जम्मू : कट्टरतावाद्यांचा हल्ल्यात 2 जवान मृत्युमुखी

जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे वाहन Image copyright MOHIT KANDHAR

जम्मूमधल्या सुंजवान लष्करी तळावर शनिवारी पहाटे कट्टरतावाद्यांनी हल्ला केला. जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. डी. जामवाल यांनी हल्ला झाल्याची माहिती दिली.

जम्मू-काश्मीरचे संसदीय कामकाज मंत्री अब्दुल रहमान वीरी यांनी विधानसभेत या हल्ल्याची माहिती दिली. जेसीओ मदन लाल चौधरी आणि मोहम्मद अशरफ या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, मदनलाल चौधरी यांची मुलगी नेहा या हल्ल्यात जखमी झाली आहे. त्याचबरोबर, कर्नल रोहित सोळंकी, लांस नायक बहादूर सिंह आणि शिपाई अब्दुल हामिद के जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

या लष्करी तळावरून अजूनही गोळ्यांचे आवाज येत आहेत. हा लष्करी तळ जम्मू बायपास रस्त्याजवळ असून इथे शाळा आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत.

Image copyright MOHIT KANDHARI

लष्करी तळावर हेलीकॉप्टर गस्त घालत असून परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी २८ जून २००३मध्ये याच सुंजवानच्या लष्करी तळावर कट्टरतावाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हा या हल्ल्यात १२ जवान मारले गेले होते.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)