#HerChoice : 'बिछान्यावर जबरदस्ती करणाऱ्या नवऱ्याला मी सोडलं'

ती रात्र संपणारच नाही असं काहीसं मला तेव्हा वाटत होतं. माझं डोकं अक्षरशः फुटायची वेळ आली होती. त्यामुळे मी सारखी रडत होते.
रडतरडतच मला झोप लागली. झोप लागल्याचं मला कळलंही नाही. सकाळी 6 वाजता झोपेतून उठले तेव्हा माझा नवरा माझ्यासमोर उभा होता.
काल रात्रीचा तो प्रश्न घेऊनच तो माझ्यासमोर आला. त्यानं विचारलं की, "मग काय विचार केला आहेस तू? तुझं उत्तर हो आहे की नाही?"
मला काहीच समजंत नव्हतं. शेवटी मी हिंमत करून त्याला म्हणाले, "तुम्ही प्लिज आता ऑफीसला जा. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत फोन करून सांगेन. असं मी तुम्हाला वचन देते."
यावर त्यानं मला धमकावतच म्हटलं, "ठीक आहे. मी चार वाजता तुला फोन करेन. मला तेव्हा उत्तर पाहिजे आणि ते हो असंच पाहिजे. नाहीतर रात्री शिक्षा भोगायला तयार राहा."
या शिक्षेचा अर्थ म्हणजे 'अॅनल सेक्स'. त्याला माहित होतं की, असं केल्यानं मला खूप दुखतं. त्यामुळे मला टॉर्चर करण्यासाठी तो या 'शिक्षे'चा वापर करत असे.
नऊ वाजता तो आणि त्याची मोठी बहीण ऑफिसला गेले. मी घरात एकटीच होते. बराच वेळ विचार केल्यावर मी माझ्या वडिलांना फोन केला आणि मी आता त्याच्यासोबत राहू शकत नाही, असं सांगितलं.

बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही 2018 मध्ये तुमच्यासमोर घेऊन आलो होतो. या सीरिजच्या माध्यमातून पुढे आलेल्या कहाण्यांमधून 'आधुनिक भारतीय महिले'चे विचार आणि तिच्या समोर उपस्थित असलेले पर्याय, तिच्या आकांक्षा, तिची प्राथमिकता आणि तिच्या इच्छा प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील ही स्टोरी पुन्हा शेयर करत आहोत.

मला भीती होती की वडील नाराज होतील. मात्र, त्यानीं लगेच सांगितलं की, "तू बॅग उचल आणि लगेच निघून ये." मी माझी 'ओरिजिनल सर्टिफिकेट्स' आणि एक पुस्तक घेऊन बस स्थानकाकडे पळाले.
माझ्या नवऱ्याला मी मेसेज केला की, "माझं उत्तर नाही असं आहे आणि मी माझ्या घरी चालले आहे." त्यानंतर मी माझा फोन स्वीच ऑफ करून टाकला.
थोड्याच वेळात मी माझ्या घरच्यांसोबत घरी होते. मी माझ्या लग्नाच्या दोनच महिन्यांनी नवऱ्याचं घर सोडून आले होते.
माझा नवरा साहिल याला मी आजपासून बरोबर तीन वर्षांपूर्वी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी भेटले होते.

तो खूप हसऱ्या चेहऱ्याचा होता. त्याचं माझ्या आजूबाजूला असणं मला आवडायचं आणि असं जवळ राहूनच त्याच्या प्रेमात पडले. आम्ही फिरायला जायचो, तासनतास फोनवर बोलत राहायचो. मात्र, हा रोमान्स जास्त दिवस टिकू नाही शकला.
हळूहळू मला वाटू लागलं की जे बरोबरीतलं नातं मला हवं होतं ते हे नव्हतं. माझ्या आई-वडिलांमध्ये जसं नातं होतं त्याच वळणावर हे नातं येऊन पोहोचलं होतं. फरक फक्त एवढाच होता की माझी आई गप्प राहायची आणि मी गप्प राहू शकत नव्हते.
माझे वडील छोट्या-छोट्या गोष्टींवर आईवर चिडायचे, हात उचलायचे. आई यावर फक्त रडत राहायची. साहिलसोबत जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा तो धक्का-बुक्कीच करायचा आणि जबरदस्ती जवळ येण्याचा प्रयत्न करायचा. मी नाही म्हणाले तर जोरात ओरडायचा.
एक दिवस त्यानं मला विचारलं की, "बरं सांग मला, जर मी तुझ्यावर हात उचलला तर...?" हे ऐकून मी हैराण झाले. माझ्या रागावर नियंत्रण ठेवत मी म्हणाले, "मी त्याच दिवशी तुझ्यापासून वेगळी होईन."
तो तातडीनं म्हणाला, "याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेम नाही. प्रेमात कोणतीही अट असू नये." यानंतर जवळपास महिनाभर आमच्यात बोलणं झालं नाही.
हळूहळू भांडणं वाढत गेली. अनेकदा मी नातं तोडण्याचा प्रयत्न केला पण तो प्रत्येक वेळी माफी मागायचा. मी स्वतःला साहिलपासून कायमचं दूर करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ते मला शक्य होत नव्हतं.
याच वेळी माझ्यावर लग्नाचा दबाव वाढू लागला होता. मी आता एक शिक्षिका झाले होते. मी वर्गात असायचे आणि आईवडिलांचा फोन यायचा. फोनवर नेहमी तीच गोष्ट व्हायची की, "लग्नाबद्दल काय विचार केला आहेस? साहिलसोबत लग्न करून टाक. त्याच्याशी नसेल करायचं तर आमच्या आवडीच्या मुलाशी तरी कर. आपल्या दोन लहान बहिणींचा तरी विचार कर." वगैरे वगैरे.

घरात काहीही गडबड झाली तरी त्या विषयाला माझ्या लग्न न करण्याच्या विषयाशी जोडलं जायचं. आईची तब्येत बिघडली कारण मी लग्न करत नव्हते. वडिलांना उद्योगात नुकसान झालं कारण मी लग्न करत नव्हते.
मी यामुळे खूप चिंतातूर झाले होते. अखेर मी लग्नाला होकार दिला. पण, मी तेव्हाही तयार नव्हते. साहिलनं त्याच्याकडून मला काही दुःख होईल असं काही वागणार नाही, असं वचन दिलं होतं खरं, पण त्याच्यावर मला भरवसा नव्हता.
लग्नानंतर माझी भीती सत्य बनून समोर आली. साहिल अगदीच कळसूत्री बाहु्ल्यांप्रमाणे मला नाचवू लागला. मला कविता लिहायची आवड होती. मी फेसबुकवर माझ्या कविता शेअर करायचे. त्यानं यावर बंदी घातली. मी तेच कपडे घालायचे जे साहिलला आवडत असत.
मला आठवतं एकदा तो मला बोलला की, "रात्रीपर्यंत आपला अभ्यास आटपून बस. मला खूश नाही केलंस तर मला इतर ठिकाणी जावं लागेल."
तो सतत म्हणायचा की, मला तू खूश ठेवत नाहीस. त्यामुळे पॉर्न बघून काहीतरी शिक असं तो सांगायचा. नंतर हिरो होण्याचं अचानक त्याच्या मनानं घेरलं. त्याला मला सोडून मुंबईला जायचं होतं.
तो म्हणाला, "तू इथेच राहून नोकरी कर आणि मला पैसे पाठवत जा. मग, मी तुझ्या नावानं लोन घेऊन घर खरेदी करेन."
यासाठी त्याला माझ्याकडून होकार हवा होता. त्या रात्री याच प्रश्नावर त्याला माझ्याकडून 'हो' असं उत्तर हवं होतं. हे सकारात्मक उत्तर मिळवण्यासाठी त्यानं मला धक्का देऊन बिछान्यावर पाडलं आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्यानं हद्दच केली होती. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या नवऱ्याला सोडून दिलं. मी सुशिक्षित तरुणी होते, स्वतः कमावू शकत होते आणि स्वतः जगू शकत होते. पण, तरीही जेव्हा मी साहिलच्या घरातून निघाले तेव्हा माझ्यावर दडपण आलं होतं.
माझ्या माणसांचं आणि समाजाचं मला तेव्हा भय होतं. पण, माझ्या ह्रदयात दाटून आलेलं दुःख यापेक्षा मोठं होतं. आई-वडील आणि दोन बहिणी असलेल्या घरात मी पोहोचले. माझे केस विस्कटलेले होते आणि रात्रभर न झोपल्यानं माझे डोळे सुजले होते.

लग्नानंतर दोन महिन्यांनी मुलगी जेव्हा माहेरी येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तजेला असतो. मात्र, माझा चेहरा पडलेला होता. शेजाऱ्यांच्या नजरांनाही ही वस्तुस्थिती कळायला वेळ लागला नाही.
माझ्या घरी येणाऱ्यांना याचा अंदाज आला होता. सगळे म्हणायचे की, आमच्या बरोबर खूप वाईट झालं. साहिल मला स्वतः घ्यायला येईल असा काही जण धीर द्यायचे.
काहींचं म्हणणं होतं की एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून असे मोठे निर्णय घ्यायचे नसतात. जितकी तोंडं, तेवढ्या गोष्टी लोक सांगत होते. पण, यानं माझा निर्णय मी बदलला नाही.
साहिलचं घर सोडून मला आता ७ महिने झाले आहेत. पण, आता मी स्वतःचे मार्ग स्वतःच निवडते. मला आता फेलोशिप मिळाली आहे. मी नोकरी करता-करता शिक्षणही घेत आहे.
या सगळ्याबरोबरच पोलीस ठाण्यात आणि कोर्टात फेऱ्या सुरू आहेत. कारण, अजूनही कायदेशीरदृष्ट्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
आजपण मी झोपेतून दचकून जागी होते. आजही मला वाईट स्वप्न पडतात. जे माझ्यासोबत झालं आहे ते मी विसरू शकलेले नाही आणि यातून माझा पुढे जायचा प्रयत्न सुरू आहे.
नाती आणि प्रेमावरचा भरवसा डगडगमगला असला तरी तुटलेला नाही. मी स्वतःला कमीत-कमी ३ वर्ष देण्याचा विचार केला आहे. या काळात मी सगळं प्रेम स्वतःला समर्पित करेन आणि स्वतःला मजबूत करेन.
मला स्वतःचं आता कौतुक वाटतं की गप्प नाही बसले, कुढत नाही बसले उलट वेळीच हे नातं तोडून टाकलं. यामुळे मला विश्वास आहे की, यापुढचा माझा भविष्यकाळ माझ्या वर्तमान आणि भूतकाळापेक्षाही चांगला असेल.
(ही पश्चिम भारतात राहणाऱ्या एका महिलेची खरी कहाणी आहे. जी बीबीसीच्या माजी प्रतिनिधी सिंधुवासिनी यांच्याशी त्यांनी केलेल्या चर्चेवर आधारलेली आहे. महिलेच्या आग्रहास्तव यातलं नाव बदलण्यात आलं आहे. या सीरिजच्या निर्मात्या दिव्या आर्या आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)