लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकू शकतं का?

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी
लाँग डिस्टन्स

व्हॅलेंटाईन डेची एरव्ही प्रतीक आतुरतेने वाट पाहायचा. पण 7 वर्षांपूर्वी हा दिवस त्याच्या नात्यातला कसोटीचा क्षण होता.

प्रतीक आणि अंजली (नावं बदललेली आहेत) यांचं दोघांवर खूप प्रेम, पण त्याला कामानिमित्त अमेरिकत जावं लागलं आणि नात्यात तडे जाऊ लागले. प्रश्न दोन वर्षं एकमेकांपासून दूर राहण्याचा होता. पण त्यातला एकेक दिवस नवनव्या अडचणी घेऊन येत होता.

तो नोकरी सोडून उच्चशिक्षणासाठी गेला होता. ती अजूनही नोकरी करत होती. तिच्या घरचे लग्नासाठी मागे लागले होते. अन् ती त्याची वाट पाहत बसली होती.

"लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये काढलेली ती दोन वर्षं आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्या काळात आमच्या नात्याची खरी परीक्षा झाली," प्रतीक सांगतो.

"आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो. मी अमेरिकेला शिक्षणासाठी जाणार हे सांगितल्यावर आमच्या दोघांच्या घरचे थोडे काळजीत पडले. दोन वर्षं हा काळ तसा मोठा असतो. म्हणून त्यांना काळजी वाटत होती.

"एकमेकांपासून दूर राहिल्यामुळं खूप अस्वस्थता असायची. जेव्हा आपण समोरासमोर असतो, एकमेकांना रोज भेटत असतो, तेव्हा गैरसमज किंवा रुसवे फुगवे काढणं खूप सोपं असतं. एकमेकांपासून दूर राहिल्यावर या गोष्टी अवघड होतात," प्रतीक त्याच्या अडचणींविषयी सांगतो.

"टाइम झोनच्या फरकामुळे सुरुवातीचा काळ जास्त कठीण गेला. नेमकं केव्हा एकमेकांशी बोलायचं हेच कळत नव्हतं. अमेरिका आणि भारताच्या वेळेमध्ये दहा तासांचा फरक आहे. एकमेकांच्या संपर्कात राहायचं तर व्हॉट्सअॅप हाच पर्याय होता."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

'विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळं आमच्यात अंतर राहणार नाही असं वाटतं होतं.'

तिकडे प्रतीक दूर देशात एकटा राहत होता. इथे अंजलीच्या अवतीभोवती मित्रमैत्रिणी होते, तरीही तिचा जीव टांगणीला लागला होता.

"मला जेव्हा कळलं प्रतीक अमेरिकेला जाणार आहे तेव्हा मला दुःख झालं. आपल्याकडून हे नातं कसं सांभाळलं जाईल, ही भीती मला वाटू लागली होती," अंजली प्रांजळपणे कबूल करते.

अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांचे वाद व्हायचे. धड संवाद होऊ न शकल्याने गैरसमज व्हायचे आणि टोकाची भाषा केली जायची.

शरीरिक जवळीक नाही

"नात्यामधला एक महत्त्वपूर्ण घटक असतो, तो म्हणजे तुमची फिजिकल इंटिमसी. एकदा एकमेकांच्या सहवासाची सवय लागल्यावर एकमेकांपासून दूर राहणं खूप वेदनादायी असतं," प्रतीक सांगतो.

"फिजिकल इंटिमसी कपल्सना जोडणारा दुवा असतो. पण जर तुमचं भावनिक नातं घट्ट असेल आणि एकमेकांवर विश्वास असेल, तर तुम्ही दुरावा सहन करू शकता."

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचे सर्व तोटेच आहेत असं नाही. तुमच्या नात्यांची खरी परीक्षा याच काळात होते, असं या दोघांचं म्हणणं आहे. हा अवघड काळ दोघांनी यशस्वीपणे पार केला.

"प्रतीक भारतात परतला, आमचं लग्न ठरलं. तेव्हा एक गमतीशीर विचार माझ्या मनात आला होता. फोनवर तर आम्हा दोघांचं खूप पटायचं पण प्रत्यक्षात सोबत राहताना पटेल की नाही याची भीती मला वाटली. लग्न झाल्यावर मात्र त्या भीतीचं काही कारण राहिलं नाही," असं अंजली हसून सांगते.

"प्रतीक भारतात परतल्यानंतर काही महिन्यातच आमचं लग्न झालं. आमच्या नात्यामध्ये अनेक चढउतार आले, पण ही दोन वर्षं आमच्या नात्याला कलाटणी देणारी होती."

फोटो स्रोत, Getty Images

'विश्वास महत्त्वाचा'

प्रतीक आणि अंजली यांच्यासारख्या हजारो तरुण-तरुणींना शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने वेगळ्या ठिकाणी जाऊन रहावं लागतं. त्यामुळे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधल्या समस्या हा तरुणांमध्ये काळजीचा विषय झाला आहे.

"ज्या युगुलांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना अधिक असते त्यांचं नातं दीर्घकाळ टिकू शकतं," असं नात्यांविषयीच्या समुपदेशक वंदना कुलकर्णी सांगतात.

"लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये स्पर्श आणि सहवास या दोन महत्त्वपूर्ण घटकांचा अभाव असतो. त्यावेळी तुमचं आणि तुमच्या साथीदाराचं बौद्धिक आणि भावनिक सामंजस्य कसं आहे, यावर तुमचं नातं अवलंबून असतं," त्या पुढे सांगतात.

"परस्परांवरचा विश्वास आणि सुरक्षिततेची भावना दृढ असेल तर अंतर कितीही असलं तरी मनातलं अंतर कधी कमी होणार नाही," असा कानमंत्र वंदना कुलकर्णी तरुण-तरुणींना देतात.

'नेटवर्क'च्या शोधातलं प्रेम

आपला प्रियकर किंवा प्रेयसी काही काळासाठी दूर असेल, तर गोष्ट वेगळी. पण काही नाती कायमचीच लाँग डिस्टन्स असतात.

फोटो स्रोत, Akanksha kumar

फोटो कॅप्शन,

'आम्ही वर्षभरात जास्तीत जास्त 20 दिवस एकमेकांसोबत असतो.'

बडोदा विद्यापीठात शिक्षण घेणारी आकांक्षा कुमार सांगते, लष्करातल्या अधिकाऱ्यावर प्रेम करणं हे मोठं आव्हान आहे. "तंत्रज्ञानामुळं आमच्यात अंतर राहणार नाही, असं वाटतं होतं. पण माझ्या बॉयफ्रेंडचं पोस्टिंग काही काळ काश्मीरमध्ये सीमेवर होतं. जेव्हा तो पोस्टवर असायचा, तेव्हा तिथं नेटवर्क नसायचं. जर नेटवर्क असलं तरी व्हीडिओ कॉल होईल, इतकं ते स्ट्राँग नसायचं. जेव्हा तो त्याच्या क्वार्टर्सवर यायचा, तेव्हाच आमचं बोलणं व्हायचं.

"आम्ही वर्षभरात जास्तीत जास्त 20 दिवस एकमेकांसोबत असतो. व्हॅलेंटाइन डे असो वा बर्थ डे असो, आम्ही एकटेच असतो. हे एकटेपणा खायला उठतो. त्याच्या वाढदिवशी मी मंदिरात जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करते आणि माझ्या वाढदिवशी तो देखील हेच करतो.

"त्याला सुटी मिळाल्यावर जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा आम्ही एकमेकांच्या सहवासातला प्रत्येक क्षण आनंदात घालवतो. हा क्षण येण्यासाठी अनेक महिन्यांची तपश्चर्या करावी लागते. कदाचित हेच कारण असेल आमचं प्रेम दिवसेंदिवस वाढतंच आहे," असं आकांक्षा सांगते.

भावना व्यक्त करणं आवश्यक

जगभरातील अनेक तरुण-तरुणींना या अवस्थेतून जावं लागतं. अशा अनेक तरुणांचा अभ्यास करुन मानसोपचारतज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत.

बीबीसी रेडिओ ने लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. त्या लक्षात घेतल्या तर तुमचं नातंही टिकेल, तसंच त्यात ओलावाही राहील.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

1. एकमेकांना आधार द्या - तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यासमोर अनेक आव्हानं येऊ शकतात. त्यांना सामोरं जा. त्यांच्यावर मात करा. जर तुम्ही हे वादळ पचवू शकला तर तुमचं नातं सशक्त होईल.

2. एकमेकांसोबत असताना प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या - खूप दिवसानंतर भेटल्यानंतर काही वेळ निवांत एकमेकांसोबत बसा. छोट्या-मोठ्या 'अॅक्टिव्हिटीज' एकत्र करा. जसं की सोफ्यावर बसून निवांतपणे पॉपकॉर्न खात चित्रपट पाहणे किंवा ल्युडो खेळणे इत्यादी.

3. एकमेकांच्या संपर्कात राहा - नव्या ठिकाणी राहायला गेल्यावर तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. तेव्हा आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष होईल असं काही करू नका. एकमेकांशी फोन, स्काइप किंवा व्हॉट्सअॅपने संपर्कात राहा. हाताने लिहिलेल्या प्रेमपत्राइतकी दुसरी कुठली वस्तू संग्रहणीय असू शकते? तेव्हा एकदा प्रेम पत्र लिहून पोस्टाने पाठवा.

4. नकारात्मक विचारांपासून दूर राहा - बऱ्याचदा फोन लागत नाही किंवा उचलता येत नाही. तेव्हा चीडचीड होते, पण याचा अर्थ असा नाही की तुमचा जोडीदार तुम्हाला टाळत आहे. कारण समजून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका. त्याने नकारात्मक विचार वाढतात.

5. आपल्या भावना व्यक्त करा - एकटं राहिल्यावर तुमच्या मनात भीती किंवा असुरक्षितता निर्माण होऊ शकते. त्याबद्दल जरुर एकमेकांना सांगा. भावना व्यक्त केल्यावर तुमच्या मनातील संशयाचं धुकं कमी होण्याची चिन्हं असतात, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)