आत्महत्या करण्याचे ठिकाण झाले आहे. अशी टीका सामनाच्या संपादकीयातून करण्यात आली आहे.

सामनामधल्या या संपादकीयासह आजच्या इतर पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे.

१. 'मंत्रालय की स्मशान'

महाराष्ट्राचे मंत्रालय आता जनतेच्या आशाआकांक्षांचे थडगे झाले आहे. मंत्रालयातील अनेक दालनांत निर्जीव व भावनाशून्य पुतळेच खुर्च्यांवर बसवले आहेत की काय असा भास निर्माण झाला आहे, अशी टीका सामनातल्या या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचे सत्र मंत्रालयात सुरू आहे. धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्या केली. पाटील यांचे बारावे-तेरावे होत नाही तोच गुरुवारी हर्षल सुरेश रावते या पंचेचाळीस वर्षांच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली व मरण पत्करले, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

२. 'लोया प्रकरणी SIT स्थापन करा'

हिंदुस्तान टाइम्समधल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष चौकशी समिती (SIT) स्थापन करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

१५ पक्षांच्या ११४ खासदारांच्या सह्या असलेलं पत्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती कोविंद यांना सादर केलं. सुप्रीम कोर्टाच्या आखत्यारित येणारी विशेष चौकशी समिती स्थापन करून न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या पथकानं केल्याचं या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

तर, टाइम्स ऑफ इंडियामधल्या वृत्तानुसार, २०१४ साली मृत्यू झालेल्या लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिका मोठ्या संख्येनं सादर होत आहेत. या याचिका माध्यमांच्या वृत्तावर आधारलेल्या असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

३. फेसबुकवर महिलेच्या जाळ्यात अडकला वायुदलाचा अधिकारी

दैनिक दिव्य मराठीमधल्या वृत्तानुसार, हवाईदलाचा ग्रुप कॅप्टन अरुण मारवाहला हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केले. त्याच्याकडून गोपनीय माहितीही काढली.

मारवाहच्या संशयास्पद हालचालींकडे पाहता त्याला ३१ जानेवारीला ताब्यात घेण्यात आले. बुधवारी अटकेनंतर गुरुवारी त्याला कोर्टाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मारवाह दिल्लीत वायुदल मुख्यालयात तैनात होता. त्याने गुप्तचर अधिकाऱ्यांसह नौदल कमांडोंनाही प्रशिक्षण दिलेले आहे.

४. 'मतदान सक्ती करा'

लोकसत्तामधल्या वृत्तानुसार, राज्यात निवडणुकीत मतदानासाठी सक्ती करता येईल का, याचा निवडणूक आयोगाने विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमात केली.

त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा आणि सार्वजनिक संस्थांच्या निवडणुका एकत्रित झाल्यास यंत्रणांवरील ताण कमी होईल, असा दावा करीत या निवडणुका एकत्रित घेण्याची मागणीही त्यांनी केली. निवडणुकीतील पैशाचा वापर चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.

५. आरोग्य निर्देशांकात केरळ, पंजाब, तामिळनाडू पुढे

द हिंदूमधल्या वृत्तानुसार, केरळ, पंजाब, तामिळनाडू ही राज्यं निती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकाच्या यादीत अव्वल ठरली आहेत. भारताची आरोग्य क्षेत्रातली वार्षिक प्रगती तपासण्यासाठी तपासण्यासाठी पहिल्यांदाच असा अहवाल तयार करण्यात आला.

निती आयोगानं जागतिक बँकेच्या सहकार्यानं हा अहवाल तयार केला. शुक्रवारी आयोगाचे सिईओ अमिताभ कांत यांनी हा अहवाल सादर केला.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)