भारतात 'इलेक्ट्रिक कार' कधी स्पीड पकडणार?

  • गुलशनकुमार वनकर
  • बीबीसी मराठी
महिंद्राच्या कॉन्सेप्ट गाड्या ATOM आणि EDO
फोटो कॅप्शन,

महिंद्राच्या कॉन्सेप्ट गाड्या ATOM आणि EDO

"भविष्यात रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या या इलेक्ट्रिक कारचं असतील," असं दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये आलेल्या कंपन्यांनी एकमताने म्हटलं.

गेल्या वर्षी झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये महिंद्रा अॅंड महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलॅंड या कंपन्यांनी इलेक्ट्रिक कारचं महत्त्व सांगितलं होतं. तसंच या कंपन्यांनी 'गो ग्रीन'चा नारा दिला होता. "इलेक्ट्रिक कार हेच भविष्य आहे," असं सर्वच कंपन्यांनी एकसुरात म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कशी झाली सुरुवात?

"दहा वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक बाईक भारतात आल्या. बॅटरीवर चालणाऱ्या बाईकला ग्राहकांची पसंती मिळाली नाही. कारण लोक बॅटरीवर चालणाऱ्या बाईकची तुलना थेट होंडाच्या अॅक्टिवासोबत करू लागले. अॅक्टिवाच्या तुलनेत इलेक्ट्रिक बाईकला अनेक मर्यादा होत्या. म्हणून या बाईक ग्राहकांना आपल्याकडे खेचू शकल्या नाहीत," असं सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे (SMEV) संचालक सोहिंदर गिल यांनी बीबीसीला सांगितलं.

सध्या भारतात अंदाजे 31 कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये गुंतवणूक केली आहे.

सरकारचं धोरण काय आहे?

"इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे," असं महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्याधिकारी महेश बाबू यांनी म्हटलं. नुकतीच सरकारनं 10 हजार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे.

स्वच्छ इंधनाचा वापर वाढावा यासाठी सरकारने एनर्जी इफिशिएंसी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) या मंडळाची स्थापना केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावे यासाठीच सरकारने ही ऑर्डर दिली आहे.

फोटो स्रोत, Sean Gallup/getty

फोटो कॅप्शन,

इलेक्ट्रिक वाहनांमुळे कार्बनडायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होणं अपेक्षित आहे. (संग्रहित)

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"इलेक्ट्रिक वाहनांमुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होणं अपेक्षित आहे. भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबतचं धोरण स्पष्ट नाही. कारण इलेक्ट्रिक कारना मुबलक वीज लागेल. भारतातली बहुतांश वीज औष्णिक प्रकल्पांमध्ये तयार होते. जोपर्यंत या कारचं चार्जिंग अपारंपरिक स्रोतांतून निर्माण झालेल्या ऊर्जेवर होत नाही, तोपर्यंत इलेक्ट्रिक कारच्या वापराला काही अर्थ नाही," असं होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे मुख्याधिकारी योईचिरो उइनो यांनी बीबीसीला सांगितलं.

सरकारनं फास्टर अडॉप्शन अॅंड मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिक व्हेइकल (FAME) ही एक योजनाही आणली आहे. पण थोड्याफार प्रमाणात निधीचं वाटप करण्यापलिकडं या योजनेचा विस्तार झालेला दिसत नाही. याविषयी, सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसीने प्रयत्न केले, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

इ-रिक्षा चांगला पर्याय पण...

भारतामध्ये इलेक्ट्रिक रिक्षांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. पण त्यावर नियंत्रण असावं अशी सरकारची भूमिका आहे. "प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक रिक्षांचा वापर वाढणं ही चांगली बाब आहे, पण या रिक्षांवर नियंत्रण असलं पाहिजे," असं वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी म्हटलं होतं.

"2030 पर्यंत देशभरात फक्त इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी असावी," यासाठी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेलं प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण (EPCA) झटत आहे.

या गाड्या विकत घेतील का?

"या वाहनांना मागणी आहे. 'टाटा टिगोर EV' ही कार विक्रीसाठी केव्हा उपलब्ध होईल असं लोक आम्हाला विचारतात? पण जोपर्यंत देशात चार्जिंग स्टेशन नाहीत तोपर्यंत या कारची विक्री कशी करणार?" असं टाटा मोटर्सचे प्रवासी वाहतूक विभागाचे अध्यक्ष मयांक पारिख यांनी म्हटलं.

"जर पेट्रोल पंप नसतील तर पेट्रोलची कार घेऊन काही फायदा आहे का?" असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

इलेक्ट्रिक कारच्या विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून चांगले रस्ते आणि चार्जिंग पॉइंट असणं आवश्यक आहे. ( संग्रहित )

"तेव्हा सरकारची याबाबतची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. या कारला प्रोत्साहन मिळावे म्हणून चांगले रस्ते आणि सुविधा असणं अत्यावश्यक आहे," असं ते म्हणाले.

"इलेक्ट्रिक वाहनांची विक्री संथगतीने होत आहे. २०१६-१७ या वर्षात केवळ २५-३० हजार इ-बाइक आणि २००० कारची विक्री झाली. या वर्षी विक्री वाढेल अशी आम्हाला आशा आहे," असं गिल म्हणाले.

"मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसारच या वाहनांची विक्री होते. इ-कार विषयी ग्राहकांच्या मनात संभ्रम आहेत. त्यांच्या मनातील संभ्रम हे निर्मात्यांसाठी चिंतेचा विषय आहे. इलेक्ट्रिक कार चालण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा आणि चार्जिंग पॉइंट असणं आवश्यक आहे."

"या क्षेत्रात मोठे गुंतवणूकदार आले तर अनेक प्रश्न सुटू शकतील," असं अर्बन सायन्स इंडियाचे संचालक अमित कौशिक यांचं म्हणणं आहे. "जोपर्यंत तंत्रज्ञान आणि बॅटरीची किंमत कमी होत नाही तोपर्यंत इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावताना दिसणार नाहीत."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)